पर्यटन व्यवसायाची एक खासियत अशी की, तुम्ही केवळ व्यवसाय म्हणूनच यातून अर्थाजन करू शकता असे नव्हे, तर तुम्ही छंद म्हणूनही हा जोपासू शकता. शिवाय त्यातून उत्पन्नही मिळवू शकता. आठवडय़ाचे काही दिवस किंवा विशिष्ट मौसमात, फ्रीलान्सर म्हणूनही तुम्ही यातील प्रगतीच्या संधी शोधू शकता.

पर्यटनविषयक लेखन मराठी,  इंग्रजी वृत्तपत्रांतून, मासिकांतून, नियतकालिकांमधून तुम्ही पर्यटनविषयक लेखांची सदरे पाहिली असतीलच. खास पर्यटनाला वाहिलेल्या काही इंग्रजी, मराठी मासिकांतूनही असे लेखन इच्छुक व्यक्तींना करता येऊ  शकते. आजकालच्या आधुनिक समाजमाध्यमांतून म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगमधूनही तुम्ही लेखन करू शकता. याद्वारे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता. पर्यटनाशी संबंधित निरनिराळ्या चित्रवाणी वाहिन्यांवरूनही अशा लेखनाचा वापर होऊ  शकतो. अनेक ट्रॅव्हल कंपन्यांना त्यांच्या विशेष सहलींची माहिती देण्यासाठी असे लेखक हवे असतात, जे या सहलींना प्रत्यक्ष जातील आणि त्या अनुभवाबद्दल लिहितील. त्यामुळे त्या मार्गानेही तुम्ही उत्पन्न मिळवू शकता.

जर तुम्हाला पर्यटनविषयक लेखन करायचे असेल तर महत्त्वाचे म्हणजे भाषा उत्तम आणि ओघवती असायला हवी. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व असेल तर आणखीच उत्तम. या लेखनातून उत्पन्न तर मिळेलच, पण मानसिक समाधानही मिळेल.

पर्यटन पत्रकारिता ज्यांना मुशाफिरी करण्याची, लेखनाची आवड आहे तसेच निरनिराळ्या ठिकाणांना भेटी देऊन तिथली संस्कृती, राहणीमान, लोकवस्तीचे निरीक्षण, खाद्यसंस्कृतीचे अवलोकन व अभ्यास यात रुची आहे अशा व्यक्ती पर्यटन पत्रकारिता हा पर्याय स्वीकारू शकतात. अर्थात यासाठी नवनवीन जागी जाण्याची आवड असायला हवी. जनसंपर्काचे कौशल्य असायला हवे. पर्यटन पत्रकारितेत फक्त प्रवासवर्णन अपेक्षित नाही. तर पर्यटन क्षेत्रातील घडामोडींची माहिती असणे, त्या विषयीच्या निर्णयांची कल्पना असणे, त्याच्या बऱ्या-वाईट परिणामांचे विश्लेषण करण्याइतपत ज्ञान असणे अपेक्षित आहे. पर्यटन क्षेत्रातील अव्यवस्थेवरही प्रकाश टाकला गेला पाहिजे. केवळ सकारात्मक लिखाण यात अपेक्षितनाही.

पर्यटन पत्रकारिता करायची असेल तर पत्रकारिता आणि माध्यमांमधील संवादाचेही प्रशिक्षण आवश्यक असते. मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांमधील ज्ञान तर हवेच; परंतु आणखी कोणती भाषा अवगत असेल तर उत्तमच. खास पर्यटनाला वाहिलेल्या दूरचित्रवाणी वाहिन्या, मासिके, अंक, नॅशनल जिओग्राफीसारख्या वाहिन्या यांमध्ये पर्यटन पत्रकारितेला वाव आहे.