* मला दहावीत ८५ टक्के आणि बारावीला ५०.४६ टक्के गुण मिळाले होते. मला आर्किटेक्चर करायचे होते. परंतु गुण कमी पडले. मी बी.एस्सीला मायक्रोबॉयलॉजी हा विषय घेतला. आता कोणता विषय निवडू? मला कशामध्ये जास्त वाव आहे? नोकरीची संधी आहे का? मी योग्य मार्ग निवडला आहे ना? कारण मी असे ऐकले आहे की, मुलींना मायक्रोबायोलॉजीमध्ये कमी संधी आहेत. खरेच असे आहे का?                          

– अक्षदा जाधव

मुलींना मायक्रोबायोलॉजीमध्ये कमी संधी आहेत, असे ज्या कुणी तुला सांगितले, तो तुझा हितकर्ता नाही, असे समज. आजच्या काळात मायक्रोबायोलॉजीच काय, कोणत्याही विषयात मुलींना संधी नाहीत, असे नाही. प्रत्येक क्षेत्रात मुलगे आणि मुली आपापल्या कतृत्वाने पुढे जात आहेत. तू मायक्रोबायोलॉजी हा विषय जर विचारपूर्वक घेतला असशील तर नक्कीच त्यात करिअर आहे. अभ्यासात स्वत:ला झोकून दे. अर्धवट मनाने अभ्यास करू नकोस. त्यामुळे कदाचित गुण मिळतील पण ज्ञान नाही. आजच्या काळात परीक्षेतील गुणांइतकेच किंवा त्यापेक्षा अधिक तुमच्या जवळच्या ज्ञानाचा तुम्ही कसा प्रभावीरीत्या उपयोग करू शकता, यावर करिअरसंधी मिळणे व त्यात प्रगती होणे अवलंबून असते. मायक्रोबायोलॉजी विषयात एमएस्सी किंवा पीएच.डी. केल्यास तुला संशोधन, अध्यापन, औषधी निर्माण, क्लिनिकल रिसर्च, डेअरी इंडस्ट्री, अन्नप्रक्रिया उद्योग या क्षेत्रांत संधी मिळू शकते.

*  माझे हार्डवेअर नेटवर्किंग झाले आहे. मला एमबीए करायची इच्छा आहे.  मी बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षांला आहे. भविष्यामध्ये एमबीएमधील कोणत्या शाखेला जास्त मागणी राहील?           

– शुभम कुलकर्णी

एमबीए करण्यासाठी तुम्हाला कॉमन एन्ट्रन्स टेस्ट, मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, झेवियर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, कॉमन- मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, एनमॅट-नरसी मोनजी मॅनेजमेंट अ‍ॅप्टिडय़ूट टेस्ट, स्नॅप- सिम्बॉयसीस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, एमएच-सीईटी-एमबीए यापैकी कोणतीही एक परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे लागेल. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, कार्यकारण भाव, अंकगणित, माहिती विश्लेषण यावरील वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी भरपूर तयारी व सतत सराव करावा लागेल. एमबीएला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पसंतीक्रम फायनान्स, मार्केटिंग, ह्य़ुमन रिसोर्स अशा क्रमाने दिसून येतो. तथापी आपणास कोणत्या विषयात गती आणि रस आहे यावरसुद्धा स्पेशलायझेशन निवडणे उचित ठरू शकते.