जिथे देवाची भीती घातली जाते तिथे आध्यात्मिक आरोग्यशास्त्र कधीच बाळसं धरीत नाही. एकसारखी प्रवचने ऐकणे, प्रत्येक बाबतीत देवाचा हवाला घेणे, बऱ्या-वाईट गोष्टींसाठी त्याला जबाबदार धरणे इत्यादी प्रकारांमुळे माणसाचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि तो दुबळा बनत जातो.

आ रोग्यशास्त्र हा आयुष्यातील फार महत्त्वाचा घटक कसा आहे याची सुरुवात आपण मागच्या भागात केली होती. त्या भागात आपण कुटुंबाचे आरोग्य आणि मिळकतीच्या पैशाचे आरोग्य कसे जपावे हे पाहिले. आज आपण आध्यात्मिक आरोग्याविषयी वाचणार आहोत.
एका वैज्ञानिकाच्या घरात मला देव-देवतांच्या छायाचित्रांनी भरलेल्या भिंती पाहायला मिळाल्या तेव्हा मला त्याचे फारसे आश्चर्य वाटले नाही. पण जेव्हा मला कळले की त्यांचा एक गुरू आहे आणि त्याच्या संमतीशिवाय त्या घरातील पानही हलत नाही तेव्हा मात्र मी उडालोच. भिंतींवर लटकवलेल्या देवतांच्या छायाचित्रांपेक्षाही हे काहीतरी भयंकर होते आणि त्या घरात गुरूंचे प्रस्थ चांगलेच वाढलेले मला जाणवले. धर्म मानणे, धार्मिक विधी करणे या गोष्टी म्हणजे आपल्या देशातील लोकांच्या जगण्याचा एक भाग आहेत इथपर्यंत समजू शकतो. पण त्या वैज्ञानिकांच्या घरी त्यांचे संपूर्ण कुटुंब गुरूंच्या इतके आहारी गेले होते की त्यांच्या आज्ञेशिवाय ते एक इंचही पुढे सरकायचे नाहीत. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, कोणते करिअर निवडावे, कोणत्या डॉक्टरकडे जावे, सोन्या-चांदीची खरेदी कोणत्या दिवशी आणि कोणत्या दुकानातून करावी, सहलीला कोठे जावे, मुलांची लग्ने कोणत्या वर्षी करावीत या सगळ्या गोष्टींचे निर्णय त्या कुटुंबाने सर्वस्वी देवाचा अवतार मानलेल्या त्या गुरूंच्या हाती सोपवले होते. मी याबाबत सरळच विचारले तेव्हा ते गर्वाने म्हणाले, ‘डॉक्टर, आमचं कुटुंब आध्यात्मिक आहे हो.’ त्यावर मी त्यांना स्पष्टच सांगून टाकले की वारंवार या गुरूंनी तुमच्या घरी येणं हे चांगलं लक्षण नाही; त्यामुळे तुमचं कुटुंब परावलंबी होत चाललं आहे आणि देवासमोर किंवा या गुरूंसमोर लोटांगणं घालून घालून आत्मसन्मान, आत्मविश्वास हरवत चालला आहे. माझ्यावर ते चांगलेच नाराज झाले असावेत. पण खरंच हे लक्षात घ्या की जेव्हा घरातील मोठी मंडळी अशी वागतात तेव्हा त्या घरातील तरुण मुलंसुद्धा आत्मविश्वास हरवून बसतात.
एक पेला दुधात एक चमचा साखरेचं किंवा जेवणात लोणच्याचं जे स्थान आहे तेवढंच स्थान आपल्या आयुष्यात धार्मिक गुरूंना असायला हवं. अख्खा दुधाचा पेला किंवा संपूर्ण जेवण म्हणजे देव नाही तर त्यातील साखरेचं आणि लोणच्याचं प्रमाण लक्षात घ्या. तसंच आयुष्याचं आहे. देवदेवतांच्या प्रति किंवा थोर व्यक्तींच्या प्रति श्रद्धा असू शकते, पण ती माणसं म्हणजे आयुष्य नाही किंवा देवधर्म हेच आयुष्य नाही.
