दीपकनं फॉर्म पाहिला आणि त्याची पहिली प्रतिक्रिया, ‘‘ईमेल नीट वाचलीत का? त्यात काय काय अटॅचमेन्ट्स सांगितल्या आहेत?’’
‘‘सगळ्या जोडल्या आहेत.’’ फॉर्म देणारा निखिल म्हणाला.
‘‘तुम्ही लोक दिलेली माहितीही नीट वाचत नाही. आता मीच सांगायचं तुम्हाला काय राहिलं ते.’’
‘‘खरंच सगळं जोडलंय.’’
‘‘हे पहा, इकडे काय लिहिलंय? इन्श्युरन्स असल्यास रिसीटची कॉपी जोडावी लागते. जोडली आहेत का?’’
‘‘सॉरी, आणतो.’’
‘‘सॉरी आणतो! म्हणे सगळं जोडलंय. ऽऽऽ वाचत नाहीत नीट आणि फुकट वेळ घालवतात.’’ दीपक कचकचला.
निखिलनं त्याला मग इन्श्युरन्स रिसीटची कॉपी आणून दिली. निखिल आपल्या जागी जाऊन बसला. काही क्षणातच त्याला नेहा त्याच्या क्युबिकलजवळ उभी राहून त्याच्याकडे पाहताना दिसली.
‘‘काय म्हणतोय दीपक?’’ नेहानं ‘दीपक’ शब्दावर विशेष जोर देत विचारलं.
‘‘काय वेगळं म्हणणार आहे? जातिवंत कटकटय़ा आहे मेला.’’
‘‘अरे, तो त्याचं काम करतोय.’’ नेहाचा सूर चिडवण्याचा होता.
‘‘करू दे ना काम, पण जरा प्रेमानं बोलला तर काय बिघडणार आहे का?’’ निखिलनं वैतागून म्हटलं.
‘‘अरे, तो कसा आहे माहिती आहे ना तुला? तू कशाला त्रास करून घेतोस?’’
‘‘असं म्हणणं सोपं आहे, पण त्रास होतो तो होतोच’’
इतक्यात शेजारच्या क्युबिकलमधला रवी उठताना दोघांना दिसला. त्याच्या हातातले इन्व्हेस्टमेन्ट प्रूफ्सचे कागद पाहून निखिल व नेहाला कळलं, तोही दीपककडे चालला आहे.
‘‘ऑल द बेस्ट!’’ निखिलनं रवीला विश केलं.
‘‘का? काय झालं?’’ रवी कंपनीत नवा लागला होता. त्याला दीपकबद्दल फार माहिती नव्हती.
‘‘जाऊन ये, मग बोलू.’’ निखिल त्याला म्हणाला. नेहा नुसतीच हसत होती. प्रश्नार्थक चेहऱ्यानं मग रवी गेला.. आणि दोन मिनिटांतच परत आला. त्याचाही चेहरा त्रासलेला दिसला.
‘‘अरे, या दीपकला लाइफमध्ये काय प्रॉब्लेम आहे रे?’’ रवी आल्या आल्या कचकचला.
आता नेहाबरोबर निखिलही हसू लागला. स्वत:चा कटू अनुभव तो विसरूनही गेला होता. अगदी छोटय़ा अशा या कंपनीत दीपक अकाऊंटस्, फायनान्स आणि थोडंफार कायदा पाहतो. नोकरीला लागला तेव्हा त्याला ४-५ वर्षांचाच अनुभव होता. व्यवसाय छोटा असल्यामुळे सुरुवातीला सगळं काही तोच पाहत होता. लोकांचे पगार, टी.डी.एस., इन्कम टॅक्स फायलिंग, व्हेंडर पेमेन्ट्स, शॉप एस्टॅब्लिशमेन्ट लायसन्स अशी अनेक कामं असत. दीपकनं सी.ए. पूर्ण केलं आणि एक-दोन मोठय़ा कंपन्यांमध्ये काही र्वष नोकरी केली. त्यानंतर मग ही संधी आली. कंपनी छोटी असूनही सगळी जबाबदारी त्याच्यावर असणार या कारणानं त्यानं ही नोकरी घेतली. छोटय़ा कंपनीत अनेक गोष्टी स्वत:च कराव्या लागतात आणि त्यामुळं शिकायला खूप मिळतं हे त्याला पक्कं माहीत होतं.
