प्रश्न : मी, समीर पाटील सध्या मेकॅनिकल डिप्लोमा तृतीय वर्षांला आहे. मला इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअर फोर्समध्ये करिअर करायचे आहे. म्हणजे मला माझे अभियांत्रिकी शिक्षण त्या दृष्टीने करायचे आहे. माझी जन्मतारीख २० ऑगस्ट १९९७ आहे. त्यानुसार माझे वय नियमात बसेल का? – समीर पाटील
उत्तर : समीर, तू मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यावर तुला भारतीय नौदल किंवा वायुदलात नोकरी मिळू शकते. पदवी प्राप्त केल्यावर तू कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन ही परीक्षा देऊ शकतो. शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन अंतर्गत विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवीधरांची नियमित भरती केली जाते. नौदलात १० इंजिनीअिरग (जनरल सव्‍‌र्हिस) या गटातील नोकरीस मेकॅनिकल शाखेत किमान ६० टक्के गुण तू प्राप्त करायला हवे. यासाठी वयोमर्यादा साडेएकोणीस वर्षे ते २५ वर्षे आहे. सबमरिन इंजिनीअिरग आणि नॅव्हल आर्किटेक्ट गटातील नोकरीही तुला मिळू शकते. यासाठीसुद्धा वयोमर्यादा साडेएकोणीस वर्षे ते पंचवीस वर्षे अशी आहे. (संपर्क – joinindiannary.gov.in) भारतीय वायुदतातील एरोनॉटिक इंजिनीयिरग मेकॅनिकल या पदासाठी तू अर्ज करू शकशील. (अहर्ता पदवी परीक्षेत ६० टक्के गुण आणि वयोमर्यादा २० ते २५ वर्षे) ग्राऊंड डयुटी ब्रँच आणि अ‍ॅडिमिनिस्ट्रेटिव्ह ब्रँचमध्येही तुला नोकरी मिळू शकेल. (अर्हता पदवी – ६० टक्के गुण आणि वयोमर्यादा २० ते २६)
संपर्क – indianforce.nic.in
कम्बाइण्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन या परीक्षेद्वारे नॅव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीसाठी निवड केली जाते. वयोमर्यादा नॅव्हल अ‍ॅकॅडमी १९ ते २२ वर्षे आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमी वयोमर्यादा १९ ते २३ वर्षे.
प्रश्न : मी बी. कॉम. पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठातून जर्मन भाषेचा दोन स्तरांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. Goethe इन्स्टिटय़ूटमधून पुढील अभ्यासक्रम करण्याचे माझे नियोजन आहे. मला जर्मन भाषेत करिअर करायचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे? – भार्गवी कदम
उत्तर : युरोपातच नव्हे तर संबंध जगात जर्मन ही महत्त्वाची भाषा आहे. निर्मिती क्षेत्रास सध्या जर्मन संबंध जगात आघाडीवर आहेत. जर्मन भाषेतील व्यापार आणि व्यवसायविषयक प्रतिष्ठित नियतकालिक, WIRTCHAFTSWOCHE नुसार जगातील सर्वाधिक बोलणाऱ्या भाषांमध्ये जर्मन भाषेचा १० वा क्रमांक लागतो. ‘Der Spiegel’ या जर्मन नियतकालिकानुसार जर्मन भाषेमध्ये प्रभुत्व मिळवल्यास उत्तमोत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याने जागतिक पातळीवर अधिकाधिक तरुण-तरुणींचा ओढा जर्मन भाषा शिकण्याकडे वाढला आहे. विशेषत: जगात आर्थिक संकट असतानाही हा ओढा कमी झालेली नाही.
जर्मन भाषेत प्रभुत्व मिळवलेला कोणताही उमेदवार जर्मनी व इतर देशातही उत्तम प्रकारचे करिअर करू शकतो. भाषांतरकार, अनुवादक, दुभाषा, अध्यापन, विक्री, विपणन, पत्रकारिता, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संधी मिळू शकतात. बीपीओ (बिझिनेस प्रोसेस आऊट सोर्सिग) या क्षेत्रातही जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींना चांगली मागणी आहे.

प्रश्न : मी बी. एस्सी.च्या दुसऱ्या वर्गात आहे. वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र हे माझे विषय आहेत. जीवनशास्त्र मुख्य विषय आहे. प्राणिशास्त्र या विषयांसह पदवी घेतलेल्यास माझी इंडियन एअर फोर्स मिटिऑरॉलॉजी (हवामानशास्त्र ) ब्रँचसाठी निवड होऊ शकेल काय? की मला भूगोल किंवा गणित किंवा सांख्यिकी या विषयाचा अभ्यास करावा लागेल. मुंबईतील कोणत्या महाविद्यालयात बी.एस्सी. (भूगोल) हा विषय शिकवला जातो. कृपया वरील सर्व बाबींची माहिती द्यावी. – राहुल गोसावी
उत्तर : इंडियन एअर फोर्स मिटिऑरॉलॉजी शाखेतील निवडीसाठी नियमितरीत्या जाहिरात दिली जाते. या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता :
पुढील विषयांमधील पदव्युत्तर पदवी : १) विज्ञान शाखेतील कोणताही विषय २) गणित ३) सांख्यिकी ४) भूगोल ५) कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन ६) पर्यावरणशास्त्र ७) उपयोजित भौतिकशास्त्र ८) जैवभौतिकशास्त्र ९) पर्यावरणीय जीवशास्त्र १०) कृषी हवामानशास्त्र ११) हवामानशास्त्र १२) सागरशास्त्र (ओशनोग्राफी). या विषयामध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. दोन पद्धतीने नियुक्ती केली जाते १) पुरुष उमेदवारांसाठी कायमस्वरूपी सेवा कमिशन (वयोमर्यादा प्रत्येक वर्षांच्या १ जुलै रोजी २० ते २६ वर्षे) २) पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी लघु सेवा कमिशन (वयोमर्यादा – १ जुलै रोजी २० ते २६ वर्षे)

