मी एमबीए करावे का? त्यातील करिअर कितपत लाभदायक असेल?

प्रजत इंगोले

एमबीए करून नक्कीच तुला उत्तम करिअर घडवता येईल. मात्र त्यासाठी तुला दर्जेदार शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक ठरते.

(१) राज्यातील एमबीए/ एमएमएस/ पीजीडीएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या २०० ते २५० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट चार संस्थांमध्ये (जमनालाल बजाज इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च, सिडनेहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, के. जे सोमय्या इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, वेलिंगकर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च)प्रवेश मिळाल्यास उत्तम प्लेसमेंट मिळू शकते.

(२) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (कॅट) द्वारे देशातील १९ आयआयएममध्ये प्रवेश मिळू शकतो. हा प्रवेश उत्तम करिअरची द्वारे खुली करणारा असतो.

(३) मुंबई, कानपूर, खरगपूर, मद्रास, दिल्ली आयआयटी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट मुंबई, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज-दिल्ली युनिव्हर्सिटी, बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानीमधील एमबीए प्रवेशाच्या प्राथमिक निवडीसाठी कॅटचे गुण ग्राह्य़ धरले जातात. अंतिम निवड समूह चर्चा आणि मुलाखतीद्वारे केली जाते.

(४) आपल्या देशात पहिल्या ३०-३५ क्रमांकावर

(रँकिंग) असणाऱ्या संस्थाही प्राथमिक चाळणीसाठी कॅटचे गुण ग्राह्य़ धरतात. या संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअर घडू शकते.

(५) सिम्बॉयसिस विद्यापीठामार्फत  सिम्बॉयसिस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- (स्पॅन) द्वारे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधील एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश देते. यातील काही संस्थांमधील प्रवेश उत्तम करिअर घडवू शकतो. उदा- सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ बिझिनेस मॅनेजमेंट, सिम्बॉयसीस सेंटर फॉर मॅनेजमेंट अ‍ॅण्ड ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट, सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,  सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल बिझिनेस इत्यादी.

(६) नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या प्रवेशासाठी (एनमॅट)- नॅशनल मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूट टेस्ट द्यावी लागते. या परीक्षेद्वारे या संस्थेच्या मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये प्रवेश मिळाल्यास चांगल्या संधी मिळतात.

(७) दिल्लीस्थित इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेन ट्रेड आणि हैदराबाद स्थित इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस, या संस्था स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतात. येथेही प्रवेश मिळाल्यास उत्तम करिअरची हमी असते.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.