स्वत: सी.ए. असल्यानं दीपकला अर्थविषयक चांगलं ज्ञान होतं. नोकरी करत करत एल.एल.बी.पण त्याचं होत आलं होतं. अल्पावधीत त्यानं कायद्याच्या बाबतीतही स्वत: खूप मेहनत घेऊन चांगला जम बसवला होता. दीपकला या कंपनीत पाच-एक वर्षे होऊन गेली. आता तो कंपनीचा रीतसर फायनान्स आणि लीगल हेड होता. आर्थिक आणि कायदेशीर बाबींमध्ये कंपनीच्या सगळ्या आंतरिक आणि बाहय़ गरजा नीट पुऱ्या होत होत्या. काळवेळेचं बंधन असणाऱ्या कायदेशीर तरतुदीही वेळच्या वेळी न चुकता पुऱ्या केल्या जात होत्या. सगळं काही वक्तशीर आणि काटेकोरपणे होत होतं. त्याच्या हाताखाली आता एक मॅनेजर कुणाल आणि त्याच्याखाली छोटीशी चार जणांची टीमही बनली. कुणालही दीपकसारखा ७-८ वर्षांचा बाहेरचा अनुभव घेऊन इथे जॉइन झाला होता.
कुणालचा पहिलाच दिवस होता. रवी काही कामानिमित्त अकाऊन्ट्समध्ये शिरत असताना कुणालनं त्याला विचारलं, ‘‘काय काम आहे?’’
रवी म्हणाला,‘‘हाऊसिंग लोनबद्दल चौकशी करायची होती.’’
‘‘मला थोडा वेळ द्याल का? मी नवा आहे, पण माहिती करून तुम्हाला सांगतो, कसं?’’
रवीला काही बोलायला सुचलंच नाही. स्वत:ला कळायच्या आधीच तो हो म्हणत परतला. कुणालचा मग रवीला दोन तासांतच फोन आला, भेटायला या सांगणारा. अकाऊन्ट्समधून आपल्याला फोन आला या कल्पनेनेच रवीला गहिवरून आलं. कुणालनं मग रवीला हाऊसिंग लोनबद्दल संगतवार माहिती दिली.
रवीनं हा किस्सा दहा जणानां तरी रंगवून रंगवून सांगितला. हळूहळू ही गोष्ट पसरत गेली. जो तो अकाऊंट्समध्ये शिरायचा तो थेट कुणालकडे धडक मारायचा आणि कुणालनं कुणालाच कधी हिणवलं नाही. कुणाशी कुत्सितपणे बोलला नाही, किंबहुना अतिशय प्रेमानं तो प्रत्येकाला त्याच्या कामासंबंधी काय करावं लागेल, काय जोडावं लागेल, काम पुरं व्हायला किती वेळ लागेल.. सगळी सविस्तर माहिती द्यायचा. कुणालचे लोकांना न चुकता फोन यायचे, माहितीसाठी असो, रिमाइंडर म्हणून असो. कुणालकडं रोजच्या व्यवहारांची सगळी जबाबदारी होती. त्यानं मग सगळी सूत्रं स्वत:च्या हातातच घेतली. त्यानं स्वत:चं उदाहरण समोर ठेवून त्याच्या टीमची कामाकडं पाहण्याची वृत्ती हळूहळू मुळातून बदलायला सुरुवात केली. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झाला. कंपनीतल्या लोकांची फायनान्स डिपार्टमेन्टबद्दलची अढी खूप कमी झाली.