प्रश्न : मी २०१० मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयात मुंबई विद्यपीठातून बी. एस्सी. केले आहे. त्यानंतर २०११ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्वालिटी अ‍ॅशुरन्स इन फूड अ‍ॅण्ड फार्मास्युटिकल इंडस्ट्री, हा अभ्यासक्रम केला. बी.एस्सी. पदवी घेऊन आता त्यास पाच वर्षे झाली आहेत. आता मला सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी. ) चा अभ्यासक्रम पार्ट टाइम पद्धतीने करावयाचा आहे. असा काही अभ्यासक्रम करणे शक्य आहे का? – करुणा चौधरी
उत्तर : सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम अंशकालीन (पार्ट टाइम) पद्धतीने करण्याची सोय सध्या तरी नामवंत विद्यापीठांमध्ये आढळून येत नाही. तथापि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने एम.एस्सी. इन लाइफ सायन्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा सामान्य कालावधी दोन वर्षांचा असला तरी तो पाच वर्षांत पूर्ण करता येतो. या अभ्यासक्रमासाठी अर्हता – बी. एस्सी. (जैविकशास्त्र लाइफ सायन्स/ प्राणिशास्त्र/ वनस्पतिशास्त्र या विषयांतील अभ्यासक्रम मुख्य विषय (मेजर) अथवा ऑनर्स या पद्धतीचा असावा. पदवी परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. संपर्क – sos@ignov.ac.in

प्रश्न : मी १९९६ मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र या विषयामध्ये बी. एस्सी. केले आहे. मला आता या विषयात एम. एस्सी. करावयाची आहे. हे शक्य आहे का? – विद्या पवार
उत्तर : मनिपाल विद्यापीठाच्या एम.एस्सी. मेडिकल मायक्रोबायोलॉजी या विषयासाठी वयोमर्यादा नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या एम. एस्सी. लाइफ सायन्स या विषयासाठीसुद्धा वयोमर्यादा नाही. सेंट झेवियर कॉलेज ऑफ मुंबईमध्ये एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या २० जागा आहेत. त्या मेरिटनुसार भरल्या जातात. इतर विद्यापीठांमध्येही गुणवत्तेवर जागा भरल्या जातात. वयोमर्यादेची अट विशेषत्वाने नमूद केलेली दिसत नाही. व्यक्तिश: आपणास त्याचा तपास करावा लागेल.
प्रश्न : मी इलेक्ट्रिक अभियंता पदविकाधारक असून पॉवर प्लान्टमधील कार्याचा मला १० वर्षांचा अनुभव आहे. मला बॉयलर ऑपरेशन इंजिनीयर परीक्षा, त्याचे फायदे, अभ्यासक्रम आदीची माहिती हवी आहे.
उत्तर : डायरेक्टोरेट बॉयलर्समार्फत बॉयलर ऑपरेशन इंजिनीयर्स ही परीक्षा घेतली जाते. बॉयलर या क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाचा विकास करण्यासाठी व उपलब्धता वाढण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. औद्य्ोगिक सुरक्षिततेसाठी कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी ही परीक्षा महत्त्वाची ठरते. ही परीक्षा देण्यासाठी अर्हता. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा केमिकल किंवा पॉवर प्लॅन्ट किंवा प्रॉडक्ट किंवा इन्स्ट्रमेंटेशन किंवा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कन्ट्रोल या अभियांत्रिकी विषयातील पदवी किवा पदविका. या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये साधारणत: पुढील विषयांचा समावेश असतो. क्वालिटी ऑफ क्युरल, क्वालिटी ऑफ हीट अ‍ॅडेड, व्हेसल प्रेशर, सेफ्टी व्हॉल्व्ह, गेट व्हाल्व्ह, ग्लोब व्हाल्व्ह, कॅलोरिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल ऑईल, व्होलटाइल ऑर्गनिक कम्पाऊंड, फक्शन ऑफ डिअरेक्टर, एअर हीटर, बॉयलर माऊंटिंग, बॉयलर अ‍ॅक्सेसरीज, इफिशिएन्सी ऑफ बॉयलर इत्यादी. या परीक्षेच्या काही प्रश्नपत्रिका पुढे नमूद संकेतस्थळावर ठेवण्यात आल्या आहेत. संकेतस्थळ : http://www.mahakamgar.gov.in) (ई -मेल : dsrb.mumbai@maharashtra.gov.in)