दि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे १ एप्रिल ते २० ऑगस्ट २०१६ दरम्यान ‘नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन आर्किटेक्चर’ (नाटा) चाचणी घेण्यात येणार आहे. वास्तुशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ‘नाटा’ या देशस्तरावर घेण्यात येणाऱ्या प्रवेशचाचणीचे गुण आधारभूत मानले जातात. या चाचणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना या कालावधीत जास्तीतजास्त पाच वेळा ही चाचणी देता येईल. प्रत्येक चाचणी देण्यासाठी नाटाच्या वेबसाइटवर (www.nata.in) विद्यार्थ्यांनी नव्याने अर्जाची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांनी दिलेल्या पाचही चाचण्यांमधील सर्वोत्तम गुण नमूद केले जातील. या चाचणीत विद्यार्थ्यांची चित्रकला, निरीक्षण कौशल्य, प्रमाण (प्रपोर्शन) या विषयीचे भान, सौंदर्याविषयीची संवेदनशीलता आणि विचारक्षमता या बाबी जोखल्या जातात. नोंदणीची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०१६ आहे.

यंग इंडिया फेलोशिप

एकविसाव्या शतकातील भारताला नेतृत्व देऊ इच्छिणाऱ्या युवकयुवतींना ‘यंग इंडिया फेलोशिप’द्वारे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमात देशभरातील २२५ विद्यार्थ्यांना एक वर्षांची पदव्युत्तर फेलोशिप दिली जाते. हा निवासी उपक्रम असून दिल्लीच्या एनसीआर येथील अशोक विद्यापीठामध्ये या फेलोशिपअंतर्गत विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असते.

या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जगभरातील सर्वोत्तम शिक्षणतज्ज्ञांकरवी बहुशाखीय शिक्षणक्रम शिकवला जातो. ‘यंग इंडिया फेलोशिप’ने युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसील्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस, कार्लेटन कॉलेज, किंग्ज कॉलेज- लंडन, सायन्सेस पो- पॅरिस या जगभरातील मातब्बर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाची मांडणी केली आहे.

अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठल्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण. ३१ मे २०१५ रोजी वय कमाल २८ वर्षे.  शैक्षणिक कामगिरी उत्तम असावी तसेच शिक्षणेतर उपक्रमांमधील सहभाग चांगला असावा. लिहिण्या-बोलण्याद्वारे संवादाचे कौशल्य उत्कृष्ट असावे.

अभियांत्रिकी, डिझाइन, वाणिज्य अथवा साहित्य अशा कोणत्याही विद्याशाखेतील विद्यार्थी या फेलोशिपसाठी अर्ज करू शकतो. यासाठीचे अर्ज ऑनलाइन अथवा टपालाद्वारे २९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत. याकरता ‘यंग इंडिया फेलोशिप’च्या वेबसाइटवर (www.youngindiafellowship.com) नोंदणी करून ऑनलाइनरीत्या अर्ज करता येईल अथवा यंग इंडिया फेलोशिपच्या वेबसाइटवरून अर्ज डाऊनलोड करून तो भरावा आणि ‘यंग इंडिया फेलोशिप’च्या कार्यालयात पाठवावा. संस्थेचा पत्ता- यंग इंडिया फेलोशिप प्रोग्राम, अशोक युनिव्हर्सिटी, राजीव गांधी एज्युकेशन सिटी, सोनेपत, हरयाणा- १३१०२९.

स्पेस कॉलनी डिझाइन स्पर्धा

नासा एम्स रिसर्च सेंटर, सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटी आणि नॅशनल स्पेस सोसायटी (एनएसएस)तर्फे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी स्पेस कॉलनी डिझाइन करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी संपूर्ण वसाहतीवर अथवा परिभ्रमणातील जगण्यासंबंधित (ऑर्बिटल लिव्हिंग)  एखाद्या पैलूवर डिझाइन, निबंध, कथा, मॉडेल्स अथवा आर्टवर्क करून पाठवू शकतात. एखाद्या वर्गाला अथवा शाळेला संयुक्तरीत्या- वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या मुद्दय़ांवर काम केलेले एखादे प्रोजेक्ट दाखल करता येईल.

अर्हता : बारावीपर्यंतचे विद्यार्थी (वयोगट- १८ पर्यंत). अर्ज टपालाद्वारे पाठवावेत. सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्वतंत्र गट असतील. सर्वोत्तम पारितोषिकासाठी मात्र, वयोगट लक्षात न घेता प्रकल्पाच्या दर्जानुसार देण्यात येईल.

पुरस्कारापोटी नासाचे प्रमाणपत्र आणि सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांला पाच हजार डॉलस दिले जातील. स्पर्धेसाठीचे प्रकल्प १ मार्चपर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी settlement.arc.nasa.gov/Contest/ या वेबसाइटला भेट द्या.

हंगेरी सरकारकडून शिष्यवृत्ती

हंगेरियन सरकारतर्फे २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षांसाठी तीन हजार विद्यार्थ्यांना विज्ञान, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, व्यापार, कायदा, भाषा अशा विविध पदवी, पदव्युत्तर, एमफिल/ पीएच.डी आणि पोस्ट डॉक्टरल ४२० शैक्षणिक उपक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या उपक्रमाचे व्यवस्थापन टेम्पस पब्लिक फाऊंडेशनतर्फे करण्यात येते.

अर्हता- पदवी, पदव्युत्तर शिक्षण, एम फिल- पीएच.डी आणि पोस्ट डॉक्टरल शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी.

अर्ज टपालाद्वारे अथवा ऑनलाइनरीत्या पाठवावेत.

शिष्यवृत्तीचे स्वरूप- पूर्ण शिकवणी शुल्क, विद्यावेतन, आवश्यक खर्च, निवासाची व्यवस्था आणि वैद्यकीय विमा. या शिष्यवृत्तीच्या अधिक माहितीसाठी  www.tka.hu/international-programmes/2966/stipendium-hungaricum/ या वेबसाइटला भेट द्यावी आणि अर्ज १ मार्च २०१६ पर्यंत पाठवावेत.