युरल फेडरल विद्यापीठ हे रशियातील एक महत्त्वाचे विद्यापीठ असून, युरल प्रांतातील प्रमुख संशोधन केंद्र आहे. विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय पीएच.डी.धारक अर्जदारांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम व संशोधन पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ साठी ही शिष्यवृत्ती पदार्थविज्ञान या विषयासाठी दिली जाणार आहे. युरल विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विभागाच्या क्वान्टम मॅग्नेटोमेट्री प्रयोगशाळेकडून या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पीएच.डी.धारक अर्जदारांकडून १ जून २०१६ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल : हे विद्यापीठ रशियातील प्रमुख दहा विद्यापीठांपकी एक विद्यापीठ आणि संशोधनासाठी उत्तम मानांकन प्राप्त असलेले विद्यापीठ आहे. विद्यापीठातील विविध विभागांतर्फे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रम राबवण्यात येतात. रशियन अकादमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या सहकार्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सुमारे शंभरहून अधिक विविध विषयांमधील शिक्षण व संशोधन संधी उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यापीठाने इतर संशोधन संस्था, औद्योगिक केंद्रे व व्यावसायिक संस्था यांच्याशीही पद्धतशीरपणे सविस्तर जाळे तयार केले आहे. विद्यापीठाला युरल प्रांतात या माध्यमातून रोजगाराच्या बहुतांश संधी उपलब्ध करून देता आलेल्या आहेत.

संबंधित शिष्यवृत्ती ही विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (आयपीटी) या विभागाच्या वतीने शिष्यवृत्तीधारकाला बहाल करण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाच्या संशोधनाचे स्वरूप हे सद्धांतिक व प्रायोगिक असेल व त्याला पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम आयपीटी विभागाच्या क्वान्टम मॅग्नेटोमेट्री प्रयोगशाळेमध्ये किंवा इन्स्टिटय़ूट ऑफ नॅचरल सायन्सेसच्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक प्रयोगशाळेत पूर्ण करता येईल. शिष्यवृत्तीधारकाच्या पोस्टडॉक्टरल संशोधनाचा कालावधी दोन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला विद्यापीठाकडून या कालावधीसाठी प्रतिवर्ष एक दशलक्ष रशियन रुबल्स असा भत्ता दिला जाईल. याव्यतिरिक्त त्याला निवासासाठी तीन खोल्यांचे घर, विमाभत्ता, प्रवासभत्ता व संशोधनासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही तसेच त्याला त्याचा पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक राहील.

आवश्यक अर्हता : ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने पीएच.डी. संपादन केलेली असावी. त्याचे वय ३५ पेक्षा कमी असावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. पदार्थविज्ञानातील सद्धांतिक व प्रायोगिक संशोधनाशी संबंधित methods of NMR spectroscopy या विषयाच्या संशोधनात गती असावी किंवा तत्सम अनुभव असल्यास त्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र जोडावे. अर्जदाराचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी इंग्रजीच्या आयईएलटीएस किंवा टोफेल यांपकी एक परीक्षा दिलेली असावी आणि त्यात उत्तम गुणांकन प्राप्त केलेले असावे. अर्जदाराचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

अर्ज प्रक्रिया : या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विहित नमुन्यात तयार करून विभागप्रमुखांना अंतिम मुदतीपूर्वी ईमेल करावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याचे जीआरईचे गुण, तसेच टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्हींपकी कोणत्याही एका परीक्षेत मिळवलेले गुण किंवा बॅण्डस्, त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., लघुसंशोधन अहवाल, प्रकाशित केली असल्यास शोधनिबंधांच्या प्रती, तज्ज्ञांची शिफारसपत्रे, ट्रान्सक्रिप्ट्स् व कामाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.

निवड प्रक्रिया : अर्जदाराची संबंधित विषयातील संशोधन गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत ई-मेलद्वारे कळवले जाईल.

अंतिम मुदत : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १ जून २०१६ आहे.

महत्वाचा दुवा : urfu.ru/en

itsprathamesh@gmail.com