मी नुकताच एलएलबी उत्तीर्ण झालो आहे. मला बँकेमध्ये नोकरी करायची आहे. त्यासाठी पुस्तके, अर्हता व इतर माहिती द्या. – मुकुंद पाटील
सार्वजनिक बँकांमध्ये लिपिक संवर्ग, अधिकारी संवर्ग आणि स्पेशलाइज्ड संवर्ग अशा तीन पद्धतीने भरती केली जाते. लिपिक संवर्गातील पदांसाठी अखिल भारतीय स्तरावर चाळणी परीक्षेद्वारे भरती केली जाते. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी अशी ही परीक्षा आहे. ही परीक्षा दोन टप्प्यांची असते. प्राथमिक परीक्षेत कार्यकारणभाव (३०प्रश्न, ३० मिनिटे), संख्यात्मक कौशल्य (३५ प्रश्न, ३५ मिनिटे) आणि इंग्रजी भाषा कौशल्य (३० प्रश्न, ३० मिनिटे) यावर प्रश्न विचारले जातात. शंभर प्रश्न, शंभर गुण आणि कालावधी एक तास असे याचे स्वरूप आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे. या परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षाही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असते. या पेपरमध्ये सामान्य अध्ययन (४० गुण, २५ मिनिटे ), इंग्रजी (४० गुण, ३० मिनिटे), कार्यकारणभाव (५० गुण, ३० मिनिटे) आणि संख्यात्मक कौशल्य (५०गुण, ३०मिनिटे) जाणून घेणारे यावर प्रश्न विचारले जातात. संगणक ज्ञानाची चाळणी घेणारे २० प्रश्न २० मिनिटांमध्ये सोडवायचे असतात. असा एकूण २०० गुणांचा आणि १३५ मिनिटांचा हा पेपर असतो. अधिकारी पदाच्या निवडीसाठी प्राथमिक आणि मुख्य परीक्षा घेतली जाते. हे पेपर्स वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पद्धतीचे असतात. प्राथमिक परीक्षेत कार्यकारण भाव (३५ प्रश्न, ३५ गुण), इंग्रजी (३०प्रश्न, ३०गुण), संख्यात्मक कौशल्य चाचणी (३५ प्रश्न, ३५ गुण) असा १०० गुणांचा आणि एक तासाचा पेपर असतो. या परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षाही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असते. या पेपरमध्ये बँकांशी संबंधित सामान्य अध्ययन (४० प्रश्न, ४० मिनिटे), इंग्रजी (४० प्रश्न, ४० गुण), कार्यकारणभाव (५० प्रश्न, ५० गुण) आणि संख्यात्मक कौशल्य (५० प्रश्न, ५० गुण) जाणून घेणारे कौशल्य यावर प्रश्न विचारले जातात. संगणक ज्ञानाची चाळणी घेणारे २० गुणांचे प्रश्न २० सोडवायचे असतात. असा एकूण २०० गुणांचा हा पेपर असतो. इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल (आयबीपीएस) मार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया सोडून इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील नियुक्त्यांसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. त्याचा हा अभ्यासक्रम आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लिपिवर्गीय आणि अधिकारी संवर्गीय पदांच्या निवडीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतली जाते. या परीक्षेचाही अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती सर्वसाधारणत: आयबीपीएस परीक्षेसारखीच असते. लिपिक संवर्गीय प्राथमिक परीक्षेत कार्यकारण भाव (३५ प्रश्न, ३५ गुण), इंग्रजी (३० प्रश्न, ३० गुण), संख्यात्मक कौशल्य चाचणी (३५ प्रश्न, ३५ गुण) असा १०० गुणांचा आणि एक तासाचा पेपर असतो.
या परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. ही परीक्षाही वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असते. या पेपरमध्ये सामान्य अध्ययन/अर्थकारणाबद्दल सर्वसाधारण ज्ञान ५० प्रश्न, ३५ मिनिटे, गुण-५०), इंग्रजी (४० प्रश्न, ३५ मिनिटे, गुण-४०), कार्यकारणभाव आणि संगणकीय कल (५० प्रश्न ,४५ मिनिटे, गुण-६०) आणि संख्यात्मक कौशल्य (५० प्रश्न, ४५ मिनिटे, ५० गुण ) जाणून घेणारे कौशल्य यावर प्रश्न विचारले जातात. असा एकूण १९० प्रश्न २०० गुणांचा आणि २४० मिनिटांचा हा पेपर असतो.
अधिकारी संवर्गीय(प्रोबेशनर ऑफिसर्स) या पदाच्या प्राथमिक परीक्षेचा कालावधी एक तासाचा असून १०० गुणांचे १०० प्रश्न यात विचारले जातात. यामध्ये इंग्रजी भाषा ज्ञान (३०प्रश्न, ३० गुण), संख्यात्मक कलचाचणी (३५ प्रश्न, ३५ गुण), कार्यकारण भाव (३५ प्रश्न, ३५ गुण) असे प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेत २०० गुणांचे २०० प्रश्न विचारले जातात. त्यासाठी दोन तासांचा कालावधी असतो. यामध्ये कार्यकारण भाव (५० प्रश्न, ५० गुण), इंग्रजी भाषा ज्ञान (४० प्रश्न, ४० गुण), संख्यात्मक कलचाचणी (५० प्रश्न, ५० गुण), बँक उद्योगाशी संबंधित सामान्य अध्ययन/घडामोडी (४० प्रश्न, ४०गुण), संगणकीय ज्ञान (२० प्रश्न, २० गुण) असे प्रश्न विचारले जातात. याशिवाय वर्णनात्मक असा ५० गुण आणि ६० मिनिटांचा पेपर असतो.
मुख्य परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित निवडक उमेदवारांना समूह चर्चा आणि मुलाखतीसाठी बोलावले जाते. अंतिम निवड ही मुख्य परीक्षेतील गुण आणि समूह चर्चा आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित केली जाते.
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियामधील भरतीसाठी स्वतंत्ररीत्या परीक्षा घेतली जाते. संगणक तज्ज्ञ, विधी तज्ज्ञ अशासारखी स्पेशलाइज्ड पदे कमी असल्याने त्यांची निवड मुलाखतीद्वारे केली जाते. त्यासाठी स्वतंत्ररीत्या जाहिराती दिल्या जातात. इंग्रजी आणि गणितीय कौशल्याच्या प्रश्नांसाठी ४थी ते १२वी पर्यंतच्या या दोन्ही विषयांच्या संकल्पना स्वयंस्पष्ट असायला हव्यात. या परीक्षांसाठी अधिकृत असे कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही. तथापी बाजारात अनेक संस्थांनी गाइड्स काढल्या आहेत. प्रश्नांचा आवाका लक्षात घेण्यासाठी एखादे असे पुस्तक वाचायला हरकत नाही.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)