प्रत्येक माणूस आपापल्या परीने आध्यात्मिक असतोच. धर्म आणि धार्मिक विधी यांच्यापेक्षासुद्धा वेगळी आध्यात्मिकता असू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा तरुण मुलं एकत्र येऊन आपल्या वाडीतल्या गणेश उत्सवाच्या नियोजनात स्वत:ला पूर्णपणे गुंतवून घेतात तेव्हा तीसुद्धा एक प्रकारची आध्यात्मिक क्रियाशीलताच असते. अनेक लोक जेव्हा आपल्यातील भिन्नता, मतभेद गाडून कुठल्या तरी महान कार्यासाठी एकत्र येतात आणि त्यात एकरूप होऊन जातात तेव्हा तिथेसुद्धा आध्यात्मिकता असतेच. अशा सामाजिक आणि सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये जर आपण अत्यंत प्रामाणिक दृष्टिकोनातून सहभागी झालो तर त्यातून आपणच आपल्याला नव्याने गवसतो. अध्यात्माचा फार वेगळा अर्थ त्यात आपल्याला सापडतो आणि आपलं आध्यात्मिक आयुष्य समृद्ध होत जातं.
आमच्या देवाची मूर्ती तुमच्या मूर्तीपेक्षा अमुक एवढी उंच आहे किंवा आमच्या मंडपामध्ये तुमच्यापेक्षा जास्त मोठी रांग लागते हे सांगण्यात अहंकार आहे.. आध्यात्मिकता नाही. धार्मिक प्रतिमांचा मान ठेवायचा असेल तर त्या प्रतिमांच्या निर्मितीत प्राण ओतणाऱ्या कारागिराकडे पाहा, तिथे अध्यात्माचा नवीन अर्थ सापडेल. जेव्हा अशा उत्सवांमधून साठलेले धन समाजाच्या कल्याणासाठी, गरीब मुलांच्या मोफत शिक्षणासाठी, विनामूल्य आरोग्य सुविधा देण्यासाठी दान केले तर तेसुद्धा अध्यात्म आहे. म्हणून मी मघाशी म्हटलं की आध्यात्मिकता ही केवळ देवांच्या छायाचित्रांपुरती मर्यादित नसते. जेव्हा अशा सार्वजनिक उत्सवांमधून गैरप्रकार टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात तेव्हा तिथे अध्यात्माचा वेगळा अर्थ सांगण्याची गरजच भासत नाही. आपल्या कृतीतून लहान मुलांच्या मनावर माणुसकीचा अर्थ बिंबवणे ही खरी आध्यात्मिकता असते. यामुळे समाजाचे आणि पर्यायाने आपलेसुद्धा आध्यामिक आरोग्य चांगले राहते.
एक अनुभव सांगतो. भोसले नावाच्या एका कुटुंबीयांमध्ये मालमत्तेवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला होता. दरम्यान नवरात्रीचा सण जवळ आला. त्यांच्या घरातील हा मोठा सण. पण त्यावर भांडणाचे सावट होते. त्यांच्या कुटुंबातील मुलांना हा सण सगळ्यांनी एकत्र साजरा करावा असे वाटत होते, पण या वर्षी सणासाठी जायचे नाही असे मोठय़ांनी बजावले होते. त्या मुलांनी माझा सल्ला मागितला. मी त्यांना का जावेसे वाटते असे विचारले तेव्हा त्या मुलांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला तिरस्काराचे धनी व्हायचे नाहीये.
अध्यात्माच्या आड जर तिरस्कार, द्वेष, येणार असेल तर तिथे आध्यात्मिक आरोग्य चांगले राहील? ज्या घराचा, तिथे साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाचा ती मुलं लहानपणापासून एक भाग होती तिथे त्यांना त्यापासून दूर ठेवण्यात काय हंशील? अर्थात त्या मुलांनी सण तिथे जाऊनच साजरा केला. ‘सण-उत्सव’ आणि ‘हॉस्पिटल’ या दोन अशा गोष्टी आहेत जिथे मतभेद, भांडणं, दुरावा, तिरस्कार या गोष्टींना पूर्णविराम देऊन एकत्र येण्याची संधी असते. भांडणं जगात सगळीकडेच आहेत पण अध्यात्म जर अशा गोष्टींना बाजूला सारण्याची संधी देत असेल तर त्यातून नव्या पिढीला अध्यात्माचा योग्य अर्थ उमगतो. कुटुंबांमधील वादविवाद, सूडबुद्धी, आकस, द्वेष या गोष्टी कधीच आनुवांशिक ठरू नयेत तसेच त्या पुढील पिढय़ांमध्ये परिवर्तित होऊ नयेत; उलट त्या तेव्हाच्या तेव्हा संपवायला हव्यात तरच तुमचं आध्यात्मिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राहतं.
