स्नेहानं स्वत:चा, रियाचा आणि वैभवचा डबा कसाबसा भरला आणि ती अंघोळीला पळाली. जाता जाता तिने वैभवला ओरडून सांगितलं, ‘‘वैभव तुझा आणि रियाचा डबा तयार आहे, घ्यायला विसरू नकोस.’’ स्नेहानं कशीबशी अंघोळ आटपली आणि ती बाहेर आली. तोपर्यंत वैभव रियाला सोडून ऑफिसला निघून गेला होता. तिनं भराभर तयारी केली आणि तीही निघाली.

तिघांचं हे सकाळचं नेहमीचं वेळापत्रक. सगळं काही घडय़ाळाच्या काटय़ावर. ती आणि वैभव, दोघांच्या रोजच्या ट्रेन्स ठरलेल्या, रियाची स्कूल बसची वेळही ठरलेली. काही बदलायचा प्रश्नच नाही. संध्याकाळी स्नेहा पाळणाघरातून रियाला घेऊन येते. आगेमागे कधीतरी वैभव घरी पोहचतो.

स्नेहा एका मल्टीमीडिया एजन्सीत वरिष्ठ डिझायनर आहे. वेब डिझायनिंग हा तिचा हातखंडा. अनेक ग्राहकांना तिने मनासारखी संकेतस्थळं साइटस बनवून दिली आहेत. तिची अतिशय झक्कास अशी रंग-चित्र-मांडणी लोकांना खूप पसंत पडते. गेल्या काही वर्षांमध्ये काही नामवंत कलाकार मंडळी, प्रसिद्ध चित्रकार, फॅशन डिझायनर्स आणि काही एनजीओनींही तिच्याकडून आपली संकेतस्थळं बनवून घेतली आहेत. ग्राहकांच्या गरजा आणि त्यांच्या मनातल्या अस्पष्ट कल्पना

समजून घेऊन त्यांना परिणामकारक मूर्त रूप देण्याचं अवघड काम स्नेहा लीलया पार पाडायची. त्याचमुळे स्वतची एजन्सी सुरू करावी, असं तिच्या मनात अनेकदा येऊन जात असे. केलेल्या कामामुळं आणि जोडलेल्या ग्राहकांमुळे पुढे स्वत:ची म्हणून कामं मिळायला काहीच अडचण येऊ  नये, असंही पुसटसं वाटून जायचं.

वैभव एका कंपनीत व्यवस्थापक होता. त्याचे दोन सहकारी आणि त्यांच्या हाताखाली पन्नास माणसं होती. या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती. कंपनीच्या कामानिमित्त त्याची आणि स्नेहाची ओळख झाली आणि पुढे जाऊन दोघांनी लग्नही केलं. वैभवला दहा वर्ष झाली या नोकरीत. दोन वर्षांपूर्वीच त्याचं मॅनेजर म्हणून प्रमोशन झालं होतं. रियाचा जन्म, बाळंतपण आणि मग एकंदरच रियाला एका पालकाचा तरी थोडा वेळ मिळावा, म्हणून स्नेहानं आपला सध्याचा जॉब पुढे चालू ठेवला होता. रिया थोडी हातावेगळी झाली की मग काहीतरी सुरू करू असं तिच्या मनात येऊन जायचं.

हा हा म्हणता काळ पुढे सरकला. रिया आता चांगली ६ वर्षांची झाली होती. शाळेत ती पूर्ण रमली होती. तिला शाळेत आणि पाळणाघरातही मित्र-मैत्रिणी मिळाल्या होत्या. ती अधूनमधून वैभवच्या आई-वडिलांकडेही संध्याकाळी राहायची. ती दोघं जवळच राहायची. त्यांना रियाची रोजची जबाबदारी नको होती, पण अधेमधे ते तिला शाळेतून स्वतच्या घरी नेत असत. तिथेही रिया छान राहायची. अशाच एका संध्याकाळी स्नेहा ऑफिसमधून परतली. रियाला टीव्ही लावून दिला ज्यावर ‘लायन किंग’ सिनेमा चालू होता. त्यातल्या रफिकी बबूनचा ‘इट्स टाइम’ डायलॉग तिच्या कानावर पडला आणि तिलाही ‘होय! आता वेळ आली आहे’ असं एका झटक्यात वाटून गेलं. खरं तर हे वाटणं अलीकडच्या काळात अधिकच बळावत गेलं होतं. ऑफिसात एक-दोनदा तिला ग्राहकांसोबतच्या मीटिंगमध्ये न बोलावता तिच्या हातात नुसतं ठरलेलं काम सोपवण्यात आलं. हा तिला तिच्या अनुभवाचा आणि सर्जनशीलतेचा अपमान वाटला होता.

एके दिवशी रात्री झाकपाक झाल्यावर तिनं मग वैभवकडं विषय काढला.

‘‘वैभव, मी नोकरी सोडायची म्हणतेय.’’

‘‘काहीतरी काय! सगळं काही नीट चाललं आहे. माझं करिअर इथून झपाटय़ानं चढते आहे. तू आता नोकरी कशाला सोडायला चाललीस?’’

स्नेहाला पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली. ती सटकन वैभवला म्हणाली,

‘‘एक मिनिट वैभव. तुझं ते करिअर आणि माझी ‘नोकरी’?!’’

‘‘स्नेहा मी मॅनेजर आहे, माझ्या हाताखाली पन्नास जण आहेत. कामाच्या जबाबदाऱ्या आहेत. आणखीन खूप वर चढायचं आहे.’’

‘‘ओ! म्हणजे तू मॅनेजर आहेस आणि आणखीन ‘वर’ चढत जाण्याची इच्छा आहे म्हणून तुझं ते ‘करिअर’!’’

