मी बी.कॉम. झालो असून त्या अर्हतेवर बँकेत नोकरी करत आहे. सरकारी नोकरी मिळण्याकरता काय
करावे लागेल?
– प्रसाद नागरजोगे, गंगाखेड
पुढे नमूद केलेल्या परीक्षा देऊन शासकीय नोकरी मिळवता येते-
१. संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा.
२. राज्य लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारी पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा.
३. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी विक्रीकर निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात
येणारी परीक्षा.
४. स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांसाठी कनिष्ठ पदावरील निवडीसाठी घेण्यात येणारी परीक्षा.
५. सार्वजनिक बँक आणि रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत अधिकारी व कारकून पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा.

मी पेट्रोलिअम इंजिनीअिरगमध्ये पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. नोकरीसाठी कुठली क्षेत्रे उपलब्ध आहेत?
– नितीन महाले
तेल उत्खनन कंपन्या, तेल प्रक्रिया कंपन्या, नसगिक वायू उत्खनन व प्रक्रिया या कंपन्यांमध्ये आपल्याला करिअर करण्याची संधी मिळू शकते. पेट्रोलिअम अभियंत्यांना रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, एस्सार ऑइल, जीएसपीसी, शेल ऑइल, गॅस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, कैर्न एनर्जी, आयओसीएल, निको रिसोस्रेस, बेकर ह्युजेस, रिलायन्स एनर्जी आदी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते.

मी एका भारतीय विद्यापीठामधून दूरशिक्षण पद्धतीने पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. त्याच वेळेस मला इतर विद्यापीठामधून दूरशिक्षण पद्धतीने दुसऱ्या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य आहे का?
– रावसाहेब पडूल
आपल्याला एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकता येणे शक्य आहे.
मी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षांला आहे. माझे विषय गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स हे आहेत. मला इलेक्ट्रिकल इंजिनीअिरग किंवा बी.एस्सी. अ‍ॅग्रीकल्चरच्या द्वितीय विषयाला प्रवेश
मिळेल का?
– अंकुश रौंडले
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळू शकतो. इलेक्ट्रिकल अथवा कृषी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला तुम्हाला प्रवेश मिळू शकत नाही.

मी २०१५ मध्ये मुंबई विद्यापीठामधून बीई इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केले आहे. माझे वय २६ वष्रे असून मला भारतीय हवाई दलात अथवा इस्रोमध्ये जाण्यासाठी काय करावे लागेल? नोकरी करत एम.एस./ एम.टेक करण्याचा काही पर्याय उपलब्ध आहे का?
– सुशांत देवळे
तुम्हाला इस्रो किंवा हवाई दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी या दोन्ही संस्थांमार्फत वेळोवेळी पदभरतीसाठी दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवावे लागेल. या जाहिराती सर्व प्रमुख दैनिके आणि रोजगार समाचार या साप्ताहिकात प्रकाशित होतात. या दोन्ही संस्था उमेदवारांच्या निवडीसाठी वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवतात. त्यांची माहिती या जाहिरातींमध्ये दिली जाते. त्यानुसार आपल्याला या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल. एम.एस. करण्यासाठी आपल्याला परदेशी शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश मिळवावा लागेल. तिथे अशा प्रकारची संधी मिळू शकते. भारतात एम.टेक हा पूर्णवेळ अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आपल्याला ॅअळए परीक्षा द्यावी लागेल.

मी सध्या दहावीत असून मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. त्याकरता आतापासून काय तयारी करावी लागेल?
– अजित गोखले
तू आताच जिल्हाधिकारी होण्याचे निश्चित केले आहेस, ही बाब प्रशंसनीय आहे. जिल्हाधिकारी होण्यासाठी भारतीय नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेला पदवी प्राप्त केलेले अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांत असलेले विद्यार्थी बसू शकतात. या परीक्षेचे प्राथमिक आणि मुख्य असे दोन टप्पे आहेत. प्राथमिक परीक्षा ही वस्तुनिष्ठ पद्धतीची असते. या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी निवडले जाते. मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखत यांवर आधारित निवडीची अंतिम यादी तयार केली जाते. पूर्व परीक्षेस तीन लाख ते चार लाख उमेदवार बसतात. त्यातून १० ते १५ हजारांपर्यंत मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. मुलाखतीनंतर सुमारे हजार उमेदवारांची विविध सेवांसाठी निवड केली जाते. त्यामुळे या परीक्षेतील तीव्र स्पर्धा लक्षात घ्यायला हवी. आतापासून तयारी करायची असल्यास सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि गणिताच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट होतील हे लक्षात ठेवावे. त्याचा उपयोग पूर्व परीक्षेत होऊ शकेल.

