सिलिकॉन इंडियाच्या सर्वेक्षणात सातत्याने गेली पाच वर्षे पुणे विद्यापीठाच्या एमसीए विभागाच्या एमसीए अभ्यासक्रमाला देशात अव्वल क्रमांक प्राप्त झाला आहे.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेशी संलग्न असलेल्या एमसीए अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची तसेच राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाची मान्यता मिळाली आहे. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ आणि ३ वर्षांचा असून, एकूण सहा सत्रांत विद्यार्थ्यांना १६० क्रेडिट्स पूर्ण करावे लागतात. राज्य स्तरावरील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ‘सीईटी’मार्फत या अभ्यासक्रमाचे प्रवेश होतात. अभ्यासक्रमाच्या प्रत्येक सत्रात मूलभूत विषयाचे ज्ञान, प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील सराव, छोटे प्रकल्प व सादरीकरण तसेच संवाद कौशल्यावर भर देण्यात आला आहे.
पहिले वर्ष (सत्र पहिले व सत्र दुसरे) सर्व विद्यार्थ्यांसाठी समान असून, दुसऱ्या वर्षांतील तिसऱ्या सत्रापासून समान विषयांव्यतिरिक्त खालील चार प्रमुख ट्रॅक्स निवडता येतात-
’ सॉफ्टवेअर अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेन्ट.
’ इन्फ्रास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सिक्युरिटी मॅनेजमेंट.
’ इन्फर्मेशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड क्वॉलिटी कंट्रोल.
’ नेटवर्किंग.
एमसीए (व्यवस्थापन) अभ्यासक्रम हा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हाने आणि संधी लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. संगणक विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, प्राध्यापकवर्ग व उद्योग क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणारे तंत्रज्ञ व व्यवस्थापक यांनी हा अभ्यासक्रमाच्या रचनेत योगदान दिले आहे. वरील चार ट्रॅक्समध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमता टप्प्याटप्प्याने विकसित होतात आणि त्याद्वारे एमसीए हा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र व संगणक उद्योगांमध्ये पाऊल रोवणे विद्यार्थ्यांना सोपे जाते.
पहिल्या वर्षांत विषयांचा पाया पक्का करणे, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांत प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर पॅकेजेसचा वापर, अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, सिस्टीम अ‍ॅनालिसिस व डिझाइन टूल्स त्या त्या ट्रॅक्सनुसार विकसित करता येतात. तपशीलवार अभ्यासक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन विद्याशाखेचा
सुधारित एमसीए (व्यवस्थापन) अभ्यासक्रम (२०१५-१८) पाहावा.
अधिक माहितीसाठी http://www.unipune.ac.in ही वेबसाइट पाहावी.
हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान व संगणक उद्योग क्षेत्रात नानाविध संधी उपलब्ध आहेत.
सॉफ्टवेअर डेव्हलपर व्यतिरिक्त असे विद्यार्थी स्वतंत्र आयटी उद्योजक होऊ शकतात. या क्षेत्रामध्ये परदेशातही मोठय़ा संधी उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे स्टार्टअप उद्योगांना विशेष प्रोत्साहन व सवलती उपलब्ध होत आहेत.