प्रियांकाचं सी.ए. पूर्ण झालं. जिथे आर्टिकलशिप करत होती तिथेच पहिली नोकरीला लागली. पण ती फर्म लहान होती. तिला कुठेतरी मोठय़ा ठिकाणी एक छान नवी नोकरी सुरू करायची होती. काय प्रकारची नोकरी निवडावी? तिला काही कळत नव्हतं. बाबा म्हणत होते तिनं कुठल्यातरी मल्टिनॅशनल कंपनीत किंवा मग एखाद्या परदेशी बँकेत नोकरी घ्यावी. काय करू? प्रियांकानं नोकरी आणि करिअरवर स्वत:च्या परीनं थोडं वाचलंही होतं. त्यातून जी नोकरी करू, त्यात ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’ मिळालं पाहिजे असं बऱ्याच ठिकाणी वाचनात येत होतं. तिला याचं मग खूपच कुतूहल लागून राहिलं. जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे नेमकं काय? तिनं मग हे शोधून काढण्याची जणू मोहीमच हातात घेतली. जी नोकरी करतो त्यात समाधान मिळणं, मजा येणं हा त्याचा ढोबळ अर्थ. पण हे समाधान नेमकं कशात असतं, नसेल तर कसं मिळवायचं, तिला काही कळेना.
तिनं सर्वप्रथम आपल्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर हा प्रश्न टाकला – ‘जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय?’ त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये काही जणांची एक दोन र्वष नोकरी झालेली होती. तिला फटाफट रिस्पॉन्सेस आले..
‘‘अगं तुला नोकरीवर छान वाटलं पाहिजे. यू शुड फील हॅपी..’’
‘‘ऑफिस छान पाहिजे, मस्त डेकॉर, कम्फर्टेबल, कूल..’’
‘‘ मस्त कॅफेटेरिया आणि रिक्रिएशन रूम हवी’’
‘‘सब ठीक है यार, टीम चांगली हवी’’
‘‘यार हे सगळं ठीक आहे, पण बॉस चांगला हवा, नाहीतर सब झूठ..’’
‘‘पॉलिटिक्स नाही पाहिजे. टोटल फ्रीडम हवा’’
इतक्या सगळ्या विचारांनी प्रियांका जरा चक्रावलीच. म्हणायला गेलं तर खूप दृष्टिकोन मिळाले. पण त्यातनं हाताला काही लागल्यासारखं नव्हतं वाटलं. इतकं सोपं असेल का ते? तिच्या प्रौढ मनाला काही पटेना. तिनं मग तो नाद तात्पुरता सोडून दिला. घरी जेवणाच्या टेबलावर बाबानीं प्रश्न टाकलाच ‘‘काय ठरवते आहेस ?’’
‘‘पपा, मला अशी नोकरी करायची आहे ज्यात जॉब सॅटिस्फॅक्शन असेल.’’
‘‘विचार स्तुत्य आहे तुझा प्रियांका. पण ते सुरुवातीलाच मिळालं पाहिजे वाटतं का? समजा नाही मिळालं तर?’’
‘‘तर नोकरी बदलता येते!’’ तिला एकदम साक्षात्कार झाल्यासारखं झालं.
‘‘एक्झ्ॉक्टली. आणि जॉब सॅटिस्फॅक्शनची तुझी व्याख्या कायम राहणार आहे का?’’
‘‘पपा जॉब सॅटिस्फॅक्शनची व्याख्या कशी बदलेल? ती कायमच राहिली पाहिजे.’’
‘‘तुझ्या मित्र-मैत्रिणींना विचारून पाहा.’’
‘‘विचारलं मी त्यांना. पाच जणानीं पाच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या.’’
वडिलांना हसू आवरेना. ‘‘बघ. आणि हा तुझ्या समवयस्क ग्रुपचा तुझा अनुभव. उद्या अतुल येतोय दोन दिवसांसाठी. त्याला ७-८ वर्षांचा अनुभव आहे. तोही फायनान्स क्षेत्रातच आहे. त्याला विचारून पाहा.’’
अतुल प्रियांकाचा मामेभाऊ. चांगली संधी मिळाली म्हणून चार वर्षांपूर्वी त्याने हैदराबादला नोकरी धरली. हैदराबादची संधी आली तेव्हा त्याच्या घरात आणि जवळच्या नात्या-गोत्यात केवढी खळबळ माजली होती. अतुलनं कुणालाही न जुमानता ही नोकरी घेतली. चार र्वष झाली तो तिकडं आहे. छान जम बसला आहे त्याचा. सगळ्यांची तोंडं बंद झाली होती. मुंबईत तो काही कामानिमित्त येत होता, बरेच दिवस भेट नाही म्हणून आत्याकडं डोकावणार होता.
