कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम

स्त्रीरोगतज्ज्ञांकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे, तसेच ६ महिने ते २ वर्षे वयोगटातील बालकांची बालरोगतज्ज्ञाकडून तपासणी करणे.

दारिद्रय़ रेषेखालील गरोदर महिलेला ८०० रुपये गरोदरपणातील नवव्या महिन्यात देणे.

किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील आरोग्य व जीवनकौशल्ये विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देणे.

अंमलबजावणी कालावधी व पद्धती

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येक महिन्यात किमान २ शिबिरे आयोजित करण्यात येतात. शिबिरे आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित ग्रामपंचायतींच्या आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देण्यात येते. शिबिराच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार केले जातात. एक वेळचा अल्पोपाहार लाभार्थ्यांना देण्यात येतो. गरोदर मातांचा व ६ महिन्यांपर्यंत स्तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो. तसेच जोखमीच्या मातांना उपचार व संदर्भित केले जाते व पाठपुरावा करण्यात येतो.

सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था

मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबिरे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावर राबविली जातात.

देण्यात येणारे लाभ / सेवा

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता केंद्राच्या वाहनाचा वापर करता येतो. जेथे वाहन उपलब्ध नसेल त्या ठिकाणी वाहने भाडय़ाने घेणे, स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ यांना मानधन देणे, शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एक वेळ अल्पोपाहार देणे, औषधे व प्रयोगशाळा साहित्य आणि मंडप व्यवस्था याकरिता अनुदान देण्यात येते.