वरिष्ठ अधिकारी व्ही.पी. दासनी परदेशी शिष्टमंडळाच्या भारतभेटीची सगळी सूत्रं स्वत:च्या हातात घेतली. जर्मनीहून येणारं हे शिष्टमंडळ भारतात त्यांच्या मोटार गाडय़ांसाठी काही अभियांत्रिकी भागांच्या शोधात येत होतं. दास काम करीत असलेल्या कंपनीचंही नाव त्यांनी ऐकलं होतं. येणाऱ्या जर्मन शिष्टमंडळावर चांगली छाप पाडणं अतिशय गरजेचं होतं. ही भेट त्यामुळे फार महत्त्वाची होती. दासनी आशय आणि कुणालला केबिनमध्ये बोलावून घेतलं. आपल्याला नेमकं कशा प्रकारचं सादरीकरण कंपनीसमोर करायचं आहे, याची साधारण कल्पना दिली. ते दोघं मग त्यावर काम करायला निघून गेले. दासना माहीत होतं की, एकदा आशयला हे काम दिलं की त्याला फार काही सांगावं लागणार नाही. तो प्रचंड हुशार आहे, त्याला उत्पादनाची सगळी वैशिष्टय़े माहीत आहेत आणि ते सादर कसं करायचं, हेही सांगावं लागणार नाही. आशयला ग्राहकावर छाप कशी पडेल हेही अगदी नीट कळतं. पुढच्या काही तासांतच आशयचं सादरीकरण तयारही होईल .. दासना खात्री होती.
सगळे येऊन बसल्यावर कुणालने प्रेझेन्टेशनला सुरुवात केली. दासनी आशयलाही बसायला सांगितलं होतं, काही लागलं तर म्हणून. पुढचा अर्धा तास मग कुणालने पाहुण्यांना आपल्या कंपनीचा इतिहास, तंत्रज्ञानातला लक्षणीय प्रवास आणि विशेष करून हे शिष्टमंडळ ज्या प्रकारच्या अभियांत्रिकी भागांच्या शोधात होतं त्याच्या उत्पादनातील आपल्या कंपनीचा हातखंडा .. सगळं काही नीट सविस्तरपणे आणि नेमकेपणे सांगितलं. सर्वाच्या चेहऱ्यावर कौतुक आणि आतुरता दिसत होती. दासनीही ती अचूक टिपली आणि पाहुण्यांना आणखीन वेळ असल्यास जेवण करून कंपनीचा फेरफटका मारण्याचं आमंत्रण दिलं. आशयने बनवलेल्या सादरीकरणामध्ये सगळं काही होतंच, त्यामुळे
उत्पादनासंबंधी फार प्रश्न आलेच नाही. त्यांना मग पुढच्या आर्थिक चर्चा करायच्या होत्या. दासनी कुणाल आणि आशयला धन्यवाद दिले आणि ते दोघे बाहेर आले.
कुणाल आपल्या जागी परतताना वाटेत आशयच्या जागेपाशी थांबला आणि त्यानं आशयच्या पाठीवर थाप मारत त्याला म्हटलं, ‘‘धन्यवाद मित्रा! तू तयार केलेलं ते सादरीकरण फारच छान झालं होतं. पाहुणे मंडळी खूश झाली. फार फाफटपसारा न करता नेमक्या शब्दांत माहिती दिल्याबद्दल तुझे खास आभार. ’’
‘‘छान. अरे जर्मन लोकांना कुठलाही भंपकपणा आवडत नाही. नेमकी आणि उपयुक्त, योग्य माहिती त्यांना आवडते.’’
‘‘खरं आहे. पण..,’’ कुणाल थांबला.
‘‘काय झालं?’’ अशयनं विचारलं.
‘‘नेहमीचंच रे! आशय, एवढं सगळं केलंस, तर हे सादरीकरण पाहुण्यांना तूच दाखवायचंस ना.’’
‘‘अरे तू आहेस ना. तू छानच करतोस.’’
‘‘तसं नाही. अरे एवढी मेहनत घेतलीस ती दिसू दे ना लोकांना.’’
‘‘अरे ठीक आहे. शेवटी पाहुणे खूश होते ना?’’
‘‘अरे खूश म्हणजे काय सांगू .. तू बघितलंसच.’’
