आपल्या देशात भूगर्भशास्त्रासाठी कोणत्या संधी आहेत? मी भूगर्भशास्त्रात बी.टेक करण्याचा विचार करत आहे. भूगर्भशास्त्रज्ञ झाल्यावर मला व्यवसाय सुरू करायचा आहे. मी कोणता अभ्यासक्रम करू की बी.टेक करून त्यानंतर एमबीए अथवा पीएचडी करू?

-ईशान नकटे

ईशान, भूगर्भशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्डात विविध संधी मिळू शकतात. कोल इंडियाच्या आणि इतर खाणींच्या विविध उत्खनन आणि इतर प्रक्रियांसाठी भूगर्भशास्त्रज्ञांची गरज भासते. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, हिंदुस्थान झिंक, मिनरल एक्सप्लोरेशन अथॉरिटी, भारत पेट्रोलियम कॉपरेरेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, मिनरल्स अँड मेटल्स ट्रेडिंग कॉपरेरेशनमध्ये या विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. संघ लोकसेवा आयोगामार्फत कम्बाइंड जिओसायंटिस्ट अँड जिओलॉजिस्ट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेद्वारे वरिष्ठ श्रेणीच्या पदांवर नियुक्ती केली जाते. राज्य शासनामध्ये भूगर्भशास्त्रज्ञांची गरज भासत असते. तुला बी. टेकनंतर व्यवसाय करण्यात रस असेल तर एमबीए करण्यास हरकत नसावी. एमबीएमुळे विक्री, विपणन, मनुष्यबळ, वित्त या बाबींच्या व्यवस्थापन तंत्र आणि कौशल्याचे ज्ञान प्राप्त होते. त्याचा उपयोग व्यवसाय उभारणीसाठी होऊ  शकतो.

मी विधी पदवीधर असून मला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स/लॉ अँड डिप्लोमसी हा अभ्याक्रम करावयाचा आहे. त्यासाठी मला भारतातील चांगल्या संस्थांची माहिती द्यावी. दूरशिक्षण पद्धतीने असा अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थेची माहिती द्यावी. हा अभ्यासक्रम केल्यावर कोणत्या करिअर संधी मिळतील?

-पूनम खेडकर

द इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ, या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनॅशनल लॉ अँड डिप्लोमॅसी हा एक र्वष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही संस्था १९५९ सालापासून कार्यरत आहे.

संपर्क – इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ, व्ही. के. क्रिष्णामेनन भवन, ९, भगवान दास रोड ,दिल्ली- ११०० ०१, दूरध्वनी-०११-२३३८४४५८, संकेतस्थळ- http://www.isil-aca.org

ईमेल-info@isil-aca.org. हा अत्यंत स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम आहे. पण तो केल्यावर लगेच चांगल्या करिअर संधी उपलब्ध होतीलच असे ठामपणे सांगता येत नाही. तथापी या ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यांना स्वत: समाजमाध्यमे, लिंक्डइन सारख्या नेटवर्किंग साइट, टाइम, इकॉमॉनिस्टसारखी नियतकालिके, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संकेतस्थळावरील करिअरविषयीच्या विभागावर सतत लक्ष ठेवावे लागेल. इंग्रजी नियतकालिके, दैनिके यांना या विषयावर दर्जेदारपण लिहिणाऱ्यांची गरज भासते. तोसुद्धा एक चांगला पर्याय असू शकतो.