अभियांत्रिकी शाखेत शिकणारा प्रमोद उपहासाने मला म्हणाला की ‘अध्यात्मावर विश्वास ठेवणारी माणसे मला अविवेकी वाटतात. आपला काही अध्यात्मावर विश्वास वगैरे नाही बुवा.’ अध्यात्मावर त्याचा विश्वास नव्हता, पण अशासकीय संस्थेत स्वयंसेवक या नात्याने मनोरुग्णांना विनामूल्य समुपदेशन करणे हे काम तो मनापासून करीत होता. रुग्णांविषयी अपार आस्था असलेला प्रमोद खऱ्या अर्थी आध्यात्मिक माणूस होता. अध्यात्मावर विश्वास नसलेली पण कारुण्य भावनेने काठोकाठ भरलेली प्रमोदसारखी माणसेसुद्धा एक प्रकारचे अध्यात्मच जपत असतात, फक्त त्यांची व्याख्या वेगळी असते. केवळ देवावर श्रद्धा आहे म्हणजे तुम्ही आध्यात्मिक आहात असे होत नाही किंवा देवावर श्रद्धा असणे हा तुम्ही आध्यात्मिक असल्याचा पुरावा आहे असे धरून चालू नये.
रक्षा लहानपणापासूनच सगळ्या सणांचे अगदी बारकाईने निरीक्षण करीत आली आहे. तिची देवावरची श्रद्धा ही सर्वोच्च आहे, असं ती मानते पण इतरांच्या श्रद्धेची मात्र मनसोक्त टिंगल करीत असते. आजकाल तिची मुलगीसुद्धा तिचंच अनुकरण करू लागली आहे. तीसुद्धा आईसारखीच इतरांच्या धर्माविषयी-श्रद्धेविषयी कायम गरळ ओकत असते. तिला फारशा मित्र-मैत्रिणी पण नाहीत. मित्रमैत्रिणींशी मतभेद असणे किंवा विचारांमध्ये तफावत असणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे, पण दुसऱ्यांच्या श्रद्धेची टर उडविणे आणि त्यांना कमी लेखणे यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आणि तुमच्यासुद्धा आध्यात्मिक आरोग्याला धक्का लागतो.
काही दिवसांपूर्वी मी एका महाविद्यालयात ‘व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान देत होतो. तेवढय़ात अनिश नावाचा एक मुलगा म्हणाला, ‘माझे दोन व्यसनी मित्र होते. तरी पण मी त्याच्याबरोबर राहायचो. त्यांची साथ मी कधीच सोडली नाही. उलट मी त्यांना अनेक वेळा माझ्याबरोबर प्रार्थनास्थळी घेऊन जायचो आणि तिथे आम्ही एकत्र प्रार्थना करायचो. कालांतराने दोघांनीही आपापली व्यसनं सोडली.’ आता या उदाहरणात पाहा की अनिशने त्याच्या मित्रांना आपली सोबत देऊन आणि त्यांच्याविषयी कणव बाळगून त्यांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी मदत केली- ही खरी आध्यात्मिक कृती आहे. त्याच्या मित्रांनी नित्यनेमाने प्रार्थना केल्यामुळे त्यांचे व्यसन सुटले असे नाही तर जे प्रेम आणि जो स्वीकार त्यांना अनिशकडून मिळाला त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
कुठल्याही घरात जेव्हा लोक आनंदी आणि समाधानी वृत्तीने देवाची पूजा-अर्चा, प्रार्थना करतात तेव्हा त्या घरातील मुलं आपोआप आकर्षित होतात. पण त्यांच्यावर प्रार्थना म्हणण्याची बळजबरी केल्याने किंवा त्यांना जबरदस्तीने प्रवचनांना पाठविल्याने काहीच साध्य होत नाही. जिथे देवाची भीती घातली जाते तिथे आध्यात्मिक आरोग्यशास्त्र कधीच बाळसं धरीत नाही. मुलांना देवाची भीती घालण्यापेक्षा देवावर प्रेम करायला सांगा. भीती घालून देवापुढे प्रार्थना म्हणायला उभे करणे हे आध्यात्मिक अनारोग्याचे लक्षण आहे. आजकाल तर अळंबी उगवावी व त्याला अचानक प्रचंड महत्त्व प्राप्त व्हावे तसे समाजात देवदेवता उगवल्या जातात आणि त्यांना महत्त्व बहाल केले जाते. ताणतणावात जगणारा आजचा समाज सहज त्याकडे ओढला जातो. एकसारखी प्रवचने ऐकणे, त्याचे व्यसन लागणे, अंधश्रद्धेवर विश्वास टाकणे, प्रत्येक बाबतीत देवाचा हवाला घेणे, बऱ्या-वाईट गोष्टींसाठी त्याला जबाबदार धरणे इत्यादी प्रकारांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो आणि तुम्ही प्रत्येक वेळी अधिक दुबळे बनत जाता. स्वत:ला देवाचे दूत समजणाऱ्या लोकांच्या मागे जाण्यात काहीच अर्थ नाही.
