वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ही परीक्षा गरजेची आहे. परंतु या परीक्षेबद्दल नीटशी माहिती फारच कमी विद्यार्थ्यांना असते. त्यामुळेच ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेमध्ये साठय़े कॉलेजच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. किशोर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षेची मांडणी, अभ्यासाचे तंत्र अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी उपयुक्त माहिती दिली.

 ‘नीट’ ही योग्यच..

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश
Record Number of Students Register for MHTCET
अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशासाठी स्पर्धा, सीईटीसाठी किती विद्यार्थ्यांची नोंदणी?

कोणतीही परीक्षा कठीण नसते तर आपला दृष्टिकोन परीक्षा सोपी की कठीण हे ठरवत असतो. २०१२ रोजी ‘नीट’ परीक्षा सुरू झाली होती. २०१३-१४ मध्ये पुन्हा सीईटी परीक्षा सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ‘नीट’ परीक्षा अचानक जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात गोंधळ झाला. नंतर पुन्हा ‘नीट’ परीक्षेची घोषणा झाल्यानंतर सगळेच घाबरले होते. पण त्याची गरज लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. आज राष्ट्रीयस्तरावर परीक्षा घेतली जात असली तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरही मेडिकलची प्रवेश परीक्षा सुरू होऊ शकते. विद्यार्थ्यांनी या सगळ्याची तयारी करून ठेवण्याची गरज आहे. एमबीबीएस आणि बीडीएस यासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाते. राज्यातील सरकारी आणि खासगी महाविद्यालये मोठय़ा संख्येने आहेत. २०१२ पर्यंत महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी पंचवीस ते तीस सीईटीच्या परीक्षा होत्या. या सगळ्या परीक्षा देऊन प्रवेश घ्यायचा म्हटला तर विद्यार्थ्यांना किमान ३० सीईटींसाठी प्रत्येक पाच हजारांचे शुल्क भरावे लागत होते. शिवाय या परीक्षांना जाण्यासाठीचा प्रवास खर्च आणि इतर खर्च वेगळाच होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात अर्थिक भरुदड पडत होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या तर त्याहून वेगळ्या होत्या. याशिवाय विद्यार्थ्यांना होणारा शारीरिक आणि मानसिक त्रासही मोठा होता. त्याचबरोबर या प्रवेश परीक्षेच्या दरम्यान मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचेही दिसून आले होते. हे सगळे टाळण्यासाठीच ‘नीट’ परीक्षा सुरू करण्यात आली. या परीक्षेमुळे सर्वाना समान निकष लावले जातात. जे विद्यार्थी सीईटी आणि इतर प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवत होते ते विद्यार्थी ‘नीट’मध्येही आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. या परीक्षेचा बागूलबुवा न करता ती समजून घेणे गरजेचे आहे. ‘नीट’ परीक्षा ही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (सीबीएसई)अंतर्गत आयोजित करण्यात येते. एनसीआरटीच्या अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा आहे. परीक्षांचे आयोजन करणे, निकाल तयार करणे, मेरिट यादी तयार करणे ही कामे सीबीएसईच्या माध्यमातून केली जातात.

   ‘नीट’ अवघड का वाटते?

दहावीत मिळालेले गुण हे केवळ चांगल्या महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र दहावीत मिळालेल्या टक्केवारीवरून मुलांची बौद्धिक क्षमता ठरवणे योग्य ठरणार नाही. दहावीचा अभ्यासक्रम अत्यंत कमी असून पाठांतर करून लिहिल्यानंतर ९५ टक्क्य़ांपर्यंत सहज मार्क मिळू शकतात. त्यामुळे या गुणांवरून मुलगा किती हुशार आहे, असे समजणे योग्य ठरणार नाही. पाठ करणे आणि समजून घेणे यामध्ये फरक आहे. सीईटीमध्येही पाठांतर करून लिहिणे शक्य होते मात्र ‘नीट’मध्ये संकल्पना समजण्याला महत्त्व आहे.

  प्रवेश

प्रत्येक कॉलेजमध्ये ८५ टक्के विद्यार्थी त्याच राज्यातील असतील तर १५ टक्के जागा इतर राज्यातील मुलांसाठी राखीव असतील. यासाठी महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र गरजेचे आहे. ‘नीट’ परीक्षा एक खिडकीप्रमाणे कार्यरत राहणार आहे. २०१७ ची ‘नीट’ परीक्षा एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीओएमएस या बरोबरच सगळ्या पॅरामेडिकल कोर्सेससाठीही कायम करण्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला नाही मात्र भविष्यात तसा निर्णय होण्याची शक्यता आहे.

   अभ्यास कसा करायचा ?