अतुल रात्री जेवायलाच थांबला आणि प्रियांकाचा नोकरीचा शोध आणि त्याच्या हैदराबादच्या नोकरीचा विषय अगदी सहजच निघाला. क्रेडिट रिस्कमध्ये अतुलला करिअर करायचं होतं. ही संधी चालून आली होती. पगारही खणखणीत होता. अर्जुनाला पक्ष्याचा डोळा दिसला होता, तशी त्याला फक्त ही संधी दिसली होती. बाकी सगळं त्याच्यासाठी गौण होतं. चार र्वष हां हां म्हणता गेली होती. चार वर्षांत त्याला क्रेडिट रिस्कचा हवा तसा खणखणीत अनुभव मिळाला होता, त्यामुळे तो खूपच चाज्र्ड अप होता. बाकी थोडय़ाफार अडचणी होत्या – हवामान, यंदाच्या उन्हाळ्यात तीव्रतेने जाणवलेली पाणीटंचाई, खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम. पण घरी वरण-भात आणि खिचडी बनवायलाही तो शिकला होता. एकंदर छान चाललं होतं. हेच जॉब सॅटिस्फॅक्शन असावं .. प्रियांकाला वाटून गेलं.
‘‘तुला काय करायचंय?’’ अतुलनं प्रियांकाला विचारलं.
‘‘माहीत नाही, पण काम करायला मजा आली पाहिजे.’’ ती काहीसं अडखळत म्हणाली.
‘‘तुला काय माहीत तुला कशातून मजा येणार आहे! ते शोध आधी. त्यासाठी पहिले २-४ र्वष नुसती नोकरी कर, कान डोळे उघडे ठेव, वेगवेगळी डिपार्टमेन्ट काय आणि कसं काम करतात बघ, त्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे पाहा. तुला काय आवडतं कळेलच तुला!’’
फार काहीतरी गवसल्यासारखं वाटून गेलं प्रियांकाला अतुलबरोबरच्या गप्पांमधून. तिनं मग रीतसर नोकरीचा शोध सुरू केला. दोन-तीन जॉब पोर्टल्सवर रेझ्यूमे लोड केला, वर्तमानपत्रातल्या जाहिरातींकडं बारकाईनं लक्षं देऊ लागली. काहीही ऑफर आली आणि त्या क्षणी बरी वाटली तर घ्यायची, असा तिचा निश्चय झाला.
त्या वर्षीच्या त्यांच्याकडच्या गणपतीला शेजारचे देशपांडे काका-काकू आले. देशपांडे काका ४५ च्या आसपासच्या वयाचे होते. मुलं अजून शिकत होती. काकू पण बँकेत नोकरी करत होत्या. काका एका मोठय़ा इंजिनीअिरग कंपनीत नोकरीला होते. गप्पांच्या ओघात प्रियांकाच्या कानावर खूप काही गोष्टी पडल्या. काकांना घराजवळून बस होती कंपनीत जायला. पाऊण तासात ते पोचायचे. संध्याकाळी बसनंच ७ ते ७.३० पर्यंत ते घरी परत यायचे. ते मग संध्याकाळी पोहायला जायचे आणि कधी मधी रमीचा त्यांचा एक ग्रुप होता तिथे रात्री डाव पडायचा. इतर दिवशी घरी मुलांबरोबर टी.व्ही. वरचा ‘गॅजेट गुरू’ आणि नव्या गाडय़ांचे रिवूाजचे प्रोग्रॅम पाहायला त्यांना आणि मुलानां फार आवडायचं. काकूंचा ट्रेनचा ग्रुप मोठा होता. रोज सकाळी आणि परतीला संध्याकाळी अमाप न संपणाऱ्या गप्पा आणि धमाल! सणासुदीला छान साडय़ा आणि दागिने घालून कामावर जायची त्यानां खूप हौस होती. दोघांच्या नोकरीसंबंधीची किंवा कामासंबंधीची काहीच चर्चा होत नाहीए असं प्रियंकाच्या लक्षात आलं. पण काका-काकू दोघंही अगदी समाधानी आणि खूश दिसत होते त्यांच्या या रूटीनमध्ये. मग त्यांना जॉब सॅटिस्फॅक्शन आहे असं समजायचं का – तिच्या मनात येऊन गेलं. दोघांचं हे अवांतर जगही त्या सॅटिस्फॅक्शनमध्ये आलं का?
