इटलीमधील लुईस बिझनेस स्कूल हे जगभरातील नामांकित व्यवस्थापन संस्थांपैकी एक आहे. या संस्थेच्या एमबीए आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशी अर्जदारांना प्रवेशासहित शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी पदवीधर अर्जदारांकडून  ३० मार्च  २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल :

रोमस्थित लुईस बिझनेस स्कूल हे इटलीमधील मातब्बर व्यवस्थापन संस्थांपैकी एक आहे. जाणकार प्राध्यापकवर्ग, सुमारे दोन हजार कंपन्यांशी जोडलं गेलेलं विद्यापीठाचं नेटवर्क आणि त्यामुळे शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना जगातल्या नामांकित कंपन्यांबरोबर काम करण्याची मिळणारी संधी या सगळ्या बाबींमुळे लुईस बिझनेस स्कूल हे देशोदेशींच्या विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या संस्थेच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. यात केवळ एमबीए अभ्यासक्रमांचे विविध स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील ‘एमबीए आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमा’साठी ही शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून दिली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता या विभागाकडे आकृष्ट करता यावी यासाठी विद्यापीठाने ही शिष्यवृत्ती सुरू केली आहे.

या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून त्या कालावधीकरता पूर्ण शिकवणी शुल्क म्हणजे २७ हजार युरो दिले जातील. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या इतर सुविधा शिष्यवृत्तीधारकाला उपलब्ध असतील. शिष्यवृत्तीधारकाला एमबीएच्या कालावधीपुरती ही शिष्यवृत्ती उपलब्ध असेल. या शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणाकडेही हस्तांतरित करता येणार नाही.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. शिष्यवृत्तीधारकाला या शिष्यवृत्तीसह लुईस बिझनेस स्कूलमध्ये एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही विषयामधील पदवी असावी. अर्जदाराकडे त्याच्या कार्यक्षेत्रातील किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराने व्यवस्थापनाच्या जीमॅट या परीक्षेत ६८० पेक्षा जास्त गुण मिळवणे अपेक्षित आहे. तसे गुण मिळाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र त्याला अर्ज करतेवेळी विद्यापीठात जमा करायचे आहे. अर्जदाराची पदवी स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदारास जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा देण्याची आवश्यकता नाही, मात्र भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे. ज्या अर्जदारांनी जीमॅट परीक्षेत किमान गुण मिळवले नसतील त्यांना विद्यापीठाची प्रवेश चाचणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील. या प्रवेश चाचणीसाठी अर्जदाराने त्याच्या संपूर्ण भरलेल्या अर्जाबरोबर पदवी गुणपत्रक, ओळखपत्र, पासपोर्टची प्रत, सीव्ही व १०५ युरो एवढे प्रवेश शुल्क विद्यापीठात ऑनलाइन जमा करावे.

अर्ज प्रक्रिया :

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या विद्यापीठाच्या ईमेलवर (mba23@luiss.it) अंतिम मुदतीपूर्वी जमा करावा. अर्ज  जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याला जीमॅट परीक्षेत ६८० पेक्षा जास्त गुण असल्याचा अधिकृत दाखला, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स व कामाच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षांची आवश्यकता नाही, मात्र अर्जदाराने जर या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे. याशिवाय विद्यापीठाने अर्जदाराला ही शिष्यवृत्ती बहाल का करावी या विषयावर त्याने स्वतंत्र निबंध लिहून विद्यापीठास वरील ईमेलवर पाठवावा.

निवड प्रक्रिया :

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याच्या अर्जाचा दर्जा लक्षात घेऊन निवड समितीकडून त्याची मुलाखतीसाठी अंतिम निवड करण्यात येईल. मुलाखतीस पात्र ठरलेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर मग अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत अंतिम मुदतीनंतर तीन दिवसांनी कळवले जाईल.

अंतिम मुदत :

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० मार्च २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा :

www.mba.luiss.edu/index

itsprathamesh@gmail.com