स्वयंउद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी अनेक शिक्षणसंस्थांमध्ये  उद्योगासंबंधित विविध बाबींचे रीतसर प्रशिक्षण देणारे प्रमाणपत्र, पदविका, पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या प्रशिक्षणक्रमांची ओळख

स्वयंउद्योग सुरू करण्यासाठी इच्छा आणि कुतूहल असण्याबरोबरच आणखीही काही गुणांची आवश्यकता असते. व्यवसाय उद्योगाचा मुख्य गाभा म्हणजे उद्योगप्रवण मानसिकता होय, हेही ध्यानात घ्यायला हवे.

उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या सर्वासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अशा अभ्यासक्रमांचा मुख्य हेतू व्यवसाय-उद्योगाची संपूर्ण ओळख आणि माहिती व्हावी, हा असतो. अशा अभ्यासक्रमांमध्ये व्यवसाय कोणता निवडावा, त्यासाठी काय निकष असावेत इथपासून प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट) कसा करावा किंवा भांडवल कसे उभे करावे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील बदलांचा व्यवसायावर होणारा परिणाम कसा जोखावा अशा उद्योगाशी संबंधित अनेकविध अंगांचा सविस्तर अभ्यास केला जातो. काही केस स्टडीज किंवा प्रत्यक्ष राबवण्यासारखे प्रोजेक्टस् असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण केवळ पुस्तकी शिक्षण राहत नाही तर प्रात्यक्षिकांमधूनही विद्यार्थ्यांना स्वत:ला बऱ्यापैकी अजमावता येतं.

व्यवसायाकडे वळू इच्छिणाऱ्या काहींवर  वाडवडिलांपासून चालत आलेल्या एखाद्या उद्योगाची जबाबदारी असते. नवीन पिढीने नवनवे बदल अंगीकारून व्यापाराला चौफेर वाढवावं ही काळाची गरज असते. अशा व्यावसायिक कुटुंबांच्या नव्या पिढीसाठी व्यवसायासंबंधीचे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

आंत्रप्रेन्युअरशिप किंवा आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट किंवा आंत्रप्रेन्युअरशिप मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट अशा प्रकारच्या पदव्या देणारे रीतसर अभ्यासक्रम पुढील ठिकाणी राबवले जातात-

मुंबईतील एस. पी. जैन ग्लोबल फॅमिली मॅनेज्ड बिझनेस आणि  श्री विलेपार्ले केळवाणी मंडळाचे नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, विलेपार्ले ही दोन्ही महाविद्यालये स्वायत्त असून खासगी क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेली आहेत. नरसी मोनजी तर अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झालेली आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलं नाव असलेली संस्था आहे. कुटुंबातून चालत आलेल्या व्यवसायासाठी पूरक अशी एम.बी.ए. इन फॅमिली मॅनेज्ड बिझनेस हा अभ्यासक्रम हे या दोन्ही महाविद्यालयांचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. त्याव्यतिरिक्त बिझनेस डेव्हलपमेंट किंवा बिझनेस मॅनेजमेंट अशी पदविका, पदव्युत्तर पदवी किंवा एकात्मिक असे उद्योग – व्यवसायाशी निगडित  अभ्यासक्रम अनेक शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध आहेत.

आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही गुजरातमधील स्वायत्त संस्था १९८३ सालापासून कार्यरत आहे. आयडीबीआय, आयएफसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या वित्तीय संस्थांकडून या संस्थेसाठी वित्तपुरवठा केला जातो. या संस्थेचे विभागीय कार्यालय मध्य प्रदेशातील भोपाळ, लखनौ (उत्तर प्रदेश), बंगळुरू (कर्नाटक) आणि गुवाहाटी (आसाम) अशा ठिकाणी आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस आंत्रप्रेन्युअरशिप (पी.जी.डी.बी.ई.) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट डेव्हलपमेंट स्टडीज (पी.जी.डी.बी. एम.डी.एस.), फेलोशिप इन प्रोग्राम इन मॅनेजमेंट (एफ.बी.ई.) यांसारखे अभ्यासक्रम हे या संस्थेचे मुख्य अभ्यासक्रम म्हणायला हवेत. शिवाय ‘डिप्लोमा इन आंत्रप्रेन्युअरशिप अॅण्ड बिझनेस मॅनेजमेंट’ असा टपालाद्वारे करता येणारा अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो, विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) प्रमाणित असल्यामुळे मान्यतेविषयी काळजीचे काहीच कारण नाही. भरपूर प्रात्यक्षिके, संशोधनात्मक कार्य, प्रशिक्षणात्मक कार्यक्रम, निरनिराळी शिबिरे, चर्चासत्र हे या संस्थेचे

वैशिष्टय़ म्हणायला हवे.

दिल्ली एनसीआरमध्ये असलेली द नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर आंत्रप्रेन्युअरशिप अॅण्ड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंटसारखी संस्था केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या अखत्यारीतली अव्वल क्रमांकाची संस्था आहे. इथे प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणारे कार्यक्रम (ट्रेन द ट्रेनर) व्यवस्थापन विकासावर आधारित अनेक उपक्रमांचा समावेश होतो. अद्ययावत पुस्तके, मासिके, नियतकालिकांनी परिपूर्ण असे ग्रंथालय, संशोधनात्मक कार्याला वाव, अभ्यासक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागाचा अनुभव हे या संस्थेचे वैशिष्टय़ म्हणायला हवे.

राज्य सरकारचे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीइडीदेखील उद्योजकता विकास क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे. प्रमुख कार्यालय औरंगाबाद इथे असणारी ही संस्था म्हणजे भावी उद्योजक घडवायचे एक व्यासपीठ आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रम, पदविका अभ्यासक्रम, ई मास्टर्स अभ्यासक्रम यांसारखे सुमारे १५ हून अधिक अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहेत. अधिक तपशील संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध होऊ शकेल.

तेव्हा मित्रांनो, आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे, असं म्हणतात, तसं तुमच्या व्यवसाय उद्योगाच्या आकांक्षा वाढण्यासाठी किंवा वाढलेल्या आकांक्षांना योग्य दिशा मिळण्यासाठी निरंतर अभ्यास, शिक्षण, प्रशिक्षण यासंबंधीचे विविध अभ्यासक्रम करून व्यवसाय करण्यासाठी दमदार पावले टाका. vilasgavraskar@yahoo.co.in

उद्योजकतेसाठी आवश्यक ठरणारे गुण

उद्योजकाने प्रयोगशील/ सर्जनशील असावे. ‘कम्फर्ट झोन’ सोडायची त्याची तयारी हवी. त्याच्या अंगी व्यवस्थापनाचे साहस असावे आणि त्याने  समविचारी व्यक्तींचे नेटवर्किंग तयार करायला हवे.