नवीन ऑफिसमध्ये आपली छाप उमटवायची तर आधी आपला सगळ्यांशी संवाद व्हायला हवा.  हा संवाद चांगला आणि प्रभावीसुद्धा असायला हवा. आपल्या बोलण्यामधून लोकांचे आपल्याविषयीचे मत बनत असते.

ते चांगले होण्यासाठी संवादकौशल्य हवेच.

Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
MS Dhoni removed his helmet when fans asking for it
चाहत्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धोनीने केले असे काही… एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….
Viral video of boy helping dog
“माणसाने माणसाशी माणसासम वागणे”! भुकेल्या श्वानाला तरुणाने खायला दिले बिस्किट; पाहा सुंदर व्हिडीओ

उत्तम संवाद साधणारी व्यक्ती कुणाला आवडत नाही? त्यांनी सांगितलेले सारखे ऐकावेसे वाटते; शिवाय लगेच पटतेही. त्यांची भाषा, त्यांचे विचार, आवाज आणि सांगण्याची पद्धत सगळे कसे अगदी आवडणारेच असते. पु.ल.देशपांडे यांचे एकपात्री कार्यक्रम ज्यांनी प्रत्यक्ष अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अनुभवले आहेत; त्यांना याचा प्रत्यय आला असेल. तुमच्याकडे आहे का असे संवादकौशल्य? कार्यालयीन कामकाजात यशस्वी होण्यामागे संवाद/संभाषण कौशल्याचा फार मोठा वाटा असतो. कार्यालयातील पहिल्या वर्षी तुम्ही जर संवाद कौशल्याचा उत्तम विकास केलात तर कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांना नक्कीच जिंकून घ्याल.

पण संवाद म्हणजे काय? नुसते तुम्हीच बोलणे म्हणजे संवाद नव्हे. तुम्ही एक किंवा अनेक व्यक्तींशी बोलता त्यावेळी तुमच्या बोलण्यामुळे त्यांच्याकडून आलेल्या प्रतिक्रिया- तोंडी किंवा देहबोलीतून दिसणाऱ्या व त्याला तुम्ही दिलेले उत्तर याला संवाद म्हणता येईल. संवादकौशल्ये नेहमी सरावानेच विकसित करता येतात. उत्तम संभाषणपटू होण्यासाठी पुढे दिलेल्या पायऱ्यांचा नीट अभ्यास करा.

*   श्रोत्यांची ओळख : उत्कृष्ट वक्ता होण्यासाठी टाकलेले हे पहिले पाऊल. तुम्ही एका व्यक्तीशी बोलणार आहात का दोन, का अनेक, त्यांची पाश्र्वभूमी याचा पहिल्यांदा अंदाज घ्या. कारण त्यानुसार तुमचे संभाषण प्रभावी होण्यासाठी तुमची भाषा, बोलण्याची पद्धत, आवाजाची फेक व देहबोली तुम्हाला ठरवावयाची आहे.

*   बोलीभाषेवरील प्रभुत्व : बहुतांशी कार्यालयात इंग्रजी ही व्यावहारिक भाषा असल्यामुळे, तिच्या लिखित व बोलतानाच्या व्याकरणावर आणि वापरामध्ये तुमचे प्रभुत्व अत्यावश्यकच आहे. पण भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये कार्यालयात देशी भाषासुद्धा वापरल्या जातात. त्यामुळे कमीत कमी तुमची मातृभाषा व राष्ट्रभाषा यांवरही तुम्ही प्रभुत्व विकसित करायला हवे.

*   उत्तम श्रोता व्हा : दुसरी व्यक्ती काय सांगते आहे हे लक्षपूर्वक ऐकणे, त्याचा अर्थ समजून घेणे, ही संवादाची पहिली पायरी. तुम्हाला उत्तम ऐकता आले तर तुम्ही त्या व्यक्तीला अर्थपूर्ण प्रश्न/शंका विचारू शकता, कौतुक किंवा टीकाही करू शकता. यामुळेच तुम्ही व ती व्यक्ती यांच्यामध्ये ‘संवाद’ सुरू होतो.

*   संभाषणाच्या विषयावरील तांत्रिक प्रभुत्व : ज्या विषयावर तुम्हाला संवाद साधायचा आहे, त्या विषयावर तुमचे पूर्ण प्रभुत्व नसले तरी बऱ्यापैकी ओळख पाहिजे. त्यातील ज्या बाबी माहिती नाहीत, त्याबद्दल तुमचे अज्ञान प्रांजळपणे कबूल करा, म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा सिद्ध होईल; शिवाय इतर सहकारीही तुम्हाला त्या विषयात मदत करतील.

*   देहबोली व आवाजाचा पोत : संभाषणाचे वेळी तुमची देहबोली, हातवारे करण्याची पद्धत, तुमची श्रोत्यांबरोबर होणारी नजरानजर व आवाज तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जातात. तुमचा (असलेला/नसलेला) आत्मविश्वास, तणाव, प्रभुत्व व संभाषणातील एकाग्रता, हे सर्व वरील देहबोली व आवाजावरून कळते. तेव्हा, अतिशय शांतपणे व ठामपणे संवाद साधा. तुमची देहबोली व आवाजाचा पोत तुमच्या संभाषणाशी एकरूप झाला पाहिजे; अन्यथा तुमच्या संभाषणाचा प्रभाव कमी होईल.

*   आक्षेप व शंकांचे निराकरण : विसंवादाचे मूळ कारण मतभेद, वादविवाद हेच असते. एक किंवा अनेक व्यक्ती एकत्र आल्या की मतांतरे होणारच. अशावेळी, जर तुम्ही आक्षेप व शंका घेणाऱ्या सहकाऱ्यांचे म्हणणे अतिशय संयमाने, शांतपणे समजून घेतले तर वादविवादाचे प्रसंग कमी येतील. त्यांचे म्हणणे बरोबर असेल तर ते लगेचच मान्य करा व तुमच्या ज्ञानात भर टाकल्याबद्दल त्यांचे आभारही माना. परंतु, तुम्हाला त्यांचे विचार पटूच शकले नाही तर तुमच्या मतांवर ठाम राहा.

*    संभाषणाचा सराव : उत्तम संवाद साधणे किंवा संभाषण करणे ही लगेच जमणारी कला नव्हे. त्याला सातत्याने सरावच करायला हवा. कार्यालयातील या पहिल्या वर्षांत तर सहकाऱ्यांच्या बरोबर कराव्या लागणाऱ्या अगदी साध्या साध्या संवादांचाही सराव करा. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते अतिशय नि:संदिग्धपणे समोरच्याला कळू द्या.

तेव्हा येत्या वर्षांत उत्तम संभाषणपटू होण्याचा निश्चय करा आणि बघा जादू झाल्यासारखे सहकारी तुमची तारीफ करतील. तुम्ही विकसित केलेल्या सकारात्मक, ठामआणि प्रभावी संवाद कौशल्यामुळे व्यावसायिक प्रगतीची दारे तुमच्यासाठी आपोआपच उघडतील.

डॉ. जयंत पानसे