विमा क्षेत्रातील व्यवसाय व नोकरी अशा दोन्ही सुवर्णसंधी उपलब्ध असणारी शाखा म्हणजे ‘प्रशिक्षण आणि विकास’ (Training & Development).

विमा क्षेत्रात मनुष्यबळ प्रशिक्षक आणि विकासकाची अखंड मागणी असते. विमा एजंट परीक्षा, सांघिक कौशल्य, विपणन व्यवस्थापन, दाव्यांचे व्यवस्थापन, विक्री विभागातील प्रशिक्षण, संभाषण चातुर्य अशा उद्योगाशी निगडित कौशल्यगुणांना नियमित प्रशिक्षणाव्दारे विकसित करावे लागते. सतत बदलत जाणारे आíथक जग, विपणनाचे अद्ययावत तंत्रज्ञान त्याबरोबर नवीन विमा प्रकार, कंपनीचे नवीन प्रकल्प, नवीन विमा उत्पादन यांची कर्मचारीवर्गास माहिती करून देणे त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागास लागणारे अंडरायटिंग, विमा दावे, वेळेचे व्यवस्थापन, भावनिक हुशारी, लोक कौशल्य असे प्रशिक्षण हा विभाग नियमित पुरवीत असतो. त्यामुळे प्रशिक्षकांच्या नेमणुकाही मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतात. अनुभवी प्रशिक्षक नोकरीप्रमाणे स्वयंरोजगाराची संधीसुद्धा उपभोगू शकतात. बऱ्याच कंपन्यांना बाहेरून उपलब्ध व्यावसायिकांद्धारे प्रशिक्षण मिळवावे लागते त्यामुळे प्रशिक्षकाला चांगल्या अनुभवानंतरही स्वतची संस्था उभारता येते.

विमा प्रशिक्षण विकास विभागात प्रावीण्य मिळविण्यासाठी अपेक्षित अभ्यासक्रम :

  • लायसेन्शिएट एक्झाम लाइफ / जनरल इन्शुरन्स फ्रॉम इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
  • असोसिएट एक्झाम लाइफ / जनरल इन्शुरन्स फ्रॉम इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
  • फेलोशिप एक्झाम लाइफ / जनरल इन्शुरन्स फ्रॉम इन्शुरन्स इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया
  • कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि लायसेन्शिएट सर्टिफिकेट परीक्षा पास आणि संगणकज्ञान.

विमा क्षेत्रातील अमर्याद संधींचा आढावा घेतला की लक्षात येते की, पुढील दशकांत विमा क्षेत्रात क्रांतिकारक बदल येऊ घातले आहे. विदेशी गुंतवणुकींची मर्यादा ४९ टक्केपर्यंत वाढवल्याने कंपन्यांना तंत्रज्ञानात विपणन शाखांना विकसित करण्याकरिता आíथक पाठबळ मिळणार आहे. भांडवली बाजारात आयुर्विमा कंपन्यांनी हजेरी लावून भागभांडवलीव्दारे भांडवलवृद्धी करणे सुरू केले आहे. आज भारतीय आयुर्विमाक्षेत्र हे जागतिक बाजारपेठेतील अव्वल स्थानावर आहे त्यामुळेच इथून पुढील काळात नोकरी-धंद्यातील असामान्य संधी हे क्षेत्र निर्माण करणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधींचा योग्य वापर करून यशस्वी करिअरचा लक्ष्यवेध करणे काळाची गरज आहे.

लेखिका सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.

fplanner2016@gmail.com

वेगळ्या वाटामध्ये पुढच्या आठवडय़ात जाणून घ्या आवाजाच्या क्षेत्रातल्या करिअरसंधी..