योग आणि विपश्यना ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. योग पुरुष पतंजली आणि गौतम बुद्ध हे आपल्या देशातील सर्वात महान वैज्ञानिक होते. त्यांच्या शिकवणीतून त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड तर घातलीच, पण त्याही पुढे जाऊन विज्ञान आणि अध्यात्म एकच आहे ही गोष्ट जगासमोर आणली. विज्ञानात अध्यात्म आहे आणि अध्यात्मात विज्ञान आहे या साध्या वाक्यातून त्यांनी आपल्याकडील मूलभूत गोष्टींची आपल्याला नव्याने ओळख करून दिली. फरक हाच आहे की विज्ञानात हेतू आणि परिणाम हे मूर्त आणि दृश्य स्वरूपात असायला लागतात तर अध्यात्मात तोच हेतू आणि परिणाम स्पष्ट दिसत नसले तरी ते अनुभवता येतात आणि कालांतराने त्याचे फायदेही मिळू लागतात.
कपाळावर बोटभर लांब टिळा लावणे किंवा अंगाखांद्यावर धार्मिक चिन्ह, गंडे-दोरे, अंगठय़ा, माळा, विशिष्ट रंगाचे कपडे मिरविणे म्हणजे आध्यात्मिक असणे नव्हे; तर या विश्वाशी एकात्म भावनेने जोडलेले असणे, एकमेकांच्या प्रति आदरभाव ठेवणे, निसर्गाशी असलेली बांधीलकी जपणे, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूचे या निसर्गातील स्थान लक्षात घेऊन त्यांचा स्वीकार करणे या गोष्टी सकारात्मक आध्यात्मिकतेचे लक्षण आहेत. तथाकथित गुरूंच्या मागे धावण्यापेक्षा किशोरवयीन मुलामुलींना त्यांच्यात दडलेला आत्मविश्वास नावाचा गुरू शोधायला मदत केली तर बरेच पुण्य (जे तुम्हाला अध्यात्मातून अपेक्षित आहे) गाठीशी जमा होईल.
स्वत:ला गुरू म्हणवून घेणारे लोक मला पंचतारांकित कंपन्यांपेक्षा वेगळे वाटत नाहीत. बहुउद्देशीय कंपन्या आणि हे तथाकथित गुरू या दोघांचेही हेतू सारखेच असतात. पण आपल्याला आपल्या आतील गुरूचा शोध लागला तर त्यातून जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा हृदयाचा ठेका अचूक ठेवते, मेंदूला कार्यरत ठेवते आणि अवयवांना सतत कार्यक्षम राहण्यास मदत करते. कुटुंबाचे आध्यात्मिक आरोग्य जर चांगल्या पद्धतीने जपले गेले तर ते अध्यात्म घरातील तरुणांमध्ये शांती आणि सद्भावनेची ज्योत अखंड तेवत ठेवते आणि त्यांना विवेकी बनवते हे खरे अध्यात्म. तासन्तास देवासमोर बसून राहणे म्हणजे अध्यात्म नव्हे किंवा समोर देवादिकांच्या मूर्ती असल्या म्हणजेच अध्यात्म करता येते, अध्यात्मासाठी प्रार्थनास्थळीच जावे लागते असेही नाही तर समोर मूर्त स्वरूपात देव नसतानाही अध्यात्म साधता येऊ शकते. आध्यात्मिक आरोग्य सशक्त होते ते यामुळेच. कारण शेवटी अध्यात्म हेसुद्धा एक विज्ञान आहे. ल्ल

(लेखात आलेली नावे बदललेली आहेत.)
शब्दांकन :- मनीषा नित्सुरे-जोशी