अनपेक्षितपणे लागणाऱ्या शोधांच्या जन्मकथा उलगडणारं मासिक सदर..
तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन सुकर बनलं आहे आणि त्यामुळेच तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपकरणांना सतत मागणी असते. अनेकदा तर या अत्याधुनिक उपकरणांशिवाय जीवन ही कल्पनासुद्धा आपण सहन करू शकत नाही. कारण, या उपकरणांनी आता थेट आपल्या स्वयंपाकघराचाही ताबा घेतला आहे. मायक्रोवेव्ह ओव्हन हे असंच एक स्वयंपाकघरात आढळणारं सुपरिचित आणि अत्यंत लोकप्रिय उपकरण. अमेरिकेत १९७६ सालापासून अनेक घरांमधून मायक्रोवेव्ह ओव्हन वापरण्यास सुरुवात झाली आणि आता तिथल्या सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त घरांमधून हे उपकरण वापरलं जातं.   
मायक्रोवेव्ह ओव्हन हे उपकरण जितकं लोकप्रिय तितकीच त्याची शोधकथा नाटय़मय आहे. विशेष म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध ज्यांनी लावला ते शास्त्रज्ञ पर्सी स्पेन्सर यांची जीवनकथासुद्धा तितकीच सुरस आहे.
स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या मायक्रोवेव्ह ओव्हनचा शोध लागला तो युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी. शस्त्रास्त्रे शोधून काढण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू होतं तेव्हा! दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ होता. त्या वेळी पर्सी स्पेन्सर यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रूच्या हालचालींचा वेध घेणाऱ्या अत्यंत संवेदनाक्षम रडारची निर्मिती आणि संशोधन प्रक्रिया सुरू होती.  
पर्सी स्पेन्सर यांचा जन्म १८९४ साली एका खेडय़ात झाला. वयाची दीड वर्षे पूर्ण होतात, तोच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळातच लहानग्या पर्सीला एकटं टाकून त्याची आई त्याला सोडून गेली. पुढे पर्सीचा सांभाळ त्याची आत्या आणि काकांनी केला.
वयाच्या बाराव्या वर्षी पर्सीने शाळा सोडली आणि दोऱ्याची रिळं तयार करणाऱ्या एका कारखान्यामध्ये काम करायला लागला. हळूहळू पर्सीने वेगवेगळ्या यंत्रांवर काम करण्याचं कौशल्य प्राप्त केलं आणि एखाद्या कुशल कामगाराप्रमाणे तो काम करायला लागला.
चार वर्षांनंतर त्याला असं समजलं की जवळच असलेल्या कागद कारखान्याचं विद्युतीकरण केलं जात आहे आणि विद्युतविषयक यंत्रांची जाण असलेल्या कामगारांची तिथे गरज आहे. त्या वेळी विजेचा वापर फारसा केला जात नव्हता. खेडेगावांतून तर विजेवर चालणाऱ्या यंत्रांवर काम करण्यासाठी लोक मिळत नव्हते. यंत्रं हाताळण्याचं कौशल्य आणि तंत्रज्ञानाची उपजतच आवड असलेल्या पर्सीने या कागद कारखान्यात नोकरी मिळवली. कोणतंही औपचारिक शिक्षण न घेताही काही काळातच विजेवर चालणाऱ्या यंत्रांचं ज्ञान असलेला एक उत्तम इलेक्ट्रिशियन म्हणून नावलौकिक मिळवला.
पर्सीला बिनतारी संदेशवहनात खूप रसा होता. म्हणूनच त्याने वयाच्या अठराव्या वर्षी अमेरिकन नेव्हीमध्ये नोकरी मिळवली आणि रेडिओ संदेशवहनात कौशल्य प्राप्त केलं. याच दरम्यान त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, धातूशास्त्र, त्रिकोणमिती अशा विज्ञान आणि गणितातल्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास केला.