सर्वात प्रथम ११-१२वीचा अभ्यास बारकाईने करा. संकल्पना समजून घ्या. बारावीतही चांगले गुण मिळवायचे आहेत, हे लक्षात ठेवा. कारण अनेकजण सीईटी किंवा नीटमध्ये उत्तम गुण मिळवतात, पण बारावीला पीसीबीमध्ये ५० टक्केही गुण मिळत नाही. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सरासरी पीसीबीमध्ये ५० टक्के मार्क मिळवावे. या परीक्षेचा अभ्यास करताना एनसीआरटीच्या पुस्तकाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ‘नीट’मध्ये पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो) महत्त्वाचे आहे. यामध्ये ४५ प्रश्न फिजिक्सचे, ४५ प्रश्न केमिस्ट्रीचे आणि ९० प्रश्न बायोचे असतात. असे एकूण १८० प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात. ७२० गुणांची ही संपूर्ण परीक्षा असते. या तीनही विषयांमध्ये एल१, एल२ आणि एल३ या स्तरावरील प्रश्न असतात. कठीण, मध्यम आणि काहीसे सोपे असे त्यांचे प्रमाण असते. त्यामुळे ‘नीट’चे सगळेच प्रश्न कठीण नसतात. त्यांचे कठीण आणि सोप्याचे प्रमाण साधारण ठरलेले असते. १८० प्रश्नांपैकी जवळपास ६० सोपे, ६० मध्यम आणि ५० कठीण प्रश्न असतात. पूर्वीच्या काही प्रश्नपत्रिकांनुसार भौतिकशास्त्रातील तीस टक्के प्रश्न कठीण असतात, चाळीस टक्के मध्यम आणि तीस टक्के सोपे असतात. रसायनशास्त्रात वीस ते पंचवीस टक्के कठीण प्रश्न असतात, उरलेले सोपे प्रश्न असतात. जीवशास्त्रात चाळीस टक्के कठीण असतात तर तीस टक्के मध्यम आणि तीस टक्के सोपे प्रश्न असतात. प्रश्नपत्रिका तयार करताना ज्ञान, समज, कृती या तंत्रावर आधारित केली जाते. प्रश्नपत्रिका सामान्य विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तयार केली जाते. त्यामुळेच कुणीच घाबरून जाऊ नये.

   कोणती पुस्तके वाचावी?

एनसीआरटीच्या फिंगर टिप्स या पुस्तकातील सिनोप्सिस वाचा. त्यावर आधारित प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. केवळ आपण एखाद्या क्लासला जातो, त्यामुळे आपल्याला सर्व येईल, या भ्रमात राहू नका. स्वअभ्यासही अतिशय महत्त्वाचा आहे. एका मिनिटात एक प्रश्न सोडवायचा असल्याने प्रश्नाशी मैत्री करा. सतत सराव परीक्षा देऊ नका. त्या ऐवजी स्वअभ्यास आणि सरावावर भर द्या. नोव्हेंबरनंतर एक महिना विद्यार्थ्यांनी संपूर्णपणे बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवे. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासाठी प्रदीप प्रकाशन आणि दिनेश प्रकाशनच्या पुस्तकांचा उपयोग करा. जीवशास्त्रासाठी दिशा प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासा. प्रश्न सोडवताना अचूक पर्याय निवडा. कारण निगेटिव्ह मार्किंग आहे.

   प्रवेशासंबंधी

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.cbseneet.nic.in  या संकेतस्थळाचा उपयोग करायचा आहे. विद्यार्थ्यांनी आपले आठ पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तयार ठेवणे आवश्यक आहे.

प्रवेश अर्ज भरण्याची पद्धत

  • cbseneet.nic.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासाठी लागईन करायचे आहे.
  • अप्लाय ऑनलाइन या लिंकचा आधार घ्यावा लागतो.
  • ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन अर्ज भाग – १ भरल्यावर नोंदणी क्रमांक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा.
  • डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, कॅनरा बँक, सिंडिकेट बँक आणि ई-पोस्ट ऑफिस या ठिकाणचा
  • चलन फॉर पेमेंट डाऊनलोड करायचे आहे.
  • ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे.
  • अर्जाच्या चार प्रती, पैसे भरल्याच्या कॉपी आणि पत्त्यासोबत सीबीएसई बोर्डाला पाठवायची आहे.
  • ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अडचण आल्यास सीबीएसई बोर्डातर्फे फॅसिलिटेशन
  • केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सांताक्रूझ येथील आर.एन. पोतदार हायस्कूल, खारघर सेक्टर २१ येथील अ‍ॅपजे स्कूल आणि ऐरोली येथील डीएव्ही पब्लिक स्कूल येथे
  • सहकार्य मिळू शकते.
  • mohfw.nic.in  या संकेतस्थळावर ऑल इंडिया पातळीवरच्या १५टक्के प्रवेश जागांविषयी माहिती मिळणार आहे.

फायदेशीर उपयोग

पदवी शिक्षण घेणारे आणि दहावीचे असे सर्व वयोगटातले विद्यार्थी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी तज्ज्ञ वक्ते लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिली. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.

निधीश सक्सेना, डिरेक्टर- अ‍ॅडमिशन, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन

  • प्रायोजक : या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर ‘असोसिएट पार्टनर’ विद्यालंकार क्लासेस होते. ‘पॉवर्ड बाय पार्टनर्स ’ अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ, द युनिक अ‍ॅकॅडमी हे होते. तर हॉटेल टिप टॉप प्लाझा हे ‘व्हेन्यू पार्टनर’ होते.