थोडेसे मागे डोकावत आठवून पाहा की, ज्या वेळेला तुम्ही सर्वोत्तम कामगिरी केली होती त्या वेळी-
तुमच्यावर कोणत्याही तऱ्हेचा दबाव नव्हता आणि सारे काही आरामात चालले होते की तुमच्यावर कामाचा खूप दबाव होता, काम आव्हानात्मक होते आणि तुमची क्षमता, कौशल्ये आणि शक्तीचा कस लागला होता?
दबाव व तणाव यातील फरक म्हणजे नियंत्रण. अनेकदा दबावाखाली असताना उत्तम काम होते. त्यामुळे आव्हाने टाळू नका, त्यांना सामोरे जा. त्यातून बरेच काही शिकता येते व आपला विकास होऊ शकतो.
ठराविक मर्यादेपर्यंत दबाव हा उपयुक्त असतो. मात्र तो नियंत्रणापलीकडे गेला की,  की तो हानीकारक ठरतो. दबाव व तणाव यातील फरक म्हणजे नियंत्रण. समस्या लक्षात घेऊन लवकर कृती करा. विलंब झाल्यास बिघाड होण्याची शक्यता असते.
अनेकदा बऱ्याच गोष्टींवर आपले नियंत्रण नसते, त्यामुळे जे करता येणे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. समस्या सोडविण्यासाठी पावले उचला. अगदी लहान रस्ता असेल, पण तो शोधून काढा. पाऊल न टाकण्यापेक्षा छोटे पाऊल टाकलेले केव्हाही चांगले.
आव्हानाला सामोरे जाताना भावनात्मक आधार तर उपयोगी असतोच, पण कधी कधी सहकाऱ्यांकडून मिळणाऱ्या सूचनांचाही उपयोग होतो. समस्येला भिडताना पर्यायी योजना तयार ठेवा. एक पर्याय यशस्वी झाला नाही तर दुसरा होईल.
आपल्याला सुखसोयींची इतकी सवय झालेली असते की, हे सगळे असतेच अशी आपण समजूत करून घेतलेली असते, पण यामध्ये थोडी जरी अडचण आली तरी आपल्याला नैराश्य येते. अर्थात या सोयींमुळे जग फार सुंदरही झालेले आहे, हेही खरेच! दिवस कसा सुरू करायचा ते आपण ठरवायचे आहे. शेवटी आपला पर्याय आपणच निवडायला आहे. विचार करून ठरवा.
(मोबाइल एमबीए – जो ओवेने, पिअर्सन, मराठी भाषांतर – डायमंड पब्लिकेशन.)