देशांतर्गत सुमारे १६० व्यवस्थापनविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एचबीए व व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेण्यात येते. ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या यंदाच्या ‘मॅट सप्टेंबर २०१७’ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे  प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदवीधर झालेल्या अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवी अथवा पदविका अभ्यसाक्रम करायचा असेल अशांसाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट टेस्ट म्हणजेच मॅट : २०१७ उपयुक्त ठरेल.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला बसणारे विद्यार्थी असावेत.

निवड पद्धती-  अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निर्धारित परीक्षा केंद्रावर लेखी स्वरूपात ३ सप्टेंबर २०१७ रोजी तर संगणकीय पद्धतीने ९ सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल.

अर्जदारांनी निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्था वा महाविद्यालयात उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका वा एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १४०० रु. संगणकीय पद्धतीने अथवा १४०० रु. चा ‘ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन’च्या नावाने असलेल्या व नवी दिल्ली येथे देय असणाऱ्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात प्रवेश शुल्क म्हणून पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या दूरध्वनी ०११- २४६०८५०० वर संपर्क साधावा अथवा असोसिएशनच्या https://apps.aima.in/matsept17/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१७ आहे.