आजच्या जागतिकीकरणाच्या युगात मनोरंजनाचा मोठा प्रपात विविध वाहिन्यांद्वारे सुरू आहे. याचा परिणाम आपल्या संस्कृतीवर झाला आहे. पूर्वी आदिवासी संस्कृती, ग्रामीण संस्कृती आणि नागर संस्कृती अशी संस्कृतीची तीन पदरी विभागणी करता यायची, आता मात्र या तीनही संस्कृतीची सरमिसळ झाली असून, लोकल ते ग्लोबल हा चौथा स्तंभ तयार झाला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य, विज्ञान, कला शाखांसोबतच संस्कृतीच्या वाहक अशा प्रयोगात्म कलांचेही आकर्षण निर्माण झाले आहे. नाटक, चित्रपट, नृत्य, कंठसंगीत, वाद्यसंगीत यांच्यासोबतच लोककलांचे आकर्षणही वाढू लागले आहे. हिंदी, मराठी वाहिन्यांवरील रिएॅलिटी शोमधून लोकसंगीत आणि लोकनृत्याच्या स्पर्धा अगदी हमखास असतात इतकेच काय तर अनेक चित्रपटांना आणि नाटकांना लोककलांचे अपूर्व योगदान लाभले आहे.
लोककलांना आजवर लोकमान्यता आणि राजाश्रय होताच पण एके काळी गावच्या वेशीबाहेरच्या कला अशी संभावना झालेल्या या लोककलांना विद्वत मान्यता प्राप्त झाली ती सुमारे १५७ हून अधिक दीर्घ वर्षांची परंपरा असणाऱ्या मुंबई विद्यापीठात. सन २००४ साली तत्कालीन कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाने लोककलेचा पदव्युत्तर पदविका पातळीवरचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात लोककला अकादमीच्या रूपाने सुरू झाला. लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी या अकादमीची धुरा हाती घेतली. आज या अकादमीत १० वर्षांच्या वाटचालीत सुमारे ३०० विद्यार्थी लोककलेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्यातून आपले यशस्वी करिअर घडवू शकले आहेत. या अकादमीत साहाय्यक प्राध्यापक म्हणून प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे व प्रा. मोनिका ठक्कर कार्यरत आहेत.
लोककलेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांची मांदियाळी हे लोककला अकादमीचे वैशिष्टय़ म्हणता येईल. अकादमीच्या सल्लागार समितीवर असलेल्या लोकशाहीर विठ्ठल उमप, महाराष्ट्र शाहीर कृष्णराव साबळे, डॉ. जब्बार पटेल, प्रा. वामन केंद्रे यांचे अपूर्व मार्गदर्शन लाभले होते. डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. तारा भवाळकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. मधुकर वाकोडे, डॉ. यशवंत पाठक, डॉ. रामचंद्र देखणे असे या क्षेत्रातील दिग्गज अभ्यासक विद्यार्थ्यांना मागदर्शन करीत असतात. ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या चंदाबाई तिवाडी, भारूडरत्न निरंजन भाकरे, डॉ. तुलसी बेहेरे, प्रख्यात नृत्यदिग्दíशका दीपाली विचारे, डॉ. शत्रुघ्न फड, शाहीर सुरेश जाधव, शाहीर देवानंद माळी, लावणीसम्राज्ञी छाया-माया खुटेगावकर, राजश्री नगरकर, छगन चौगुले, कमलबाई शिंदे, असे कलावंत, अभ्यासक विद्यार्थ्यांना अकादमीत प्रात्यक्षिके शिकवीत असतात. लोकवाद्य, तालवाद्यांचे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक विजय चव्हाण, कृष्णा मुसळे, नृत्याच्या प्रशिक्षण देणाऱ्या हेमाली शेडगे, गायनाचे प्रशिक्षण देणारे मदन दुबे, अभिनय प्रशिक्षक योगेश चिकटगावकर यांनी अकादमीतील विद्यार्थ्यांना मनोरंजन क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतील या दृष्टीने अथक प्रयत्न केले आहेत.
गोंधळ, जागरण, तमाशा, भारूड, दशावतार, शाहिरी अशा प्रयोगात्म लोककलांचे प्रशिक्षण अकादमीत दिले जाते. या प्रयोगात्म लोककलांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रात, मनोरंजन क्षेत्रात करिअरच्या संधी प्राप्त होतात. वृत्तपत्र क्षेत्रात सांस्कृतिक प्रतिनिधी, शासकीय निमशासकीय संस्थांत कार्यक्रम अधिकारी, समन्वयक, शाळा-महाविद्यालयांमध्ये संगीत नृत्यशिक्षक, संशोधन संस्थांमध्ये संशोधन समन्वयक, दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात पूर्णवेळ व्यावसायिक कलावंत अशा संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होतात.
कुठल्याही शाखेचा पदवीधर या पदव्युत्तर पदविकेचे लोककलांचे शिक्षण घेऊ शकतो. लोककला अकादमीत लोककलांचे संशोधन केंद्र शाहीर अमरशेख अध्यासन अस्तित्वात आहे.
पीएच.डी. चे केंद्रही लोककला अकादमीत सुरू असून बारावीनंतरचा लोककलांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू आहे. यामध्ये लोकवाद्य वादन, लोकनृत्य, लोकगीत गायन, लोकनाटय़ असे प्रशिक्षण दिले जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात हमखास करिअरच्या या अभ्यासक्रमाने संधी प्राप्त होऊ शकतात.
अधिक माहितीसाठी ०२२-२२८७१७८८ या क्रमांकावर अथवा खालील पत्त्यावर संपर्क साधावा लोककला अकादमी, तिसरा मजला, विद्यापीठ विद्यार्थी भवन, पं. शोभनाथ मिश्रा मार्ग (बी. रोड), चर्चगेट, मुंबई-४०००२०
विकास कोकाटे
(लेखक शाहीर अमरशेख अध्यासन केंद्रात सह-समन्वयक (संशोधन) आहेत.)

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये