काही कंपन्यांमध्ये इतरांनी आखून दिलेल्या चौकटीतच काम करणे अपेक्षित असतेतिथे तुम्ही  किती प्रमाणात, किती चांगले, चोख करता आणि कंपनीला तुमचा किती उपयोग होतो, यावर तुमची कुवत ठरते. केवळ तुम्ही हुशार आहात किंवा तुमच्याकडे एखादी अप्रतिम कल्पना आहे, म्हणून नाही.

मॅनेजमेंट कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्हूजमधून निवड झालेल्या पाच मुलांमध्ये अजिंक्यचीही निवड झाली. निवड करायला आलेली कंपनी एक विख्यात मल्टिनॅशनल कंपनी होती. निवड झालेली सगळी मुलं अतिशय खूश झाली. त्यांच्या बॅचमधील शंभरवर मुलांमधून त्यांची निवड झाली होती. अजिंक्य त्या बॅचचा टॉपर होता. त्याने त्याच्याबरोबर निवड झालेल्या इतर चार मुलांचा नीट वेध घेतला. ती सगळीच मुलं अजिंक्यला अगदीच यथातथा वाटत आली होती. अजिंक्य हॉस्टेलवर जायला निघाला. वाटेत त्याला कॉलेजचे प्लेसमेन्ट ऑफिसर भेटले आणि ते त्याला कॅबिनमध्ये घेऊन गेले. त्यांनी अजिंक्यला सांगितलं ‘तुझा रेकॉर्ड पाहता तू सहज निवडला जाशील अशी माझी अपेक्षा होती, पण तसं नाही झालं. मला माझं वजन वापरावं लागलं.’ अजिंक्य क्षणभर जागच्या जागी थिजला आणि मग भानावर येत त्यानं विचारलं ‘काय झालं?’

‘मला नेमकं नाही माहीत. पण त्यांच्या मनात बऱ्यापैकी किंतु होता तुला घेण्याबाबत.’

रूमवर गेल्यावर त्याचं डोकं भणाणलं .. ‘मला घेण्याबाबत किंतु?!’

काही महिन्यातच निवड झालेली बॅच ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ म्हणून या कंपनीत लागली. पहिला आठवडा त्यानां कंपनीची आणि कामाची माहिती मिळणार होती. पहिल्याच दिवशी कंपनीतील अतिशय वरिष्ठ असलेले एच.आर. हेड श्री. हेगडे सर्वाना कंपनीबद्दल माहिती देत होते. नंतर त्यांनी कुणाला काही प्रश्न असल्यास विचारायला सांगितलं. काही जणानीं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांबद्दल खोलवर माहिती विचारली ज्यावर हेगडे म्हणाले ‘तुमची विशिष्ट विभागात नियुक्ती होईल तेव्हा तुम्हाला त्या विभागाची जास्त खोलवरची माहिती दिली जाईल. सध्या मी तुम्हाला जनरल माहिती देतो आहे. इतक्यात अजिंक्यनं हात वर केला. ‘येस?’

‘सर, इथला सगळ्यात आव्हानात्मक विभाग कुठला?’

हेगडय़ानीं अजिंक्यला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं आणि मग उत्तर दिलं ‘इथं अनेक विभागांमध्ये अनेक आव्हानं आहेत. त्यासाठीच तुमच्यासारख्या हुशार मुलांची निवड झाली आहे. गुड डे.’

त्या उत्तरानं अजिंक्यचं समाधान झालं नाही. त्यानं घरी गेल्यावर इंटरनेटवरनं कंपनीची अधिक खोलवर माहिती काढली. आपल्याला कुठल्या विभागांमध्ये काम करायला आवडेल हे हेरून ठेवलं.

आठवडाभर या बॅचचं ट्रेनिंग झालं. त्यात काही ग्रुप डिस्कशन्स होती, केस स्टडीज होत्या. त्यावरून कंपनीनं कुणाची नियुक्ती कुठल्या विभागात करायची याचे आराखडे बांधले. त्याप्रमाणं अजिंक्य आणि प्रथमेश यांची नियुक्ती सप्लाय-चेन विभागात झाली. थोडक्यात मागणी-पुरवठा, त्याचं कायमस्वरूपी गणित बसवणं, रोजचं लक्ष ठेवणं, पुरवठा कमी पडू न देणं, पण अधिक साठवणही न होऊ  देणं. अजिंक्यचा अपेक्षाभंग झाला होता. एकतर त्याला मार्केटिंग, स्ट्रॅटेजीत जास्त रस होता आणि दुसरं म्हणजे त्याला प्रथमेशबरोबर जोडलं गेलं होतं. त्याला प्रथमेश नेहमीच यथातथा वाटत आला होता. त्याची आणि आपली निवड एका विभागात! अजिंक्य चांगलाच नाराज झाला होता. प्रथमेशला मात्र फारसा काही फरक नाही पडला. तो आपला विभाग आणि आपलं नवं काम जाणून घेण्यास जास्त उत्सुक होता. या विभागाचे प्रमुख होते डॉ. बशीर. त्यांची सप्लाय चेनमध्ये पी.एच.डी. होती.

प्रथमेशनं काही महिन्यातच त्यांच्या विभागाच्या रोजच्या घडामोडींवर आपला जम बसवला. रोजच्या रोज चोख अहवाल तयार करणं, नेमकी अडचण कुठे आहे हे आपल्या वरिष्ठांना तत्काळ दाखवून देणं .. एकंदरच त्याच्या वरिष्ठांचा प्रथमेशवर विश्वास आणि अवलंब वाढला. इतर विभागांमधून चौकशा वाढू लागल्या तशी प्रथमेशची त्या लोकांशीही सलगी वाढू लागली. अजिंक्यचा मात्र काही जम बसेना. त्यानं एकदा आपल्या मॅनेजरला नेहमीच्या रूटीन पद्धतीत काहीतरी नवं सुचवू पाहिलं, पण त्याच्या मॅनेजरने ते हाणून पाडलं. त्याला एकदा डॉ. बशीर कॉफी मशीनपाशी सापडले. अजिंक्यनं त्यानां सप्लाय चेनमधल्या नुकत्याच वाचलेल्या काही नव्या संकल्पना सांगितल्या. एका नव्या संकल्पनेवर आधारित काही गोष्टी त्यांच्या सेटअपमध्ये कशा करता येतील, हे सुचवलं.

‘साउंड्स इंटरेस्टिंग’ बशीर म्हणाले. अजिंक्य जरा खट्टू झाला. त्याने आणखी एक-दोन वेळा विषय छेडायचा प्रयत्न केला. पण त्याला कोणीच दाद दिली नाही. त्यानंतर पुढं अर्थातच काही झालं नाही. अजिंक्यचा निरुत्साह वाढत गेला. त्याच्या कामात त्या निरुत्साहाचं चित्र उमटायला लागलं. हळूहळू त्याच्या वरिष्ठांना आणि त्या विभागातल्या सगळ्यांनाच तो नकोसा वाटू लागला. अति झाल्यावर त्याच्या तक्रारी डॉ. बशीर यांना कळल्या. सगळ्या कंपन्या काही गुगल आणि फेसबुकसारख्या नसतात. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये काम करायच्या पद्धती सेट झालेल्या असतात. काही मोजकी, जबाबदार आणि अनेक वर्ष त्या कंपनीत काम करणारी, कंपनीचा विश्वास संपादन केलेली अनुभवी लोकं असतात, जी या मूलभूत कामाच्या पद्धतींचा विचार करीत असतात, बदलत्या काळाप्रमाणं योग्य बदल घडवून आणत असतात. ही फार वरच्या हुद्दय़ावरची आणि कर्तबगार लोकं असतात. अशा ठिकाणी इतर सर्वानी त्या आखून दिलेल्या पद्धतींनुसार काम करणं अभिप्रेत असतं. तुम्ही काम किती प्रमाणात, किती चांगलं, किती चोख करता आणि कंपनीला तुमचा किती उपयोग होतो, यावर तुमची कुवत ठरते. केवळ तुम्ही हुशार आहात किंवा तुमच्याकडं एखादी अप्रतिम कल्पना आहे म्हणून नाही. अजिंक्यसारखी मुलं असतात ज्यांच्या गुणवत्तेचं आणि हुशारीचं खूप काळ अतोनात कौतुक झालेलं असतं. त्यानां मग सगळीकडे सर्व वेळ बुद्धीचं काम करायला हवं असतं. हे बुद्धीचं काम म्हणजे काय . तर ज्यात काहीतरी नवनिर्मिती आहे, जे रोजचं रटाळ नाही, जे इतर चार जण करू शकत नाहीत, जे आव्हानात्मक आहे. तसं नसेल तर त्यांना कंटाळा येतो. अशा मुलांची बहुतांशी कंपन्यांमध्ये पंचाईत होते. नेमकी हीच अटकळ या कंपनीला अजिंक्यच्या निवडीच्या वेळेस होती,

आणि याच कारणासाठी त्याची निवड करताना मुलाखत मंडळामध्ये एकमत होत नव्हतं. अजिंक्यची तथाकथित हुशारीच नेमकी इथे त्याच्या आड येत होती. आणि प्रथमेशचं बस्तान छान बसण्यामागं त्याचीही वेगळ्या प्रकारची हुशारीच म्हणायची का? पाहूया पुढच्या लेखात.

palsule.milind@gmail.com