ग्लोबल अलायन्स ही स्वित्र्झलडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्र्झलडमधील युनिव्हर्सिटी ऑफ इटालियन स्वित्र्झलड (युएसआय) या जगद्विख्यात आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत ‘ग्लोबल अलायन्स’ ही संस्था जनसंपर्क आणि संवाद व्यवस्थापन या विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवते.
‘ग्लोबल अलायन्स’च्या वतीने या क्षेत्रातील आपल्या करिअरच्या मधल्या टप्प्यात असणाऱ्या अनुभवी, मात्र आíथकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या व्यावसायिकांना हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता यावा याकरता शिकवणी शुल्काच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-२०१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून ३१ जानेवारी २०१६ पूर्वी अर्ज मागविण्यात
आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन असलेले आणि जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देणाऱ्या प्राध्यापकवर्गासाठी जगभरात मान्यता प्राप्त केलेले यूएसआय (University of Italian Switzerland) हे आंतरराष्ट्रीय स्विस विद्यापीठ आहे. विद्यापीठातील एकूण विद्यार्थ्यांपकी ६० टक्केविद्यार्थी हे शंभर देशांमधील विद्यार्थी आहेत. जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामधील व्यावसायिक मानके वाढीस लागावीत आणि या क्षेत्राच्या माध्यमातून सार्वजनिक हित जोपासले जावे या उदात्त हेतूने प्रेरित असलेली ही स्वित्र्झलडमधील जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रांत काम
करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. स्वित्र्झलडमधील या दोन्ही संस्था परस्परांच्या सहकार्याने जनसंपर्क आणि संवाद व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम राबवतात. हा अभ्यासक्रम जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे.
‘यूएसआय’चा जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन विभाग नावाजलेला आहे. या विभागात विषयाशी संबंधित विविध शाखांमध्ये संशोधन केले जाते. या विभागामध्ये पदवीपासून पीएच.डी.पर्यंत सर्व अभ्यासक्रम उपलब्ध असून प्रत्येक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्पर्धा असते. जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन विभागाने याच विषयातील अर्धवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केला असून तो EMScom (Executive Master of Science in Communications Management) या नावाने ओळखला जातो. ‘ग्लोबल अलायन्स’ची ही शिष्यवृत्ती याच अर्धवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी पावणेदोन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाला त्या कालावधीपुरतीच शिष्यवृत्ती उपलब्ध असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला ‘ग्लोबल अलायन्स’कडून त्या कालावधीकरता २४,५०० स्विस फ्रान्क्स म्हणजे सुमारे १६ लाख रुपये इतके शिष्यवृत्ती वेतन दिले जाते. या शिष्यवृत्ती वेतनामध्येच शिष्यवृत्तीधारकाला त्याची ५० टक्क्यांपर्यंत शिकवणी शुल्काची रक्कम भरता येईल. संस्थेच्या
इतर सुविधाही शिष्यवृत्तीधारकाला उपलब्ध असतील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला
ही शिष्यवृत्ती इतर कुणाकडेही हस्तांतरित करता येणार नाही.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर जमा करावा. त्याबरोबरच तो अर्ज सोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांसहित त्याने ‘ग्लोबल अलायन्स’ संस्थेला कुरियर सेवेने संस्थेच्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एसओपी, स्वत:चा सीव्ही, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठाला कळवावे.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची विषयातील गुणवत्ता व त्याची आíथक निकड लक्षात घेऊन निवड समिती अर्जाची छाननी करेल व अर्जाची अंतिम निवड निकषांनुसार लागू करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या अर्जदारांना ६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल. अर्जदाराला पुढील पाच दिवसांत शिष्यवृत्तीच्या स्वीकारार्हतेबद्दल निर्णय घेऊन तो समितीला कळवणे बंधनकारक राहील.
अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०१६ आहे.
महत्त्वाचा दुवा
http://www.globalalliancepr.org/website
itsprathamesh@gmail.com
आवश्यक अर्हता
ही शिष्यवृत्ती जनसंपर्क व संवाद व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जनसंपर्क व संवाद व्यवस्थापन या क्षेत्रात कार्यरत असावा. त्याच्याकडे या क्षेत्रातील किमान पाच वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराने त्यासंबंधीचे अनुभवाचे प्रशस्तिपत्र अर्जासोबत जोडावे. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.

प्रथमेश आडविलकर