‘‘बस, मग झालं तर ..’’
कुणालच्या मनात पुन्हा एकदा येऊन गेलंच . ‘इतकं छान काम करूनही पुढे ते सादर करायची वेळ आली की का हा मागे राहतो? माझ्यासारखा मी निदान त्याला त्याचं श्रेय तरी देतो आहे. दुसरा कुणी असता तर स्वत:चं छान साधून घेतलं असतं.’
दासना तर आता सवयच झाली होती या गोष्टीची. आशय पडद्यामागे काम करणार आणि कुणी तरी ते पुढे नेणार, सादर करणार. गेली ५-६ र्वष ते ही गोष्ट पाहत आले होते. त्यांची मग नेहमीच तारेवरची कसरत असायची. खूपसं काम आशयकडून करून घेणं आणि मग ते कुणाकरवी तरी प्रेझेन्ट करणं. ते मग आशयला त्यात नेहमीच सामाविष्ट करून घ्यायचे, ‘काही लागलं तर’ या सबबीखाली. पण तो त्यांचा आशयला त्याचं श्रेय आणि मोठेपण देण्याचा प्रकार होता. त्यांना आशयचा हा स्वभाव समजण्याचा पहिला वहिला क्षणही नीट लक्षात राहिला होता. आशयला एक अभिनव असं नवं डिझाइन सुचलं होतं आणि त्यानं ते दासना दाखवलं तेंव्हा ते अक्षरश: उडालेच होते. काही र्वष उत्पादन क्षेत्रामध्ये असलेल्या डिझाइनमध्ये इतकं मूलभूत नवं कुणी काही करू शकेल यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यानं उत्साहाच्या भरात त्याला म्हटलं, ‘‘तुला लक्षात येतंय का तू काय केलं आहेस ते? अरे, या डिझाइन बदलानं आपल्या उत्पादनाची पातळी तर आणखी वरची असेलच, पण उत्पादनाची किंमतही कमी होणार आहे!’’
‘‘सर, त्या विचारानंच मी कामाला लागलो आणि हे झालं,’’ आशय निरागसपणे म्हणाला.
‘‘चल, हे वरिष्ठांना आत्ताच्या आत्ता दाखवू या.’’ दासना माहीत होतं वरिष्ठ मूळचे तंत्रज्ञानाची आवड असलेले आहेत आणि ते सगळं बाजूला टाकून हे पाहतील आणि लहान मुलासारखे उत्साहात नाचू लागतील.
आशय त्यांना एकदम केविलवाणेपणे म्हणाला, ‘‘सर तुम्हीच त्यांना दाखवा.’’
‘‘पण मग माझ्याबरोबर तरी चल.’’
फार नाइलाजानं आल्यासारखा आशय त्यांच्याबरोबर आला होता .
दासना तेंव्हा ही गोष्ट अजिबातच कळली नव्हती. किती गळ घालायला लागली होती त्यांना, आशयला आपल्या बरोबर येण्यासाठी. कसंही करून तू येतो आहेस माझ्याबरोबर म्हणून ते त्याला घेऊन गेले होते. दासना तेव्हा तो त्याचा भिडस्तपणा वाटला होता. कालांतरानं त्यांना हे नक्की कळलं होतं की, आशय भिडस्त नव्हता. पण तो कुठल्याही अशा कामात सहभागी नाही व्हायचा जिथे त्याच्यावर प्रकाशझोत त्याच्यावर असेल. दासना याचं कारण कधीच कळलं नाही. त्यांनी आशयला कुठेना कुठे पुसटशा प्रकाशझोतात आणण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा जरा दुरूनही वास लागला, की आशय त्यातनं शिताफीनं अंग काढून घ्यायचा. दासनी अनेक वेळा त्याच्या कामाचं सभांमध्ये, इतर ग्रूप्समध्ये कायम कौतुक केलं, त्या बळावर त्याला बढतीच्या संधी देऊ केली, त्याची शिफारस केली. पण काही वेळा त्यांनी वार्षिक मूल्यमापन करताना एका मर्यादेपलीकडे
ते टाळलंही. नाहीतर ते अवाजवी ठरलं असतं. त्यांच्या सहकाऱ्यांना ते आशयची नको तेवढी शिफारस करताहेत असं कायम वाटायचं. दासना आशय अनेकदा हताश करून सोडायचा. अनेकदा तुमची कुवत केवळ तुमच्या कामातून लोकांना कळत नाही, किंवा पटत नाही. ती त्यांना तुमच्या ‘रूपाने’ दिसावीही लागते.
