इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयआयटीच्या भुवनेश्वर, मुंबई, दिल्ली, धनबाद, गांधीनगर, गुवाहाटी, हैद्राबाद, इंदोर, जोधपूर, कानपूर, खडगपूर, मद्रास, पाटना, रुडकी व रोपड आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर  जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी म्हणजेच जेएएम २०१८  ही प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येते. या  परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांनी ५५% गुणांसह व राखीव वर्गगटातील असल्यास ५०% गुणांसह बीएस्सी पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची ११ फेब्रुवारी २०१८ रोजी दोन टप्प्यांमध्ये निवड परीक्षा घेण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या या निवड परीक्षा महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक व पुणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.

वरील निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संबंधित शाखेत अथवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगलोर येथे उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून निवड पात्रता परीक्षेच्या दोन प्रश्नपत्रिकांसाठी अर्जदारांनी १५०० रु. संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्ट फॉर एमएस्सी म्हणजे जेएएम २०१८ ची जाहिरात पाहावी.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबईच्या दूरध्वनी क्र. ०२२-२५७६७०२२ वर संपर्क साधावा अथवा आयआयटी मुंबईच्या http://jam.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१७.