मागील लेखापर्यंत भारतीय राज्यव्यवस्थेच्या अभ्याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध कायदे व अधिनियमांचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

या विभागाचा जवळपास ७० ते ८० % भाग हा पेपर ३ वर overlap होतो. त्यामुळे या विभागाची तयारी अचूक केली की, पेपर ३चा जवळपास २५ % भागसुद्धा पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

कायद्यांमधील महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायचाच आहे. मात्र एकूणच कायद्याचा अभ्यास करताना काही मुद्दे सामान्यत: लक्षात घ्यावे लागतील.

यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले अधिनियम कसे अभ्यासायचे ते पाहू. या कायद्यामधील पुढील बाबींची कलमे समजून घ्यावीत –

  • गुन्ह्य़ाची व्याख्या
  • निकष,
  • तक्रारदार (Complainant)
  • अपिलीय प्राधिकारी,
  • अपिलासाठीची कालमर्यादा
  • दंड / शिक्षेची तरतूद
  • अंमलबजावणीची प्रक्रिया
  • विहित मुदती, पाश्र्वभूमी, असल्यास विशेष न्यायालये

या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. तसेच याबाबतच्या चालू घडामोडीही माहीत असायला हव्यात.

समाज कल्याण व सामाजिक विधि विधान

या कायद्यांपकी सामाजिक विधि विधानाचा भाग पेपर ३च्या अभ्यासाचाही भाग आहे. भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, राज्याची नीती, निर्देशक तत्त्वे यांच्या संदर्भाने या कायद्यांचा अभ्यास करायला हवा.

महिलांच्या संदर्भातील कायदे/ तरतुदी

घरगुती िहसाचार व फौजदारी कायद्यातील महिलांशी संबंधित कलमे व तरतुदी बारीकसारीक तपशिलांसहित पाहायला हव्यात. भारतीय दंड विधानातील (Criminal Procedure Code) महिलांच्या बाबतीतील गुन्ह्य़ांबाबतच्या तरतुदी बारीकसारीक तपशिलांसहित अचूक समजून घ्यायच्या आहेत. या विभागाबाबतचे प्रश्न पेपर २ व पेपर ३ मध्ये समांतरपणे विचारण्यात आलेले आहेत. यावरून याचे महत्त्व लक्षात येईल. माहिती अधिकार कायदा, २००५ मधील महिलांबाबतच्या तरतुदीही पाहायला हव्यात.

विशिष्ट समाजघटकांसाठी विधी विधान

या भागातील नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ व १९९५ च्या कायद्यांचा अभ्यास करताना वर सांगण्यात आलेल्या मुद्दय़ांबरोबरच या कायद्यांची उद्दिष्टे, अंमलबजावणी यंत्रणा व उपाययोजनांचाही अभ्यास करायला हवा. या परिपूर्ण अभ्यासाचा पेपर ३च्या तयारीमध्ये खूप उपयोग होतो.

प्रशासनविषयक कायदे व उर्वरित नागरी कायदे

प्रशासनविषयक कायदे व उर्वरित नागरी कायदे यांचा अभ्यासक्रमातील मुद्दय़ांबरोबरच याआधी चर्चा केलेल्या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास गरजेचा आहे. विशेषकरून या कायद्यांच्या अनुषंगाने घडणाऱ्या चालू घडामोडी बारकाईने पाहायला हव्यात.

  • ग्राहक संरक्षण कायदाही पेपर ३ च्या अभ्यासाच्या अनुषंगाने महत्त्वाचा आहे. यातील केंद्र, राज्य व जिल्हा अशा सर्व स्तरावरील ग्राहक संरक्षण परिषदा, केंद्र, राज्य व जिल्हा अशा सर्व स्तरावरील ग्राहक मंच आणि राष्ट्रीय ग्राहक आयोग यांची रचना, काय्रे, सदस्य, अधिकार, अपिलाची तरतूद या बाबी टेबलमध्ये तयार करता येतील. या तिन्हीमधील फरक समजून घ्यावा.
  • सायबर सुरक्षा कायदा तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम यांचेतील संज्ञा व विशिष्ट व्याख्या समजून घ्याव्यात.
  • भारतीय पुरावा अधिनियम (Indian Evidence Act) यामधील कलम फक्त १२३ चा अभ्यासक्रमात उल्लेख आहे. मात्र विषयाची व्यवस्थित समज येण्यासाठी कलम १२४ व १२५ ही समजून घेणे गरजेचे आहे.
  • कार्यालयीन गोपनीयता अधिनियम (Official Secrets Act) व RTI माहितीचा अधिकार, अधिनियम हे जवळपास परस्पर विरोधी कायदे व पुरावा अधिनियमातील ही कलमे यांचा एकत्रित व विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक आहे.
  • भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील प्रकरण २- विशेष न्यायाधीश; प्रकरण ३ -शास्ती व दंडाची तरतूद या बाबी विशेषत्वाने पाहाव्यात.