पुढे १९३९ मध्ये लेिक्सग्टन, मॅसॅच्युसेट्स इथल्या रायथिऑन कंपनीत पर्सी स्पेन्सर नोकरी करीत होते. या कंपनीत आल्यावर जगप्रसिद्ध मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातल्या अत्यंत बुद्धिमान संशोधकांशी त्यांचा परिचय झाला. या संशोधकांच्या बरोबर झालेल्या चर्चामुळे स्पेन्सर यांनी रायथिऑन कंपनीत फोटोइलेक्ट्रिक व्हॅक्युम टय़ुबवर संशोधन सुरू केलं. रायथिऑन कंपनीच्या जडणघडणीत स्पेन्सर यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी तब्बल सात र्वष एकही दिवस सुट्टी न घेता आठवडय़ाचे सातही दिवस काम केलं. स्पेन्सर रायथिऑन कंपनीत आले तेव्हा या कंपनीत केवळ पाच कर्मचारी काम करीत होते. पण नंतर स्पेन्सर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचा व्याप इतका वाढत गेला की सात-आठ वर्षांत कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजारांवर जाऊन पोहोचली. स्पेन्सर यांच्याच पुढाकारामुळे रायथिऑन कंपनीला रडार तयार करण्याचं काम मिळालं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी ‘मॅग्नेट्रॉन’ हे उपकरण विकसित केलं होतं. सूक्ष्म तरंगलांबी असलेल्या विद्युतचुंबकीय लहरींचा वापर होत असलेलं हे उपकरण रडारला जोडल्यावर रडारची क्षमता वाढत असे. मॅग्नेट्रॉन उपकरणाचा समावेश असलेल्या रडार प्रणालीचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी रायथिऑन या अमेरिकन कंपनीकडे सोपवली. पर्सी स्पेन्सर यांच्या मार्गदर्शनाखाली रायथिऑन कंपनीने तयार केलेले १५ रडार सेट अमेरिकन सन्यानेही वापरण्यास सुरुवात केली. या रडार सेटला ‘मॅगिज’ असं संबोधण्यात आलं. ही रडारप्रणाली इतकी संवेदनक्षम होती की त्यामुळे जर्मन बोटींवर बसवण्यात आलेल्या पेरिस्कोपचासुद्धा वेध घेता येणं शक्य होत असे. या प्रणालीमध्ये ‘मॅग्नेट्रॉन’ उपकरणाची सुधारित आवृत्ती बसवण्यात आली होती. रायथिऑन कंपनीत सुरुवातीला एका दिवसात सुमारे शंभर मॅग्नेट्रॉनचं उत्पादन केलं जायचं. पण, मॅग्नेट्रॉनची कार्यक्षमता आणि उत्पादन वाढवण्यासाठी स्पेन्सर यांनी विशेष मेहनत घेतली आणि दिवसाला तब्बल २६०० मॅग्नेट्रॉनची निर्मिती केली जाऊ लागली.
दुसरं महायुद्ध संपलं तरी स्पेन्सर यांचं संशोधन कार्य संपलं नव्हतं. रायथिऑन कंपनीच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधून स्पेन्सर पाहणी करत होते. प्रयोगशाळेतल्या मॅग्नेट्रॉनसमोर ते उभे असताना त्यांना अचानक काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव झाली. काही क्षणांनंतर त्यांच्या लक्षात आलं की, आपल्या खिशात ठेवलेलं चॉकलेट वितळायला लागलं आहे. गंमत म्हणजे, हा अनुभव स्पेन्सर यांना नवीन असला तरी यापूर्वी ही गोष्ट मॅग्नेट्रॉनवर काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी अनुभवली होती. पण, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं होतं. स्पेन्सर यांना मात्र ही घटना विशेष वाटली. त्यांनी ताबडतोब मक्याचे दाणे आणायला सांगितले. मॅग्नेट्रॉनजवळ मक्याचे दाणे ठेवल्यावर काही मिनिटांतच त्यांच्या लाह्या झाल्या.
मग स्पेन्सर यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ घेऊन अनेक प्रयोग केले. या प्रयोगांतूनच मायक्रोवेव्ह ओव्हनची निर्मिती करण्यात त्यांना यश आलं. रायथिऑन कंपनीमार्फत १९४६ साली स्पेन्सर यांनी पहिला मायक्रोवेव्ह ओव्हन विक्रीसाठी तयार केला. या ओव्हनला त्यांनी नाव ठेवलं होतं- ‘रडार रेंज’! मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये विद्युत चुंबकीय लहरींच्या उत्सर्जनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या साहाय्याने अन्नपदार्थ शिजतात. हा ओव्हन दिसायला एखाद्या फ्रीजसारखा होता. त्याची उंची पाच फूट होती आणि वजन होतं तब्बल पावणेचारशे किलो! या मायक्रोवेव्ह ओव्हनची किंमत होती पाच हजार डॉलर्स. या अवजड आणि महाग उपकरणाची विक्री फारशी झाली नाही.
हळूहळू मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुधारणा होत गेल्या. दरम्यान, टप्पन स्टोव्ह या कंपनीने घरगुती वापरासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन तयार केला आणि १९५५ सालापासून त्याची विक्रीही सुरू केली. पुढे १९६७ साली रायथिऑन कंपनीने ११५ वॅट क्षमतेच्या मायक्रोवेव्ह ओव्हनची निर्मिती केली. ४९५ डॉलर्स किमतीच्या या ओव्हनची त्या काळी मोठय़ा प्रमाणावर विक्री झाली.
सध्याचे मायक्रोवेव्ह ओव्हन हे सुमारे एक हजार वॅटचे असून त्यामध्ये संगणकीय प्रणालीचा समावेश असतो. सध्याच्या धावपळीच्या काळात झटपट पदार्थ करण्यासाठी उपयुक्त असलेला मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणजे पर्सी स्पेन्सर
यांच्या जिज्ञासू वृत्तीचं फलित आहे. याच जिज्ञासू वृत्तीच्या बळावर जेमतेम सहाव्या इयत्तेपर्यंत औपचारिक शिक्षण घेतलेल्या पर्सी स्पेन्सर यांनी वेगेवेगळ्या यंत्रांची निर्मिती करून २२५ एकस्वे मिळवली.                                                      
hemantlagvankar@gmail.com