*   मी अमरावती विद्यापीठात

एमएससी- इंडस्ट्रियल केमिस्ट्री या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांला आहे. मला एमससीनंतर लगेच नोकरी करायची आहे. मला मित्रांकडून असे कळले आहे की, प्रॉडक्शनमध्ये १५ हजारपेक्षा पगार नाही. मला असा अभ्यासक्रम सुचवा, की जो मला उत्तम नोकरी आणि पगार मिळवून देईल.

संदीप ठाकरे

एमएससीनंतर जर तुम्हाला १५ हजारांची नोकरी लगेच मिळत असेल तर ती अवश्य करा, कारण पुढे अनुभव आणि तुमच्या कामाची गुणवत्ता व दर्जा यावर अधिक चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. यापेक्षा अधिक पगाराची थेट नोकरी मिळवायची असल्यास तुम्ही ए प्लस (आयआयएम/  जेबीआयएमएस/ सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट/ एस.पी. जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, झेविअर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट इत्यादी)संस्थांमधून एमबीए केल्यास सहजगत्या मिळणे शक्य आहे. तिसरा पर्याय हा बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सचा आहे.

 

मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे बी.ए. द्वितीय वर्षांला शिकत आहे. मला पदवीनंतर यूपीएससी व एमपीएससी या परीक्षा देता येतील का?

राहुल खडसे, गिरड, वर्धा

आपल्याला या परीक्षा देता येतील का, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, केवळ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठच नव्हे, तर देशातील कोणत्याही प्रांतातील अधिकृत म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग व शासनाने मान्यता प्रदान केलेल्या मुक्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त शाखेतील पदवी घेतलेल्या उमेदवारांना यूपीएससी, एमपीएससीसह सर्व प्रकारच्या शासकीय व निमशासकीय परीक्षा देता येतात.

 

* मी बी.कॉम पूर्ण केले आहे. यानंतर मला व्यवसाय सुरू करण्यात जास्त रस आहे. त्यामुळे मला बी.कॉमनंतर करता येणारे असे काही अभ्यासक्रम सांगा, ज्यामुळे मी स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकेन.

केतन अहिरे

स्वत:चा व्यवसाय सुरूकरण्यासाठी उपयुक्त ठरेल असा अभ्यासक्रम आंत्रप्रेनियरशिप डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन बिझिनेस आंत्रप्रेनियरशिप मॅनेजमेंट या नावाने ओळखला जातो. कालावधी- दोन वर्षे. संपर्क- http:// www.ediindia.org/PGDM-BE.html

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com

 

एआयएमएतर्फे मिळवा पीएचडीची संधी

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे व्यवस्थापन-प्रशासन(मॅनेजमेंट-अ‍ॅडमिनीस्ट्रेशन) विषयांतर्गत अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने देण्यात संशोधनपर पीएचडी करण्याची संधी मिळते. त्यासाठी नोंदणी करण्याकरिता खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता- उमेदवारांनी व्यवस्थापन, वाणिज्य, ह्य़ुमॅनिटीज, विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान वा कायदा यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. किंवा त्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांनी व्यवस्थापनशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण केलेली असावी अथवा चार्टर्ड अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी यासारखी व्यावसायिक पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय अर्जदारांना संबंधित क्षेत्रातील कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे मुंबईसह देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ११ फेब्रुवारी २०१७ रोजी घेण्यात येईल.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, निवड परीक्षेतील गुणांक व अनुभवाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची पीएचडीसाठी नोंदणी करण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे  शुल्क – अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १५०० रु.चा डिमांड ड्राफ्ट ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे आणि नवी दिल्ली येथे देय असलेला, पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- पीएचडी योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या दूरध्वनी क्र. ०११-२४६४५१०० वर संपर्क साधावा अथवा असोसिएशनच्या www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०१८.

समाजसेवेचा अभ्यासक्रम

अनेक तरुणांना, ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक कार्याची आवड असते. इच्छाही असते. पण प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे ते जमत नाही. समाजकार्याच्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला समाजातल्या या समस्यांची जाणीव होते. याला आळा कसा घालावा, विरोध कसा करावा, हे शिकायला मिळते. या सर्व प्रक्रियेतून महत्त्वाचे म्हणजे सर्वागीण विकास होण्यासाठी मदत होते. समाजोन्नतीसाठी समाजसेवक उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील नामवंत संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना चांगला निधीही मिळतो आहे. त्यामुळे समाजसेवेचा अभ्यास केल्यानंतर नोकरीच्याही अनेक संधी उपलब्ध होतात. यासाठीच निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या गोरेगाव विस्तार केंद्राने काही अल्पकालीन समाजकार्य अभ्यासक्रम राबवले आहेत.

१) पॅरा प्रोफेशन ट्रेनिंग इन सोशल वर्क

२) सर्टिफिकेट कोर्स फॉर सीनिअर सिटिझन्स इन सोशल वर्क

प्रवेशप्रक्रिया आणि अर्जाच्या माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा –

निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क, विस्तार केंद्र, सेंट पायस कॉलेज कॅम्पस, वीरवानी रोड, गेट नं. २, गोरेगाव पूर्व, मुंबई- ४०००६३. दूरध्वनी क्रमांक : २९२७१४३३/ २९२७०९८१/ ९९३०९९१९५३.