शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियुक्तीसाठी त्यांच्या मुलाखत मंडळांकडून मुलाखती घेण्यात येतात. या प्रत्येक क्षेत्राची मागणी वेगळी असते व त्या त्या क्षेत्रामध्ये कामाच्या / क्षमतांच्या/ कौशल्यांच्या आवश्यकतेच्या अनुषंगाने उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी ही मुलाखत मंडळे घेत असतात. केंद्र व राज्य शासनातील विविध सेवांमधील पदांवर नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मुलाखत हा निर्णायक टप्पा असतो. पूर्व व मुख्य परीक्षेबाबतचा अ‍ॅप्रोच मिळणे, त्याबाबतचे गरसमज दूर होणे ही तुलात्मकदृष्टय़ा सोपी गोष्ट आहे. मात्र मुलाखतीबाबतचे समज, न्यूनगंड, गरसमज, शंका दूर व्हाव्यात यासाठी नेमके प्रयत्न आवश्यक असतात. या मुलाखतींच्या तयारीसाठीची थोडक्यात चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

‘‘उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक कुवत किती आहे ते आजमावणे, हा मुलाखतीचा उद्देश असतो. मुलाखतीच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबरच ज्यासाठी अर्ज केला असेल त्या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, उमेदवाराने ज्या क्षेत्रातील विशेषज्ञता प्राप्त केली असेल त्या

क्षेत्रातील अद्ययावत घडामोडी, ग्रामीण क्षेत्रांच्या स्थितीबाबत त्याला असलेली माहिती आणि ग्रामीण जनतेच्या समस्या यासंबंधीचे प्रश्न यांचा समावेश असतो.’’ ही भूमिका राज्य लोकसेवा आयोगाने स्पष्ट केलेली आहे.

मुलाखतीबद्दल चुकीच्या लोकांकडून ऐकलेल्या निराधार माहितीच्या आधारे मुलाखतीबद्दल काही उमेदवारांची स्वत:ची अशी एक कल्पना तयार झालेली असते. त्या कल्पना विस्तारातच उमेदवार जगत असतात. अशा कपोलकल्पित शंका-कुशंकेने बरेच उमेदवार ग्रस्त असतात. याआधी मुलाखतीस सामोरे गेलेल्या यशस्वी व अयशस्वी उमेदवारांशी चर्चा करणे आणि मॉक इंटरह्यू देणे मुलाखतीच्या प्रत्यक्ष तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तो मुलाखतीबाबतचे समज-गरसमज दूर होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय ठरतो. वेगवेगळ्या मुलाखतींचा अनुभव समजून घेतल्यास मुलाखतीची तयारी व विचारांना योग्य दिशा सापडते. नियुक्तीचे पद, त्यासाठी आवश्यक गुण, मुलाखतीचे मंडळ व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त / अमूर्त गोष्टींवर मुलाखतीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक असते.

राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत ही साधारणपणे २० ते २५ मिनिटे चालते. वैयक्तिक माहितीने सुरू होणारी मुलाखत सर्वसाधारणपणे तुमचे कार्यक्षेत्र, छंद, चालू घडामोडी, निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न अशी पुढे जाते. अर्थात प्रत्येक मुलाखतीचा हाच पॅटर्न असेल असे नाही. उमेदवारांची माहिती आणि परफॉर्मन्सनुसार प्रश्नांचे प्रकार बदलतात; वेळ कमी जास्त होत असते.

बायोडाटा तयार करणे, पदांचा पसंतीक्रम ठरविणे, सर्व आवश्यक कागदपत्रे जमविणे हा मुलाखतीच्या तयारीचा पहिला टप्पा आहे. यापकी बायोडाटा तयार करताना व पदांचा पसंतीक्रम ठरविताना मुलाखतीस प्रत्यक्ष सामोरे गेलेल्या आणि यशस्वी झालेल्या उमेदवारांशी चर्चा करूनच निर्णय घ्यायला हवा.

मुलाखतीसाठी तयारी करताना उमेदवारांना जाणवणाऱ्या तणावाचे एक मुख्य कारण आपल्या कमतरतांची जाणीव हे असू शकते. मानवी व्यक्तिमत्त्वात कमतरता असणे अस्वाभाविक नाही. उणिवा, कमतरता असणे नसर्गिक आहे त्या मानवी स्वभावाचा भाग बनून त्या व्यक्तीत वास करत असतात. सर्व उणिवा आणि दोषांपासून मुक्ती हे शक्य नसते. मुलाखतीच्या तयारीसाठी मिळणाऱ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत तर हे अजिबातच शक्य नसते. अशा परिस्थितीत तणावमुक्त राहून तयारी करण्यासाठी सर्वपथम आपले कच्चे-पक्के दुवे समजून घेतले पाहिजेत. इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर उणिवांना सामोरे जाता आले पाहिजे. त्यांना जिंकता आले पाहिजे. काही उमेदवारांचा मोठा शत्रू असतो त्यांचा स्वत:चा ईगो. ईगो म्हणजे व्यक्तीने स्वत:बद्दल तयार केलेले स्वत:चे अवास्तव मत असते. हे जितके फसवे तितकेच धोकादायक असते. अशा सर्व उणिवा-कमतरता जाणून, तणावमुक्त व दबावमुक्त राहून सहजतेने मुलाखतीची तयारी करता आली पाहिजे.