स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी अब्राहम िलकनचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, ‘यशाच्या ध्येयाप्रती प्रयत्नरत उमेदवाराच्या प्रवासात यशाच्या संकल्पाशिवाय दुसरी कोणतीही बाब महत्त्वपूर्ण असू शकत नाही.’ राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा मुख्य परीक्षा नुकतीच संपन्न झाली. मुख्य परीक्षा संपली की तीन-चार दिवसांचा आराम तर हवाच. तो तुमचा हक्काचा आहे. पण एका छोटय़ाशा विश्रांतीनंतर मुलाखतीची तयारी व इतर स्पर्धापरीक्षांची पूर्व, मुख्य परीक्षानिहाय तयारी तुमच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरू करावी.

राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल हा नेहमीच ठरलेला असतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये. राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा झाल्यानंतर सर्वच उमेदवारांना एकच सल्ला दिला होता, तो हा की पूर्वपरीक्षेच्या निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत, असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करावी. जेणे करून पूर्वपरीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी, मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची तयारी सुरक्षित होते व स्पध्रेत आपली दावेदारी भक्कम होते. स्पर्धापरीक्षा तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे, आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक गतिशील ठेवावे.

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्वच उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे आडाखे न बांधता त्यासाठीची सर्वसाधारण तयारी सुरू ठेवावी. मुख्य परीक्षेत यशस्वी होणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतीलच. पण अयशस्वी झालेले उमेदवार पुढच्या प्रयत्नासाठी ‘तयार’ राहतील. मुलाखतीची तयारी हा विषय वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा दीघरेत्तरी स्वरूपाचा एखादा पेपर सोडविण्यापुरता मर्यादित नाही. मुलाखतीचा थेट संबंध उमेदवारांच्या व्यक्तित्वाशी, व्यक्तिमत्त्वाशी असतो.व्यक्तिमत्त्व विकासही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक असतात.

मुलाखतीसाठी निवड झाली की साहजिकच उमेदवारांना त्याचा आनंद असतो पण त्याचप्रमाणात दबावसुद्धा जाणवतो. मुलाखतीचा पहिलाच प्रयत्न असणारे उमेदवार तर जोपर्यंत मुलाखत संपन्न होत नाही तोवर दबावाला सामोरे जात असल्याचा अनुभव आहे. मुलाखतीच्या तयारी निमित्ताने दबावाखाली येऊन खचून जाणे उमेदवारांसाठी चांगली बाब नाही. अपेक्षित यश मिळविण्यासाठी तुमचा दबाव सकारात्मक ऊर्जेत परिवर्तीत झाला पाहिजे.

मुलाखतीसाठी तयारी करताना उमेदवारांना जाणवणाऱ्या तणावाचे एक मुख्य कारण आपल्या कमतरतांची जाणीव हे असू शकते. मानवी व्यक्तिमत्त्वात कमतरता असणे अस्वाभाविक नाही. उणिवा, कमतरता असणे नसíगक आहे. अनेक उणिवा, कमतरता या मानवी स्वभावाचा भाग बनून त्या व्यक्तीमध्ये वास करत असतात. सर्व उणिवा आणि दोषांपासून मुक्ती हे शक्य नसते. मुलाखतीच्या तयारीसाठी मिळणाऱ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत तर हे अजिबातच शक्य नसते. अशा परिस्थितीत तणावमुक्त राहून तयारी करण्यासाठी सर्वपथम आपले कच्चे-पक्के दुवे समजून घेतले पाहिजेत. इच्छाशक्ती आणि दृढ आत्मविश्वासाच्या बळावर उणिवांना सामोरे जाता आले पाहिजे. त्यांना जिंकता आले पाहिजे. काही उमेदवार कल्पोकल्पित शंका-कुशंकेने ग्रस्त असतात. मुलाखतीबद्दल चुकीच्या लोकांकडून ऐकलेल्या निराधार माहितीच्या आधारे मुलाखतीबद्दल स्वतची अशी एक कल्पना तयार झालेली असते. त्या कल्पना विस्तारातच उमेदवार जगत असतात. काही उमेदवारांचा मोठा शत्रू असतो त्यांचा ईगो. ईगो म्हणजे व्यक्तीने स्वतबद्दल तयार केलेले स्वतचे अवास्तव मत असते. हे जितके फसवे तितकेच धोकादायक असते. अशा सर्व उणिवा-कमतरता जाणून, तणावमुक्त व दबावमुक्त राहून सहजतेने मुलाखतीची तयारी करता आली पाहिजे.

मुलाखतीबाबतचे समज-गरसमज दूर होण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय आहे याआधी मुलाखतीस सामोरे गेलेल्या यशस्वी व अयशस्वी उमेदवारांशी चर्चा करणे. वेगवेगळ्या मुलाखतींचा अनुभव समजून घेतल्यास मुलाखतीची तयारी व विचारांना योग्य दिशा सापडते. पूर्व व मुख्य परीक्षेबाबतचा दृष्टिकोन मिळणे, त्याबाबतचे गरसमज दूर होणे ही तुलनात्मकदृष्टय़ा सोपी गोष्ट आहे. मात्र मुलाखतीबाबतचे समज, न्यूनगंड, गरसमज, शंका दूर व्हाव्यात यासाठी नेमके प्रयत्न आवश्यक असतात. नियुक्तीचे पद, त्यासाठी आवश्यक गुण, मुलाखतीचे पॅनल व सदस्य, उमेदवारांच्या तयारीचा व आत्मविश्वासाचा स्तर अशा अनेक मूर्त / अमूर्त गोष्टींवर मुलाखतीचा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे योग्य पद्धतीने व नेमकेपणाने मुलाखतीची तयारी करणे आवश्यक असते. शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील मोठय़ा कंपन्या तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये नियुक्तीसाठी मुलाखत मंडळांकडून मुलाखती घेण्यात येतात. या प्रत्येक क्षेत्राची मागणी वेगळी असते व त्या त्या क्षेत्रामध्ये कामाच्या/क्षमतांच्या/कौशल्यांच्या आवश्यकतेच्या अनुषंगाने उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणी ही मुलाखत मंडळे घेत असतात. केंद्र व राज्य शासनातील विविध सेवांमधील पदांवर नियुक्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्येही मुलाखत हा निर्णायक टप्पा असतो. या मुलाखतींच्या तयारीसाठीची चर्चा पुढील काही लेखांमध्ये करण्यात येत आहे.