मी एम. ए. करत आहे. सध्या अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज लिमिटेडमध्ये रिलेशनशिप ऑफिसर म्हणून मी कार्यरत आहे. मला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंगबद्दल सांगा. या संस्थेचे अभ्यासक्रम पूर्णवेळेचे आहेत का? की दूरशिक्षण पद्धतीने करता येईल? मला नियमित स्वरूपाचे एमबीए नोकरीमुळे करणे शक्य नाही. मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे एमबीए करू की नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंगचे एमबीए करू?

पंकज बोथीकर

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग या संस्थेची स्थापना रिझव्‍‌र्ह बँकेने १९६९ साली भारत सरकारच्या सल्ल्याने केली आहे. बँकिंग व्यवस्थेची थिंक टँक म्हणून ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (बँकिंग अँड फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस) हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी १०० टक्के प्लेसमेंट मिळाले आहे. संस्थेतील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट (कॅट) किंवा कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (सीमॅट) मधील गुणांचा आधार घेतला जातो. या दोन्ही परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करतात, त्यातील निवडक विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य चाळणी आणि  मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम

निवड केली जाते.  याचाच अर्थ असा आहे की या संस्थेत प्रवेश घेतल्यास उत्तम रोजगारीची हमी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे एमबीए अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहेत. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात त्याला कितपत महत्त्व दिले जाते, हे नक्की सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही कॅट किंवा सीमॅट परीक्षा देऊन नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग या संस्थेत प्रवेश घेणे श्रेयस्कर ठरू शकते. तुमच्या आतापर्यंतच्या  अनुभवाचासुद्धा लाभ होऊ  शकतो. संपर्क  ँ३३स्र्://स्र्ॠेि.ल्ल्र्रुेल्ल्िरं.१ॠ/

मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून एम. कॉम (बिझिनेस आंत्रप्रिन्युरशीप) हा अभ्यासक्रम केला आहे. या पदवीच्या आधारे मला शासकीय वा निमशासकीय संस्थांमध्ये कोणती संधी मिळू शकते? पुढील शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत?

विकास सांगळे

एम.कॉम (बिझिनेस आंत्रप्रिन्युरशीप) हा अभ्यासक्रम केल्यावर शासकीय वा निमशासकीय संस्थांमध्ये थेट कोणती संधी मिळू शकत नाही. तथापी तुम्ही राज्य सेवा परीक्षा देऊन शासनाच्या विविध सेवांमध्ये नियुक्त होऊ  शकता. चांगल्या संस्थेमधून एमबीए केले तर तुम्हाला चांगल्या करिअर संधी मिळू शकतात.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न  career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.