यूपीएससी परीक्षेतील भूगोल या घटकाचे स्वरूप जाणून घेऊयात..

यूपीएससी परीक्षांच्या स्वरूपात गेल्या काही वर्षांत महत्त्वपूर्ण बदल होताना दिसून येत आहेत. आजच्या लेखात यूपीएससी परीक्षेतील भूगोल या विषयाची  माहिती करून घेऊयात. परीक्षेतील भूगोल या घटकाचे स्वरूप अभ्यासल्यास त्यामध्ये प्रामुख्याने पुढील दोन प्रमुख घटक असल्याचे जाणवते-  सामान्य भूगोल आणि  प्रादेशिक भूगोल.

सामान्य भूगोल

या घटकामध्ये प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल (सामाजिक व आíथक भूगोल) हे दोन घटक आहेत.

प्राकृतिक भूगोल : या घटकास भूगोल विषयाचा गाभा म्हणतात; कारण या विषयामध्ये पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जातो. या विभागामध्ये पृथ्वीचे विविध थर अभ्यासले जातात.

१) शिलावरण (Lithosphere) – खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भूअंतर्गत व भूबाह्य़ बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावरणाचा अभ्यास करणारा विषय म्हणजे भूरूपशास्त्र (Geomorphology) होय. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडींचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्र (Applied Geomorphology) यासारख्या चालू घडामोडींशी संबंधित घटकावर प्रश्न येण्याची शक्यता आहे.

२) वातावरण (Atmosphere) – वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र (Climatology) या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायूराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा.

३) जलावरण (Hydrosphere) – जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र (Oceanography) या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागर जलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडींमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती; सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्रांबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावश्यक आहे.

४) जीवावरण (Biosphere) – या घटकाचा अभ्यास जैवभूगोल (Biogeography) या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये पृथ्वीवरील सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.

५) पर्यावरण- या घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नसíगक स्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, प्रवाळ भित्तिकांचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची माहिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरिस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.

प्राकृतिक घटक हा भूगोलाचा सर्वात कठीण घटक आहे. या घटकाचे संकल्पनात्मक स्वरूप या घटकास काहीसे निरस व कठीण बनवते; त्यामुळे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये.

मानवी भूगोल : सामान्य भूगोलामधील दुसरा घटक म्हणजे मानवी भूगोल होय. मानवी भूगोलामध्ये पुढील तीन उपघटक समाविष्ट होतात- लोकसंख्या भूगोल (Population Geography), वसाहत भूगोल (Settelment Geography),  आíथक भूगोल (Economic Geography).

(अ) लोकसंख्या भूगोल- मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. यामध्ये विविध लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्या वृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, िलग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश या घटकांचा २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्याची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडींच्या अनुषंगाने आवश्यक आहे. या घटकात लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचा सक्तीने अवलंब केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा यांचा जग, भारत व भूगोल चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

(ब) वसाहत भूगोल- वसाहत भूगोलामध्ये मानवांच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी दोन्ही प्रदेशांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. सोडविण्यासाठी इको सिटी किंवा स्मार्ट सिटी या योजना राबविल्या जात आहेत. त्यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतींचा अभ्यास करताना वसाहतींचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील मेहनत घेणे आवश्यक आहे.

(क) आíथक भूगोल- या विषयामध्ये मानवी आíथक प्रक्रिया व नसíगक साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आíथक प्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आíथक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्तावित दुसरी हरित क्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.

प्रादेशिक भूगोल 

सामान्य भूगोलामधील आठ घटकांचा (प्राकृतिक ५ + मानवी ३) अभ्यास एखाद्या प्रदेशासंदर्भात केल्यास त्यास प्रादेशिक भूगोल (Regional Geography) म्हणतात. यूपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा व भारताचा भूगोल समाविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयाशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. महत्त्वाच्या नद्या, शहरे, पर्वत शिखरे इ. आजच्या लेखामध्ये आपण भूगोलविषयाचे विविध घटक व या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप पाहिले. पुढील लेखामध्ये भूगोल विषयाच्या अभ्यासाकरता कोणती पुस्तके व इतर अभ्यास साहित्य वापरायचे याची माहिती घेणार आहोत.