मी बीई आणि एमई पूर्ण केले आहे. आता मला यूपीएससी करायची आहे. माझे वय २८ वर्षे आहे. यूपीएससीसाठी वयोमर्यादा ३२ असल्याचे मला ठाऊक आहे. मी माझा मार्ग बदलू की नको अशी माझ्या मनात अशी भीती आहे. या वयात असा मार्ग बदलणे योग्य ठरेल का? यूपीएससीची तयारी करण्यासाठी किती वेळ लागेल?

सुप्रिया सुरवाडे

सुप्रिया, यूपीएससीची तयारी करण्यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी पुरेसा ठरू शकतो. पण इतकी तयारी केल्यावरही यशाची खात्री देता येईलच असे नाही. त्यामुळे तुझा प्लॅन बी आधीच निश्चित करून ठेवावा. तू बीई आणि एमई करण्यासाठी सहा वर्षांचा काळ घालवला आहे. त्यामुळे त्या विषयात आधीच तज्ज्ञता मिळवली आहे. आता नव्या विषयांमध्ये तितकी तज्ज्ञता मिळवणे वाटते तितके सुलभ नाही. त्यामुळे तू पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या विषयामध्येच रोजगार-स्वयंरोजगराच्या संधी कशा मिळतील यावर लक्ष केंद्रित केल्यास उत्तम ठरू शकेल.

इंडियन इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिस ही संघ लोकसेवा आयोमार्फत घेण्यात येणारी परीक्षा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बँकांना अभियांत्रिकी पदवीधरांची गरज भासते. अशा पदवीधरांना स्पेशलाइज्ड ऑफिसर्सची नियुक्ती मिळू शकते. महिला अभियांत्रिकी पदवीधरांना लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये लघु सेवा कमिशनद्वारे वरिष्ठ पदे मिळू शकतात. ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स (ॅअळए) या परीक्षेत चांगले गुण प्राप्त केल्यास सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न, महारत्नसारख्या मोठय़ा कंपन्या थेट नियुक्तीसाठी विचार करतात. पीएचडी करून संशोधनाचे क्षेत्र खुले होऊ  शकते. तुला सध्याचा मार्ग बदलायची इच्छा असेल तर त्यात गैर काही नाही. मात्र आता या टप्प्यावर अधिक परिश्रम आणि सुनियोजित धोका स्वीकारावा लागेल. ही बाब लक्षात ठेवावी.

 

माझा भाऊ  अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. त्याने एनडीएचा अर्ज भरला आहे. या परीक्षेसाठी यंदा बारावीला बसणारे विद्यार्थी बसू शकतात अशी अट आहे. माझ्या भावाला नागपूर केंद्र आले आहे. पण त्याला परीक्षेला बसू देतील ना, याबद्दल शंका वाटते. कारण तो अकरावीला आहे. कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशनसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे?

ऐश्वर्या संकपाळ

एनडीए परीक्षेला बसण्यासाठी शैक्षणिक अर्हता ही बारावी उत्तीर्ण अशी आहे किंवा बारावीची परीक्षा देत असणारे पण विशिष्ट कालावधीत निकाल अपेक्षित असणारे असेच उमेदवार बसू शकतात अशी स्पष्ट सूचना संघ लोकसेवा आयोगाने दिलेली आहे. त्यामुळे तुझ्या भावाने या परीक्षेसाठी अर्जच भरायला नको होता. तो या परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरत नाही.  कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन या परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता – १) इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी/ ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमी- कोणत्याही मान्यत्याप्राप्त संस्थेची पदवी.  २) इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- अभियांत्रिकी पदवी. ३) इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडेमी- अभियांत्रिकी पदवी किंवा कोणत्याही विषयातील पदवी, मात्र संबंधित विद्यार्थ्यांने बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम- इंग्रजी, सामान्यज्ञान आणि मूलभूत गणित.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)