सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला यूपीएससी द्यायची आहे. त्याच्या तयारीसाठी काय करावे लागेल? मला बारावीमध्ये किती गुण मिळवावे लागतील?

मंगेश शिंदे

मंगेश, यूपीएससीच्या परीक्षेला बसण्यास पात्र होण्यासाठी पदवी परीक्षेत किमान गुण लागतात. दहावी आणि बारावीमध्येही किमान गुण मिळाले तरी ते पुरेसे असते. यूपीएससीची परीक्षा तुमच्या ज्ञानातील सखोलता पाहते. पदवी परीक्षेत पहिला आलेला विद्यार्थी यूपीएससीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईलच असे ठामपणे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे पदवी परीक्षेत जेमतेम कामगिरी करणारा विद्यार्थी यूपीएससीत उत्तम कामगिरी करणारच नाही, असे सांगता येत नाही. दहावी/ बारावी/ पदवी परीक्षेतील गुणांच्या पलीकडे जाऊन संबंधित उमदेवाराची प्रशासक बनण्याची पात्रता यूपीएससी परीक्षेत बघितली जाते. यांत्रिकी पद्धतीने अभ्यास केल्यावर अनेकदा बोर्ड वा विद्यापीठातील परीक्षेत खूप गुण मिळू शकतात. पण यूपीएससीचे तसे नाही. त्यामुळे १२वी आणि त्यापुढील परीक्षा देताना विषयांचा सर्वागीण व परिपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. विषयांच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी, तसेच धडय़ांच्या शेवटी दिलेले संदर्भसाहित्य अभ्यासण्यासाठी कष्ट घ्यावे लागतील.

सध्या तरी या बाबी यूपीएससीच्या तयारीसाठी पुरेशा आहेत.

 

मी बांधकाम पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम केला आहे. मला शासकीय किंवा खासगी क्षेत्रात कुठली नोकरी मिळू शकते?

कपिल घनवटे

कपिल, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद , सिडको, म्हाडा यांच्या बांधकाम विभागात तुझ्या पदविकेच्या अर्हतेवर तुला नोकरी मिळू शकते. मात्र बांधकाम पर्यवेक्षक या पदासाठी पदभरती ही काही सतत होत नाही. त्यामुळे अशा पदांच्या जाहिरातीकडे तुला सतत लक्ष ठेवावे लागेल. वेगवेगळ्या बांधकाम कंपन्या, गृहनिर्माणात असणाऱ्या कंपन्यांना बांधकाम पर्यवेक्षकांची गरज लागू शकते. मात्र त्यासाठी तुला स्वत: प्रयत्न करावे लागतील. या क्षेत्रातील मित्र/ सहकारी/ ओळखी-पाळखीच्या व्यक्ती यांच्या संपर्कातून अशा संधीची माहिती मिळू शकते.

 

मी यंदा १२वीची परीक्षा दिली आहे. मला फूड टेक्नॉलॉजी करण्याची इच्छा आहे. 

यश पाटील

सध्या आपल्या देशात अन्नप्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता आहे. फूड टेक्नॉलॉजी केलेल्या विद्यार्थ्यांना चांगले भविष्य आहे. मुंबईमध्ये असलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये बी.टेक इन फूड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हा दर्जेदार अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- मेन, या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. मात्र त्यासाठी या संस्थेचा अर्ज स्वंतत्ररीत्या भरावा लागतो. अशा प्रकारे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्यानुसार प्रवेश दिला जातो.

संपर्क- नाथेलाल पारेख मार्ग,

माटुंगा मुंबई- ४०००१९,

दूरध्वनी- ०२२-३३६१११११,

संकेतस्थळ- http://www.ictmumbai.edu.in

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com