विद्यार्थी मित्रहो, मागील लेखात चालू घडामोडी या घटकाच्या तयारीसंबंधी चर्चा केली. प्रस्तुत लेखात या घटकाची व्याप्ती लक्षात घेणार आहोत. मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाद्वारे चालू घडामोडींतील प्रमुख घटकांत अंतर्भूत होणाऱ्या महत्त्वाच्या घटना-घडामोडी अधोरेखित करून तयारीची व्याप्ती ठरवता येईल. त्या दृष्टीने विचार करता चालू घडामोडींतील महत्त्वाचा विभाग म्हणजे राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी होय. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनो, युनेस्को, आसियान, सार्क, युरोपीय संघ, नाम यांसारख्या संघटनांच्या अलीकडील शिखर परिषदा, जगातील प्रमुख देश, तेथील निवडणुका, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान व त्यांचा पक्ष यावरदेखील प्रश्न विचारले गेले आहेत. एखाद्या देशात उठाव अथवा यादवीमुळे सत्ताबदल झाल्यास त्याविषयीदेखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय घडामोडींमध्ये निवडणुका व त्यातील निकाल, मंत्रिमंडळातील बदल, महत्त्वाची पदे, एखाद्या घटनात्मक संस्थेविषयीची चर्चा, न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल, विविध आयोग- समित्या आणि त्यांच्या शिफारशी इ. विषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे राष्ट्रीय स्तरावरील राजकीय घटनासंबंधी प्रश्न विचारले जातात तसेच काही राज्यस्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटनांवरही प्रश्न येऊ शकतात.

आíथक चालू घडामोडींसंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांचा आढावा महत्त्वपूर्ण ठरतो. यात आंतरराष्ट्रीय वित्त संस्था, विविध देशांतील आíथक उलथापालथी, आंतरराष्ट्रीय वित्त व्यवहारांतील चढ-उतार, आíथक उत्पादनातील कल आणि आयात-निर्यातीत झालेले बदल, इ.विषयी तयारी करणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय स्तरावरील आíथक घडामोडींचा विचार करता विकासदर, त्यातील बदल, भाववाढ, विविध उत्पादनांतील कल, आयात-निर्यात, त्या संदर्भातील आíथक पाहणी अहवालातील आकडेवारी, रिझव्‍‌र्ह बँकेचे वार्षकि, सहामाही, तीन महिन्यांचे पतधोरण, शेअरबाजारातील महत्त्वाच्या घडामोडी, अर्थसंकल्प, दारिद्रय़, रोजगार, शेती, शिक्षण, इ. क्षेत्रांसाठी जाहीर केलेल्या योजना, वित्तीय समित्या इ.विषयक नोंदी ठेवणे महत्त्वाचे ठरते. गेल्या वर्षी जाहीर केलेला निश्चलनीकरणाचा निर्णय सर्व बाजूंनी समजून घ्यावा.

शासनाची धोरणे, योजना, कार्यक्रम आणि भिन्न स्वरूपाचे पुढाकार याविषयी जाणून घ्यावे. शासनाद्वारे विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाही आढावा घ्यावा.

सामाजिक व सांस्कृतिक विभागावरील प्रश्नात समाजात घडणाऱ्या विविध घटना, सांस्कृतिक घटना, नृत्य, कला-साहित्य या घटकांविषयी प्रश्न विचारलेले दिसतात. साहित्यकृती व त्यांचे लेखक-लेखिका, त्यांना प्राप्त होणारे पुरस्कार व सन्मान (नोबेल, रॅमन मॅगसेसे, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी) यांवर प्रश्न विचारले जातात. समाजाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल बहाल केले जाणारे निरनिराळे पुरस्कार व सन्मान हा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील महत्त्वाचा भाग असतो. संबंधित व्यक्ती, तिचे कार्यक्षेत्र आणि योगदान याविषयी नेमकी माहिती संकलित करून तयारी करणे महत्त्वाचे ठरते. पुरस्कारामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या देशांकडून दिले जाणारे नोबेल, मॅगसेसेसारखे पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर दिले जाणारे भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राजीव गांधी, महात्मा गांधी शांतता पुरस्कार इ. राष्ट्रीय पुरस्कारांचे अवलोकन करावे.

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अवकाश, अणुऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, खनिज संपत्ती, वैद्यकीय, संरक्षण, कृषी, उद्योग, दळणवळण इत्यादीसंबंधी झालेले आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील संशोधन, शास्त्रज्ञांची माहिती, विविध महत्त्वाच्या संशोधन संस्था व त्यांची प्रगती यांची माहिती असणे गरजेचे आहे. संगणक क्षेत्रातील अलीकडील शोधही पाहावेत.

भूगोल आणि पर्यावरणाच्या क्षेत्रातील पर्यावरणीय बदल, नसíगक आपत्ती, जैवविविधतेतील चढउतार यापासून ते संबंधित बाबीविषयी आयोजित होणाऱ्या परिषदा, वाटाघाटी तसेच शासकीय पातळीवर त्याबाबत घेतलेल्या पुढाकारापर्यंत पर्यावरणासंबंधी समकालीन घडामोडींचा अभ्यास करावा.

विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय संस्था आणि बिगरशासकीय संस्थांद्वारे निरनिराळे अहवाल सादर केले जातात. त्यातील ठळक बाबी आणि अधोरेखित केलेले महत्त्वपूर्ण प्रश्न व व्यक्तीचे मुद्दे यांचे आकलनही महत्त्वपूर्ण ठरते.

क्रीडा क्षेत्र हा चालू घडामोडींतील आणखी एक महत्त्वाचा विभाग होय. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या स्पर्धा, त्यांचे विजेते, उपविजेते, त्यांचा देश व राज्य, विविध क्रीडाप्रकारांशी संबंधित असलेले महत्त्वाचे खेळाडू, क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दिले जाणारे पुरस्कार, विविध स्पर्धामध्ये प्रस्थापित केले जाणारे विक्रम, इ.विषयी अद्ययावत माहिती असणे गरजेचे आहे.