करिअरच्या विविध टप्प्यांतील आव्हाने आणि त्यावेळी आवश्यक ठरणारा तारतम्यभाव याविषयी जाणून घेऊयात, करिअरनीती या पाक्षिक सदरातून!

आजकाल दहा -बारा वर्षांच्या मुलांनाही करिअर या शब्दाचं वजन माहीत असतं. सुस्थापित आयुष्यासाठी आपलं करिअर चांगलं असायला हवं, हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळे करिअर निवड हा मुद्दा दहावी-बारावीत ऐरणीवर आला की मुलं आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये काही ठरावीक गोष्टींचा विचार होतो.

  • लौकिकार्थाने कुठल्या करिअरला प्रतिष्ठा आहे?
  • कुठल्या करिअरमध्ये चांगला पसा आहे?
  • कुठल्या करिअरमध्ये शिकून पसे कमवायला कमीत कमी वेळ लागेल?
  • कुठल्या करिअरला मागणी अधिक आहे?
  • मुलाचा एकंदर कल, िपड काय आहे?

नोकरी सुरू झाली की मग सगळा फोकस कन्फम्रेशन, अप्रेझल्, पगारवाढ, प्रमोशन्स यावर असतो. तेव्हा मग सर्वसाधारणपणे ज्या पलूंची चर्चा होते ते म्हणजे कष्ट, ज्ञान, चिकाटी आणि अर्थात प्रगती करायला लागणारी क्षमता. याव्यतिरिक्त आपल्या कानावर इतर काही गोष्टी येतात त्या म्हणजे पॉलिटिक्स, चमचेगिरी, गटबाजी, फेवरेटिझम, गळाकापू वृत्ती वगरे. पण या झाल्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी.

पण या सगळ्याव्यतिरिक्त करिअरसंबंधित इतर अनेक गोष्टी आहेत, ज्याची सुरुवातीला तर आपल्याला कल्पना नसतेच, पण अनेकांना अनेक वर्षे काम करूनही त्याबद्दल ठोस कल्पना येत नाही. यातील काही गोष्टी एकंदरच करिअर म्हटलं की महत्त्वाच्या असतात, तर काही गोष्टी करिअरच्या काही टप्प्यांना महत्त्वाच्या असतात.

आता हेच पाहा.. अनेक वेळा आपली पात्रता आहे असं आपल्याला वाटत असूनही आपला विचार एखाद्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी किंवा प्रमोशनसाठी केला जात नाही. असं का? एखाद्या जबाबदारीतून आपल्याला काढून टाकून तिथे आपल्यापेक्षा कमी कुवतीच्या माणसाची नेमणूक होते. असं का? बऱ्याचदा ज्या व्यक्तीला एखाद्या विषयाचं ज्ञान असतं त्याला प्रेझेन्ट करू न देता त्याविषयाची सखोल माहिती नसलेल्याला ही जबाबदारी दिली जाते. असं का? काही वेळा सगळं घोडा काम आपण केलेलं असतं, पण शेवटी क्रेडिट दुसऱ्यालाच दिलं जातं. असं का? अनेक माणसं मोठय़ा हुद्दय़ावर भरमसाट पगार घेतात, पण काम काहीच करताना दिसत नाहीत. असं का? बऱ्याचदा आपण आपलं काम चोखपणे बजावत असतो, पण काही तरी अघटित घडतं आणि त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जातं. असं का? अनेक जणांना काहीही टेक्निकल ज्ञान नसताना त्यांना वरचे हुद्दे आणि भरमसाट वेतन मिळते. असं का?

वरील सगळ्या घटना, प्रसंग अगदी कुठल्याही कंपनीत कसलंही पॉलिटिक्स किंवा चमचेगिरी नसतानाही आढळतात. असं का?

नोकरी करून बरीच र्वष झाल्यावर येणारी आव्हाने आणखीन वेगळ्या स्वरूपाची असू शकतात. नोकरी आणि कुटुंबाला द्यायच्या वेळाचं गणित कसं जमवावं? स्त्रियांना मुलं कधी व्हावीत, त्यांनी किती ब्रेक घ्यावा, ब्रेकनंतर तीच करिअर पुढे चालू ठेवावी की आणखीन काही करून पाहावं? पन्नाशीनंतर काय स्वरूपाचं काम करावं? तेव्हा काय महत्त्वाचं असतं? तब्येतीच्या कुरकुरी असतील तर काय स्वरूपाचं काम करावं? आणखी काही अडचणी असतील तर काय करावं?

करिअरसंबंधीच्या या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत? एक तर आपण नोकरीत जे १२-१४ तास घालवतो, तो आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तिथे आपल्याला आत्मसन्मान आणि समाधान मिळणं महत्त्वाचं. अशा वेळी मग कुवत आणि पात्रता असतानासुद्धा अपेक्षेप्रमाणे प्रगती जेव्हा होत नाही, तेव्हा अस्तित्वावर घाला आल्यासारखंच होऊन जातं. अनेक जणांना या गोष्टीची जाणीव नसते किंवा मग भान राहत नाही.

दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअर ही काही एकदा एक ठरवलं आणि ते मग करत राहिलं अशी गोष्ट नाही. कुठल्याही करिअरला त्या त्या टप्प्याला एक संदर्भ  असतो. हा संदर्भ करिअरचा अविभाज्य भाग असतो. ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ हे केवळ त्या जॉबपुरतं सीमित नसतं. प्रत्येक करिअरमधलं समाधान हे त्या त्या टप्प्याला त्याच्या असलेल्या संदर्भाला अनुसरून असतं. अशा वेळी तारतम्य भाव महत्त्वाचा. संदर्भाचा विसर पडला किंवा संदर्भाला अनुसरून आपले निर्णय नसले, तर सगळ्याचाच तोल बिघडतो आणि अर्थातच त्याचे परिणामही भोगावे लागू शकतात. उदा. एका मोठय़ा महानगरात राहणारा प्रणव. त्याला नोकरीत पाच वर्षे झाली. छान बस्तान बसलंय. चांगला पगार मिळतोय. मॅनेजर आणि सहकारीही बरे आहेत. आणि मग प्रणयचं लग्न झालं. काही काळाने मूल झालं. बायकोच्या शिक्षण आणि अनुभवाला लायक नोकऱ्या ज्या भागात आहेत, तो परिसर घरापासून दीड-दोन तासांच्या अंतरावर पडणार. तिला रोजचा हा प्रवास झेपणार नाही. त्या परिसरात घर घेऊन राहायचं तर ते प्रणवला लांब पडणार. अशा वेळी प्रणवने नोकरी बदलणं सर्वानाच सोयीचं असू शकेल.

अशा या करिअरमधल्या आगळ्यावेगळ्या गोष्टी, करिअरच्या प्रवासात येणारे वेगवेगळे टप्पे, त्यांचे संदर्भ, त्यासोबत येणारी आव्हाने आणि त्याला लागणारा तारतम्यभाव यावर बोलू या ‘करिअरनीती’

या पाक्षिक सदरातून.

palsule.milind@gmail.com