इटलीमधील मेसिना शहरात वसलेल्या मेसिना विद्यापीठाकडून दरवर्षी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या विविध विषयांमधील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७ ते १९ या काळातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ आता शिष्यवृत्ती देत आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू होणाऱ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या शिष्यवृत्तींसाठी विविध  विषयांतील पदवीधर अर्जदारांकडून  २२ मे २०१७ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

* शिष्यवृत्तीबद्दल :

मेसिना विद्यापीठ हे इटलीमधील एक महत्त्वाचे व प्राचीन विद्यापीठ आहे. १५४८ साली स्थापना झालेले हे विद्यापीठ सध्या इटलीतील प्रमुख अध्ययन व संशोधन केंद्रांपैकी एक आहे. हे शासकीय विद्यापीठ असून त्यामध्ये प्रमुख अकरा विभाग व प्रत्येक विभागात इतर अनेक उपविभाग आहेत. या सर्व विभागांमध्ये मिळून जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी त्यांचे विविध अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. मेसिना विद्यापीठातील इतर विभागांप्रमाणेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाकडूनही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करता यावे यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१७-१९ च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीसुद्धा या विभागाकडून शिष्यवृत्ती दिली जात आहे. ही शिष्यवृत्ती फक्त विज्ञानातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी असून विद्यापीठाच्या त्या त्या उपविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना  बहाल करण्यात येते. शिष्यवृत्तीधारकाच्या पदव्युत्तर पदवीचा (संशोधनासहित) कालावधी दोन वर्षांचा असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत धारकाला विद्यापीठाकडून या दोन वर्षांसाठी  १०० युरोज एवढा मासिक भत्ता व मोफत निवासव्यवस्थेची सोय करून दिली जाईल, तसेच अभ्यासक्रमाच्या या कालावधीकरिता संपूर्ण शिक्षण शुल्क दिले जाईल. याव्यतिरिक्त त्याला विमा भत्ता, प्रवास भत्ता व संशोधन अभ्यासक्रमासाठीची अनुदानित रक्कम यांसारख्या इतर सर्व सुविधा देण्यात येतील. शिष्यवृत्तीधारकाने शक्यतो दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करून पदवी घेणे योग्य राहील. शिष्यवृत्तीधारकाला ही शिष्यवृत्ती मिळाल्यावर उत्तम गुणांकन राखणे बंधनकारक असेल. शिष्यवृत्तीची एकूण संख्या चाळीस आहे. एकदा ही शिष्यवृत्ती स्वीकारल्यानंतर अर्जदाराला ती नंतर कुणालाच देता येणार नाही. तसेच त्याला अध्र्यातच ही शिष्यवृत्ती सोडूनही देता येणार नाही. त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रम करणे बंधनकारक राहील.

* आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदाराला स्वतंत्रपणे विद्यापीठाच्या प्रवेशासाठी अर्ज करावयाचा आहे. त्याला तिथल्या प्रवेशानंतरच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवले जाईल. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही विषयामधील किमान पदवी असावी. अर्जदाराकडे त्याच्या कार्यक्षेत्रातील किमान दोन वर्षांचा कार्यानुभव असावा. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदारास जीआरई ही परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. मात्र जीआरईमधील उत्तम गुण त्याच्या निवडीची शक्यता निश्चितपणे अधिक मजबूत करतील. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असावे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यापीठात इटालियन भाषेत असलेल्या एखाद्या अभ्यासक्रमाचे अध्ययन अर्जदाराला करायचे असल्यास त्याने सीएलआयक्यूची इटालियन भाषेची बी २ या स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

* अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जमा करावा. अर्जामध्ये अर्जदाराने तो ज्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करणार असेल त्याचा उल्लेख निश्चित करावा. अर्ज जमा करताना अर्जाबरोबर त्याने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल व या शिष्यवृत्तीसाठी त्याची निवड का व्हावी याबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., संशोधन पाश्र्वभूमी असल्यास त्याने केलेल्या संशोधनाचा लघुसंशोधन अहवाल, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, पारपत्राची साक्षांकित प्रत इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठास कळवावे. अर्जदार कोणत्याही शैक्षणिक माहितीसाठी त्याचा अर्ज जमा करण्यापूर्वी विद्यापीठातील संबंधित विषयातील प्राध्यापकाला इमेलद्वारे संपर्क करू शकतो.

* निवड प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेत आलेल्या अर्जामधून छाननी करून ठरावीक योग्य उमेदवारांची निवड समितीकडून केली जाते. या प्रक्रियेमध्ये अर्जदाराची पदवी व पदवीपूर्व स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता, त्याचे एस.ओ.पी व सी.व्ही. याच निकषांवर शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड केली जाईल.

* महत्त्वाचा दुवा :-

http://www.unime.it/

*   अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत दि. २२ मे २०१७ आहे.

प्रथमेश आडविलकर