‘‘स्नेहा तू उगाच शब्दच्छल करते आहेस.’’

‘‘शब्दच्छल नाही वैभव. चूक माझीच आहे.’’

स्नेहासमोर सगळा भूतकाळ लख्खदिशी उभा राहिला. सगळं काही फार सहज, फारशी चर्चा न होता होत गेलं होतं. स्नेहाला एजन्सीत सहाएक वर्ष झाली होती. वयही वाढत असल्याने त्यांनी मूल होऊ देण्याचं ठरवलं. त्याच वेळी स्नेहा वैभवला आपणहून म्हणाली ‘‘मी आणखीन काही काळ नोकरी करते. रिया जरा हातावेगळी झाली की मग पाहू पुढे काय करायचं.’’ त्यानं मानेनच ‘ठीक आहे’ खुणावलं होतं.

‘मग पाहू पुढे काय करायचं ..’ यात पुढे जे करायचं तिच्या मनात होतं, ते तिनं वैभवला कुठे सांगितलं होतं! स्नेहाला तिच्या कामाबद्दल किती आत्मीयता होती, किती झपाटलेली होती ती .. कसं कळणार होतं वैभवला? लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष धुसर अवस्थेत गेली, मग मुलासाठी प्रयत्न, ‘मग पाहू पुढे काय करायचं’ – यात तिची तिच्या कामाप्रतीची ईर्षां, तगमग वैभवपर्यंत कधी पोहचलीच नाही! गाढवपणा आपलाच झाला असं तिला वाटून गेलं.

वैभवचं तरी काय चुकलं? लौकिकदृष्टय़ा करिअर कुणाचं असतं? जो करिअरच्या शिडीवर वर वर चढत जातो आणि आणखीन वर चढण्यासाठी उत्सुक असतो, टीम्स सांभाळतो. मॅनेजर असतो, आपल्या कामाबद्दल झपाटलेला असतो, त्याची ऊठसूठ वाच्यता करत असतो, जो त्यापायी इतर चार गोष्टींवर पाणी सोडतो, ज्याला त्यापायी स्वत:च्या काही इतर जबाबदाऱ्या पार पाडता येत नाहीत किंवा मग त्या कुणा दुसऱ्यांनी पार पाडाव्यात अशी त्याची अपेक्षा असते – त्याचं ते करिअर. ज्याच्या कामात फार वर वर चढत जाणं असं कामाचं स्वरूपच नसतं, जो आपलं काम रोज नित्यनेमानं करतो, त्याची फार वाच्यता करीत नाही, त्यातलं फार काही घरी आणत नाही, त्याची फार चर्चा करीत नाही, स्वत:च्या जबाबदाऱ्या स्वत: पार पाडतो आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांना मदत आणि दुसऱ्यांसाठी तडजोड करायला तयार असतो- त्याची मात्र ती ‘नोकरी’.

‘‘वैभव मी नोकरी सोडते आहे. म्हणजे मी घरी नाही बसणार आहे.’’

‘‘मग काय करणार आहेस?’’

‘‘आपल्याला धड कधी बसून बोलायला वेळ मिळाला तर ना! मी एजन्सी सुरू करायच्या विचारात आहे.’’

‘‘खरंच?!’’

‘‘म्हणजे काय! कशी वाटली कल्पना?’’ स्नेहा आता वैभवची परीक्षा पाहायला आतुरच होती.

‘‘हूं. पण स्वतचं काही करायचं तर व्याप वाढेल. तू खूपच व्यस्त होशील!”

‘‘तर? काय अडचण आहे?’’

‘‘नाही, म्हणजे घरात गोंधळ होईल.’’

‘‘कसला?’’ स्नेहानं त्याला कोंडीत पकडून बोलतं करायचंच ठरवलं होतं.

‘‘म्हणजे आपण दोघे कामाच्या व्यापात अडकल्यावर रियाचं कसं होणार?’’

‘‘काय व्हायचंय रियाचं?’’

‘‘स्नेहा बास. तुला नीट कळतंय, मी काय म्हणतो आहे ते.’’

‘‘खरंच नाही कळत आहे मला वैभव. काय अडचण आहे?’’ स्नेहा शक्य तेवढा चेहरा कोरा ठेवत म्हणाली.

‘‘तू न कळल्याचं सोंग आणत असशील तर ऐक-आपल्या दोघांपैकी एकानं तरी रियाला थोडा अधिक वेळ देणं आवश्यक आहे कुटुंब म्हणून. तू पण कामाच्या व्यापात अडकलीस तर ते कसं होणार?’’

‘‘मी स्वत:ची एजन्सी सुरू केली की माझं ‘करिअर’ सुरू होईल वैभव. मग मला नाही तेवढा वेळ देता येणार तिला.’’ स्नेहा जरा दुखावली होती पण तिला हसूही येत होतं.

खूप वेळ तिच्याकडं टक लावून बघत मग वैभवनं आसमंतात नजर लावली आणि हळूच ‘सॉरी’ म्हटलं.

ती नुसतीच त्याच्याकड पाहात राहिली. त्याचं ‘सॉरी’ किती खरं आहे याची तिला खात्री नव्हती.

थोडय़ा वेळानं मग त्यानं होऊनच तिला विचारलं ‘‘काय करू शकतो आपण.’’

‘आपण’ शब्दानं मात्र तिचे डोळे पाणावले. तिनंच मग वैभवचा हात हातात घेत म्हटलं

‘‘तू तुझ्या करिअरमध्ये थोडी ‘नोकरी’ केलीस तर सगळं जमून जाईल बघ.’’

‘‘बस झालं. किती ताणशील आता.’’

स्नेहा खदखदून हसत राहिली.

मिलिंद पळसुले – palsule.milind@gmail.com