नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध असलेल्या ३ वर्षे कालावधीच्या बीएस्सी-हॉस्पिटॅलिटी अँण्ड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर  ‘एनसीएचएम-जेईई: २०१६’ ही प्रवेशपरीक्षा घेण्यात येते. या प्रवेश पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

शैक्षणिक अर्हता : अर्जदारांनी १०+२ या शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी अथवा विद्यार्थी या परीक्षेला बसलेले असावेत.

वयोमर्यादा : अर्जदारांचे वय २२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड पद्धती : अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ३० एप्रिल २०१६ रोजी घेण्यात येईल.

अर्जदारांचा शैक्षणिक आलेख, त्यांची बारावीची गुणांची टक्केवारी व जेईई-२०१६ मधील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना देशांतर्गत ५४ संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या बीएस्सी-हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाला २०१६-१७ या सत्रामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरायचे शुल्क : उमेदवार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करताना आपल्या अर्जासह ८०० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांसाठी ४०० रु.) तर विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज पाठवणाऱ्या उमेदवारांनी ते सर्वसाधारण गटातील असल्यास आपल्या अर्जासह ९०० रु. (राखीव गटातील उमेदवारांनी ४५० रु.) प्रवेश शुल्क भरणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची मुदत : विहित पद्धतीने भरलेले प्रवेश अर्ज  ११ एप्रिल २०१६  पर्यंत पाठवावेत.

अधिक माहिती 

अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी नॅशनल काऊन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या  applyadmission.net/nchmjee 2016 अथवा jwww.uchm.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.