केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सैन्यदलांतर्गत विविध विभागांतील अधिकारी पदांवर निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त सेवा परीक्षा २०१६ या स्पर्धा परीक्षा निवड चाचणीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागा- या स्पर्धा परीक्षेअंतर्गत एकूण उपलब्ध जागा ४५७ आहेत. त्यात पुढीलप्रमाणे जागा उपलब्ध आहेत-
* भारतीय सैन्य अकादमी- २००
* भारतीय नौदल अकादमी- ४५
* भारतीय हवाईदल अकादमी- ३२
* अधिकारी प्रशिक्षण अकादमी- ८०
आवश्यक अर्हता- अर्जदार उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम व खालीलप्रमाणे अर्हताप्राप्त असावेत-
* भारतीय सैन्य अकादमी व अधिकारी प्रशिक्षण अकादमी- अर्जदार कुठल्याही विद्याशाखेतील पदवीधर असावेत.
* भारतीय नौदल अकादमी- अर्जदार अभियांत्रिकीचे पदवीधर असावेत.
* भारतीय हवाई दल अकादमी- अर्जदार गणित व भौतिकशास्त्र विषयांसह बी.एस्सी. अथवा पदवीधर अभियंते असावेत.
जे उमेदवार यंदा वर नमूद केलेल्या पात्रता परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे देशांतर्गत निवडक शहरांमधील परीक्षा केंद्रांवर
१४ फेब्रुवारी २०१६ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या शहरांचा समावेश असेल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे शारीरिक क्षमता चाचणी, निवड प्रक्रिया व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची सैन्यदलाच्या संबंधित विभागासाठी अंतिम निवड
करण्यात येईल.
वयोमर्यादा : अर्जदारांचा वयोगट खालीलप्रमाणे असावा-
* भारतीय सैन्य अकादमी व भारतीय नौदल अकादमी- उमेदवारांचे वय
१७ ते २२ वर्षांच्या दरम्यान असावे.
* भारतीय हवाई दल अकादमी- उमेदवारांचे वय २० ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.
* अधिकारी प्रशिक्षण अकादमी- उमेदवारांचे वय १७ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जदारांनी आपल्या अर्जासह भरायचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा स्टेट बँकेच्या कुठल्याही सहयोगी बँकेच्या शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती
संयुक्त संरक्षण सेवा- २०१६ संदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ नोव्हेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर ४ डिसेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.