शेतीशी निगडित असलेल्या पशुपालन व्यवसायाची व्याप्ती पाहून, शेतकरी व पशुपालकांना दुधाच्या उत्पादन वाढीसाठी पशुआहार व  खाद्यविषयी सल्ला आणि कोणता आहार द्यावा, अशा आहार संतुलन कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी राष्ट्रीय विकास डेअरी बोर्ड यांनी ‘पशुपोषण मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’ कार्यान्वित केले आहे.

अ‍ॅप्लिकेशनचा वापर

  • हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पशुपालकांनी गुगल प्ले स्टोअरवरून अँड्रॉईड मोबाइलवर डाऊनलोड करून घ्यावे.
  • नोंदणी करण्यासाठी साइन अप येथे क्लिक करावे आणि शेतकऱ्याने नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाइल क्रमांक आदी माहिती भरावी.
  • यानंतर नोंदणी या बटणवर क्लिक करावे.
  • क्लिक केल्यानंतर मोबाइलधारक शेतकऱ्याला एसएमएसच्या स्वरूपात कोड क्रमांक प्राप्त होईल.
  • हा कोड समाविष्ट करून लॉग इन आयडी व पासवर्ड मिळेल.
  • लॉग इन आयडी व पासवर्ड प्रविष्ट केल्यानंतर ‘पशुपोषण मोबाइल अ‍ॅप्लिकेशन’चे मुख्य पान उघडते. या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकरी अथवा पशुपालकांना पशू नोंदणी, आहार संतुलन आणि रिपोर्ट अहवाल या उपशीर्षकाच्या माध्यमातून माहितीचा स्रोत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • पशू नोंदणी उपशीर्षकास क्लिक केल्यानंतर पशू नोंदणीसाठी बाराअंकी टॅग क्रमांक अनिवार्य आहे. यानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या नोंदणीसाठी आवश्यक असणारी माहिती भरावी. या माहितीमध्ये गाय, म्हैस, जात, वय, वेताची संख्या आणि सध्याची दूध देण्याची स्थिती असा तपशील भरावा.
  • पशू नोंदणी केल्यानंतर आहार संतुलन येथे क्लिक करावे. आहार संतुलनासाठी पशूचा तपशील, दूध उत्पादन आणि दुधाच्या फॅटचा तपशील भरावा. दुभत्या जनावरांना सध्या देण्यात येणाऱ्या आहार व खाद्याचा तपशील भरल्यानंतर आहार संतुलन बटणवर क्लिक करावे. यानंतर संतुलित आहारविषयी सल्ला, कोणता आहार कधी द्यावा व त्याची मात्रा किती असावी याचा तपशील डाऊनलोड होईल.