तरच ‘तुम्ही’ खरोखर लायक आहात असं लोकांना वाटतं. आशयची काय नेमकी कहाणी होती? अनेक तथाकथित ‘सुसंस्कृत’ घरांमध्ये असते तीच! स्वत:ला श्रेय घेणं म्हणजे कौतुकाचा सोस.. लहानपणापासून ‘पुढे पुढे’ करायचं नाही हे संस्कार.
आशयचं एकत्र कुटुंब होतं. ‘हल्लीच्या काळात असं कुटुंब दिसणं विरळाच’ अशी कुटुंबाची तारीफ कायमच होत गेलेली. सगळे सगळ्यांना घट्ट धरून असणारे. आम्ही सगळे विचारही सारखा करतो, त्यामुळे वादाचे प्रसंगच नाही येत फारसे, कुटुंबप्रमुख असणारे आशयचे काका अभिमानाने सांगायचे.
आपली पायरी सोडून वागायचं नाही. कुठल्या गोष्टीसाठी ‘मला अमुक हवं आहे. तमुक आवडत नाही,’ अशा स्वरूपाचं मुलांपैकी कुणी काही बोललं तर ‘किती स्वत:पुरता विचार करता रे तुम्ही’ हे ऐकावं लागे. आशय मुळात सौम्य स्वभावाचा, कुटुंबातला मोठा मुलगा असल्यामुळे बाकी भावंडांना कायम त्याचं उदाहरण दिलं जायचं. आशयने अनेक गोष्टी भावंडांसाठी केल्या, कधी त्यांची कामं केली, कधी गृहपाठ करून दिले, वेळ पडली तेव्हा त्यांची मोठय़ांकडे रदबदली केली, त्यांना सांभाळून घेतलं. आशयच्या मागे राहून कामं करण्याचं खूप कौतुक होत गेलं. त्यातूनच मग ‘पुढे पुढे करणं, मी मी म्हणणं, स्वत:चा विचार करणं, संधी साधणं – म्हणजे असंस्कृतपणा’, हा संस्कार नकळतपणं घरातल्या सगळ्या मुलांवर होत गेला होता. एक-दोन वेळा आशयने शाळेत, घरात जरा पुढाकार घेऊन काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलाही होता. पण त्यात फार यश नव्हतं मिळालं. ‘कुणी सांगितला होता तुला हा नसता शहाणपणा करायला,’ हे ऐकावं लागलं होतं. मागं राहून कायम कौतुकाची सवय लागलेल्या आशयला ते जरा जास्तच लागलं होतं. त्याबरोबर, ‘जाऊ दे एखाद्याला जायचं असेल पुढे तर. पुढच्याला ठेच लागते तेव्हा मागचा शहाणा बनतो,’ हा सल्लाही ऐकावा लागला होता.
अनेक र्वष झालेल्या या संस्कारांनी मग मागं मागं राहायची सवयच लागून गेली. ‘जाऊ दे बाबा ज्याला पुढे जायचं असेल त्याला. मला नकोच ते,’ असं मनात येऊन जायचंच! हळू हळू हा विचार कधी रक्तात भिनला, पिंड बनून गेला, कळलंच नाही. कुणी हे सांगणारा भेटलाच नाही, की पुढे पुढे न करणं म्हणजे मागं मागंच राहणं, असं नाही आणि पुढे जाणारा नेहमीच ठेच खातो असं नाही, आणि खाल्लीच तर सावरूही शकतो. पण तो पुढाकार घेतो म्हणून बऱ्याचदा पुढे निघून जातो आणि आपण मागंच राहतो!
मिलिंद पळसुले palsule.milind@gmail.com

Former Governor D Subbarao
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी केंद्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले, “श्वेतपत्रिका…”
Amir Khan Video Supporting Congress Asking for 15 lakhs
“जर कुणाच्या खात्यात १५ लाख नसतील तर..”, म्हणत आमिर खान काँग्रेसच्या प्रचाराला उतरला? Video पाहिलात का?
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