मी सध्या अकरावीत शिकत आहे. मला बारावीनंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यासाठी काय करावे लागेल?
– मंदार सोनार
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेतील प्रवेशासाठी जेइइ-अ‍ॅडव्हान्स्ड या परीक्षेतील गुण ग्राह्य धरले जातात. त्यामुळे तुम्हाला जेइइ- मेन आणि अ‍ॅडव्हान्स्ड या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतील. आयआयटी प्रवेश परीक्षेसाठी उत्तम तयारी करणे
आवश्यक ठरते.

मी मेकॅनिकल इंजिनीअिरगच्या प्रथम वर्षांत शिकत आहे. मला डिझायिनग आणि मानसशास्त्रात रस आहे. कोणती पदविका अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केल्याने मला या क्षेत्रांमध्ये करिअर करता येईल? इंटेरिअर डिझाइन, अ‍ॅनिमेशन, ग्राफिक डिझाइन यातील कोणते अभ्यासक्रम माझ्या शाखेला पूरक ठरतात?
– यशराज राऊत
तुझा अभ्यासक्रमाबाबत तसेच करिअरबाबत बराच गोंधळ निर्माण झालेला दिसतो, तो तातडीने दूर होणे आवश्यक आहे. तुला उत्तम अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे त्यावर सध्या लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरेल. मात्र, तुझी इच्छा असल्यास तुला मानसशास्त्रात पदवी अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्यासाठी मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम करता येतील.
इंटेरिअर डिझाइन, अ‍ॅनिमेशन, ग्राफिक डिझाइन हे अभ्यासक्रमसुद्धा तुला करता येतील. मात्र, या अभ्यासक्रमांसाठी तुला भरपूर वेळ द्यावा लागेल. बीईच्या अभ्यासासोबत या अभ्यासक्रमांचा अभ्यास करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रमांना पुरेसा वेळ देता येणे कठीण होईल. सध्या डिझाइन विषयाचा अभ्यास करण्याऐवजी पदवी अभ्यासक्रमानंतर एनआयडी अथवा आयआयटीमधील पदव्युत्तर पदवी डिझाइन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवून प्रॉडक्ट डिझाइनमध्ये स्पेशलायझेशन केल्यास तुला त्याचा फायदा होऊ शकेल.

मी बीसीएच्या तृतीय वर्षांला शिकत आहे. यानंतर मला कोणते क्षेत्र निवडता येईल?
– अमर जाधव
बीसीएमध्ये आपल्याला कोणत्या विषयांमध्ये आवड आणि गती निर्माण झाली आहे, हे लक्षात घेऊन आपण पुढील अभ्यासक्रम निवडू शकाल. एमएसीए करणे केव्हाही उत्तम. एमबीए हासुद्धा एक पर्याय आहे. स्पर्धा परीक्षा देऊन बँक आणि राज्य व केंद्र सरकारी नोकरी करता येईल. ल्ल ल्ल

मी बी.ए.च्या द्वितीय वर्षांत शिकत आहे. मला यूपीएससी परीक्षा द्यायची आहे. त्याद्वारे आयआरएस पद भूषवावेसे वाटते. त्यासंबंधित अभ्यासक्रमाची आणि नोकरीच्या संधींची माहिती द्याल का? मी अपंग आहे. त्याकरता आरक्षण असते का?
– ज्ञानेश्वर
यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेद्वारे आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवांसोबत आयआरएस- इंडियन रेव्हेन्यू सíव्हससाठी उमेदवारांची निवड केली जाते. या परीक्षेतील गुणानुक्रम व उमेदवारांचा पसंतीक्रम यानुसार नियुक्त्या आधारित असतात. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सर्व पदासांठी समान आहे. त्यामुळे आयआरएस पदासाठी स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज नाही. या सेवामध्ये अपंग पदांसाठी काही जागा राखीव असतात. त्या निकषात बसत असल्यास तुम्हाला नोकरी मिळू शकते. आयआरएस अंतर्गत दोन शाखा आहेत- इन्कम टॅक्स विभाग आणि कस्टम आणि सेंट्रल एक्साइज विभाग. या दोन विभागांमध्ये या सेवेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना काम करावे लागते.

अभ्यासक्रम, करिअर संधीविषयक
आपले प्रश्न
career.vruttant@expressindia.com
या पत्त्यावर पाठवावेत.

– सुरेश वांदिले