एकदा दीपकनं कुणालला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. ‘‘कसं चाललंय काम?’’ दीपकनं प्रश्न विचारला.
‘‘सर, चांगलं चाललंय. लोकांची कामं होताहेत, त्यानिमित्तानं मलाही खूप शिकायला मिळतंय.’’
‘‘हं.. खूप प्रेमानं वागता म्हणे तू आणि तुझी टीम सगळ्यांशी.’’
‘‘तसं विशेष असं काही नाही. लोकांना सेवा दिली की खूप छान वाटतं. सर, काम तर तेच असतं, ते करावंही लागणार असतं. मग थोडं प्रेमानं वागलं तर सगळाच अनुभव किती छान सुखद होऊन जातो, नाही?’’
‘‘हं! ते ठीक आहे. फक्त एवढं लक्षात असू दे की, लोकांना खूश करणं हे आपलं काम नाही. लोकांनी नियम पाळणं महत्त्वाचं आहे. कुणाला नीट नियम वाचायचे नसतात, समजून घ्यायचे नसतात. नीट सविस्तर माहिती दिली तरी ती पाहायची नसते. प्रत्येक जण स्वत:चा फायदा करून घ्यायला नियमात काही ना काही उणिवा शोधत असतो. लोक गोड बोलतील आणि आपल्याला फसवतील. त्यामुळे फार प्रेमळ वगैरे असायची गरज नाही. कडक राहायचं. लक्षात ठेव, लोकांनी नियम पाळावेत हे पाहण्याचा आपल्याला पगार मिळतो.’’
हलकं हसत कुणाल ‘‘हो सर’’ म्हणाला. त्याच्या मनात मात्र विचार येऊन गेला.. ‘लोकांसाठी नियम असतात का नियमांसाठी लोक?’
इतक्यात दीपकचा फोन खणखणला.
‘‘हो सर, तो माझ्यासमोर आहे. मी घेऊन येतो त्याला. काय म्हणालात? हो सर. त्याला पाठवतो सर.’’
दीपकच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती.
‘‘तुला एम.डी. सरांनी बोलावलंय.’’
‘‘मला? तुम्ही सांगा कधी जायचं ते?’’
‘‘तुला एकटय़ाला बोलावलंय. आता.’’ पुढचे काही क्षण नुसताच सन्नाटा होता!
‘‘मे आय कम इन सर?’’ कुणालनं एमडींचं दार हलकं उघडत विचारलं.
‘‘ये ये कुणाल. बैस. कसा आहेस?’’
कुणालनं नुसतीच मान हलवली.
‘‘तुझं खूप कौतुक ऐकतोय अलीकडे. अकाऊंट्स डिपार्टमेन्टमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल. कुणाल, फायनान्स आणि कायदा/नियम कळणं ही एक बाब झाली; पण त्या ज्ञानाचा लोकांना अडथळा न होता त्यांची सोय होणं महत्त्वाचं. तू अकाऊंट्स डिपार्टमेन्टला सव्‍‌र्हिस डिपार्टमेन्टचं स्वरूप आणलंस. नियमांवर नुसतं बोट ठेवायचं आणि स्वत:ची जबाबदारी संपली असं समजायचं ही आजवरची वृत्ती तू बदलून ती एखाद्याचं काम कसं ‘होईल’ हे पाहणारी सकारात्मक बनवलीस.’’
‘‘धन्यवाद सर!’’
‘‘आपण आता एक स्वतंत्र नवी एक्सपोर्ट डिव्हिजन सुरू करतो आहोत.’’
‘‘वा, छान.’’
‘‘तिचं अकाऊंट्स, फायनान्स आणि लीगल तू पाहावंस अशी माझी इच्छा आहे. यू विल डिरेक्टली रिपोर्ट टू मी.’’
कुणाल स्तंभित होऊन नुसताच त्यांच्याकडं पाहत राहिला. त्याला काहीच बोलायला सुचेना.
मिलिंद पळसुले – palsule.milind@gmail.com