‘‘परवा सुब्बू भेटला लिफ्टमध्ये’’ काका म्हणाले.
‘‘अरे वा. देवच भेटला म्हणायचं’’ पपा.
‘‘खरंच. वर्षभरानं आला होता, लगेचच दोन दिवसांत जाणार आहे परत परदेशी.’’
‘‘कुठे म्हणे या वेळेस?’’ पपा
‘‘मी विचारलंही नाही. कुठल्यातरी देशाचं नाव येणार त्याच्या तोंडातून. काय फरक पडतो? फोनवरचा संसार आहे त्याचा कुटुंबाबरोबर. बायकोही त्याला फोनवर आधी ‘कुठे आहेस’ असंच विचारत असेल!’’ काका म्हणाले आणि सगळेच हसले.
‘‘या मोठय़ा कन्सल्टिंग फम्र्समध्ये पैसा भरमसाट, जबाबदारी तुफान, पण संसार पाठीवर. खरंच कसं वर्षांनुर्वष असं काम करतात, तेही जबरदस्त प्रेशरचं, कळत नाही’’ काका म्हणाले.
‘‘लिफ्टमध्ये बोलला तरी का, का फोनवरच होता?’’ पपांनी विचारलं. ‘‘फोनवरच! फक्त हात हलवून दखल घेतली एवढंच.’’ काका. प्रचंड जबाबदारीचं काम करत असणार सुब्रमण्यम काका. मोठय़ा हुद्दय़ावर असावेत. म्हणूनच एवढे बिझी असावेत आणि सारखा प्रवास करत असावेत. प्रियांकाला आता बाबा आणि काकांच्या बोलण्यातून काहीतरी वेगळं सापडत होतं.
नोकरीत विसेक र्वष झाल्यावर एखादा काय प्रकारची नोकरी करतो, त्याचं कामाचं स्वरूप काय आहे – याचा काहीच संबंध नसतो की काय? ही मंडळी तर जॉबबद्दल काहीच बोलत नाहीएत. जॉब सॅटिस्फॅक्शन हे बरंच गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि त्याची व्याख्या वयपरत्वे बदलत असावी हे एव्हाना प्रियांकाच्या लक्षात येऊ लागलं होतं. कशानं आपल्याला एखाद्या नोकरीत समाधान मिळतं हे त्या नोकरीतील कामाबरोबरच त्याभोवतीच्या इतर अनेक गोष्टींवरही ते अवलंबून असू शकतं. वयपरत्वे या ‘नोकरीभोवतीच्या गोष्टी’ नंतर नंतर वाढत जात असाव्यात. जॉब सॅटिस्फॅक्शन ही त्या सगळ्याची गोळा बेरीज असावी. नाहीतर आई-बाबा, देशपांडे काका-काकू त्यांच्या कामासंबंधी फार काही न बोलता त्यांच्या इतर रोजच्या गोष्टींबद्दलच का जास्त बोलतील? पण मग सुब्बू काका का इतर सगळं सोडून फक्त त्यांची नोकरी, प्रवास आणि घराबाहेर राहणं प्रिफर करतात? त्यानां केवळ त्यांचं काम जास्त प्यारं असावं.
‘‘पपा मी ठरवलंय.’’
‘‘काय बेटा?’’
‘‘अतुल म्हणाला तसं कान डोळे उघडे ठेवायचे आपल्याला काय आवडतं ते पाहायला. ते मी सध्याच्या नोकरीतसुद्धा करू शकते. कुठल्या मोठय़ा फर्ममध्ये नवी नोकरी मिळाली तर आणखीन गोष्टी बघायला, करायला मिळतील. त्यातून मग मला काय आवडतं ते कळू शकेल.’’
‘‘ग्रेट. सध्यापुरता तुला मार्ग सापडलेला दिसतो. आता आईचा प्रश्न सोडवायचाय. तू मार्गाला लागलीस की ती प्रमोशन घेणार म्हणतेय. म्हणजे तिची ट्रान्स्फर होणार. तिलाही साकळलेपणा आला आहे म्हणते आहे..’’
‘‘हो मला नाही जॉब सॅटिस्फॅक्शन सध्या,’’ आई पपानां तोडत हसत हसत म्हणाली.
(..उत्तरार्ध पुढच्या भागात)
मिलिंद पळसुले – palsule.milind@gmail.com