मी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशनचा अभ्यासक्रम करीत आहे. सध्या शेवटच्या वर्षांला आहे. पण मला तांत्रिक बाबींशी निगडित कोणतीही नोकरी करण्यात रस आहे. मग मी काय शिकायला पाहिजे

अनुप नाचणकर

आता साधारणत: तीन वर्षे सध्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घालवल्यानंतर नव्या क्षेत्रात जाणे हे निश्चितच उपयुक्त ठरणारे नाही. कारण कोणत्याही तांत्रिक बाबींमध्ये नोकरी करायची असल्यास त्यासाठी त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. शिवाय त्यात उत्तम कौशल्यही प्राप्त करावे लागेल. असे कौशल्य नसेल तर तुम्ही ग्राहकास उत्तम सेवा देऊ  शकत नाही. त्यामुळे चांगले करिअर घडणे अशक्य होऊन बसते. तथापि आयटीआय किंवा तंत्रनिकेतनमधील ज्या तांत्रिक बाबतीत (उदा- रंगारी/ इलेक्ट्रिशिअन/ वेल्डिंग/ इलेक्ट्रिक मेंटेनन्स/ सुतारकाम/ रेफ्रिजरेटर-टीव्ही-एसी दुरुस्ती व देखभाल इत्यादी) आवड असेल असे अभ्यासक्रम करू शकता. एम.एस ऑफिस अभ्यासक्रम करून डेस्क टॉप पब्लिशिंग, ले-आऊट/ डिझायनिंग या क्षेत्रातही करिअर करू शकता.

मी विज्ञान शाखेत अकरावीमध्ये शिकत आहे. पण मला पुढे यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे. त्याची तयारी कशी करू?

अभिषेक लोंढे

यूपीएससीची परीक्षा म्हणजे तुझ्या मनात नागरी सेवा परीक्षा ही असली पाहिजे. ही परीक्षा देण्यासाठी संबंधित उमेदवाराने पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे तुला आणखी पाच वर्षांनी ही परीक्षा देता येईल. नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी तू सध्या बारावीपर्यंतच्या सर्व विषयांची उत्तम तयारी करून ठेव. त्यासाठी एनसीईआरटीची पुस्तके उपयुक्त ठरतील.

त्यामुळे तुझा पाया मजबूत होईल आणि प्राथमिक व मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन विषयाचा पेपर सोडवताना त्याचा चांगला उपयोग होईल. दर्जेदार वृत्तपत्रांचे नियमित वाचन कर. तसेच इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करावेस.

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले आहे. मला कायदेविषयक अभ्यास करण्याची इच्छा आहे. एलएलबी करावे असे वाटते आहे. या टप्प्यावर मी हा निर्णय घेऊ की नको? मुळात मला आत्ता एलएलबी करणे शक्य आहे का?

सिद्धार्थ फुलमाळी

हा निर्णय घ्यावा की नाही हे सर्वस्वी तुझ्यावर अवलंबून आहे. तुला आता कायद्याचा अभ्यास करणे शक्य आहे. त्यासाठी एलएलबीला प्रवेशही घेता येईल; परंतु त्यासाठी एमएच-सीईटी-लॉ ही परीक्षा द्यावी लागले. ती उत्तीर्ण झाल्यास पुढे तुझ्या गुणांनुसार खासगी किंवा सरकारी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. यानंतर तीन वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम करता येईल. करिअरसाठी आत्तापर्यंत तू अभियांत्रिकीसाठी घालवलेली वर्षे अधिक ही तीन वर्षे पुढे तुला द्यावी लागतील. त्यामुळे हा सगळा वेळ वगैरे ध्यानात घेऊनच तू पुढे निर्णय घ्यावास. तुला एमएच-सीईटी-लॉ ही परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेतील गुण आणि रँकिंगनुसार तुला शासकीय वा खासगी विधी शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळू शकतो.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.