पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन आणि नागरी सेवा कल चाचणी या विषयांची तोंडओळख करून घेतल्यानंतर त्या विषयांच्या अभ्यासाची साधारण दिशा कशी असावी, या विषयी चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते. सामान्य अध्ययनाद्वारे सुरुवात करून ही दिशा लक्षात घेता येते. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासाची दिशा ठरवण्यापूर्वी त्यातील विविध अभ्यासघटकांचा अभ्यासक्रम बारकाईने लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. आयोगाने इतिहासापासून सामान्य विज्ञानापर्यंतच्या विषयांमध्ये जे घटक नमूद केले आहेत त्याचा सखोल अभ्यास करावा, जेणेकरून त्या विषयाची व्याप्ती ठरवता येईल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण होय. साधारणत: २०११ पासून २०१६ पर्यंतच्या सामान्य अध्ययनाच्या सर्व प्रश्नपत्रिकांचे अत्यंत सखोलपणे विश्लेषण करावे. विविध विषयांवर दर वर्षी किती प्रश्न विचारले जातात, त्यात संख्यात्मक बदल होतो का, त्यातील विशिष्टच घटकांवर अधिक प्रश्न विचारले जातात का; हे लक्षात घ्यावे. तसेच प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे या विश्लेषणाद्वारेच लक्षात घेता येते. म्हणजे प्रश्न संकल्पनात्मक आहे की माहिती वा तथ्यावर आधारित आहे? विश्लेषणात्मक आहे? चालू घडामोडींवर आधारित आहे? हे विश्लेषणातून ध्यानात येते. दिलेल्या अभ्यासक्रमावर किती आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा विचार करून येणाऱ्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यांची संभाव्यता अधोरेखित करता येते. थोडक्यात संख्यात्मक आणि आशयात्मक-गुणात्मक अशा दोन्ही अंगांनी मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता येतो.

प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचा स्वाभाविक फायदा म्हणजे अभ्यासाची दिशा ठरवण्यात मिळणारे साहाय्य होय. त्यामुळे एखादे प्रकरण कसे वाचायचे, त्याचा किती खोलवर विचार करायचा, वाचत असलेल्या बाबींतील कोणता भाग महत्त्वाचा मानायचा, त्यावर संभावित प्रश्नांचा विचार कसा करायचा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यासून होत असलेल्या विषय-प्रकरणांच्या नोट्स कशा काढायच्या या सर्व बाबी विश्लेषणामुळे कळू शकतात, अभ्यासाची दिशा ठरवण्यापूर्वीची प्राथमिक बाब म्हणून याकडे पाहणे जरुरीचे ठरते.

सर्वसाधारणपणे विचार करता प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या दोन पद्धती अवलंबता येतात. यातील पहिली पद्धत म्हणजे मागील प्रश्नांचे वर्षांनुसार केले जाणारे नियोजन-ज्यात संबंधित वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा विचार केला जातो. दुसरी पद्धत म्हणजे विषयानुसार प्रश्नांचे विश्लेषण, ज्यात मागील वर्षांत प्रत्येक विषयावर जे प्रश्न विचारले जातात त्याचा विचार होय. या विषयाधारित विश्लेषणात आणखी सखोल जाऊन प्रकरणनिहाय वर्गीकरण व विश्लेषणही करता येते. अशा रीतीने सामान्य अध्ययनातील विषय व त्यातील प्रकरणांचा अभ्यासक्रम, त्याची व्याप्ती, खोली अशा विविध अंगांनी ही परीक्षा समजून घेण्यासाठी प्रस्तुत विश्लेषण साहाय्यभूत ठरते. त्यामुळे अभ्यासाच्या तयारीपूर्वी दोन-तीन आठवडय़ांचा कालावधी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणासाठी राखीव ठेवावा लागला तरी त्यात काही वावगे ठरू नये.

अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर सामान्य अध्ययनाच्या प्रत्यक्ष अभ्यासाची दिशा ठरवणे आता सुलभ जाईल. व्यापकपणे विचार करता कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना पुढील घटकांची काळजी घेणे अगत्याचे ठरते. संकल्पनात्मक आकलन हा कोणत्याही विषयाचा पाया असल्याने त्या त्या विषयातील विविध संकल्पना, व्यवस्थितपणे समजून घेणे अत्यावश्यक ठरते. संबंधित संकल्पनेचा अर्थ, वैशिष्टय़े, तिच्या अर्थाविषयी विविध विवाद आणि तिचे उपयोजन अशा विविध अंगांनी संकल्पना समजून घेता येतात. उदाहरणार्थ राज्यघटनेचा अभ्यास करताना गणराज्य, धर्मनिरपेक्षता, मूलभूत हक्क, संघराज्य, न्यायिक पुनरावलोकन इ. महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासाव्या लागतात. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतानाही राष्ट्रीय उत्पन्नापासून आíथक विकास प्रारूपविषयक विविध संकल्पना लक्षात घ्याव्या लागतात.

विविध विषयात-प्रकरणात येणारी निरनिराळी माहिती, तथ्ये व आकडेवारी हा अभ्यासप्रक्रियेत येणारा दुसरा महत्त्वाचा घटक होय. बऱ्याच वेळा प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांच्या माहितीचा पाया तपासला जातो. वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांच्या बाबतीत कोणत्याही अभ्यासघटकाशी संबंधित विविध स्वरूपाची माहिती उपयुक्त ठरते. अर्थात, हा माहितीचा घटक तांत्रिक स्वरूपाचा असल्याने त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करणे गरजेचे ठरते. अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात अशी माहिती अधोरेखित करणे, ती थोडक्यात नोट्सच्या स्वरूपात लिहून काढणे महत्त्वाचे ठरते.

चालू घडामोडीचे आयाम हे पुढील आयाम होय. प्रत्येक विषयास कमी-अधिक प्रमाणात समकालीन, चालू घडामोडीचे आयाम असते. अशा समकालीन आयामास सविस्तरपणे लक्षात घेणे आणि त्याची प्रभावीपणे तयारी करणे अत्यावश्यक आहे. केंद्र लोकसेवा आयोग दर वर्षी प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात बदल करत असतो. त्याचाच भाग म्हणून बऱ्याचदा चालू घडामोडीच्या आयामावर भर दिला जाऊ शकतो. उदा. २०१६च्या (पूर्वपरीक्षेत) सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेत सुमारे ८० टक्के प्रश्न चालू घडामोडींवर आधारित होते. त्यामुळे, अशा प्रकारची शक्यता लक्षात घेऊन चालू घडामोडीचा घटक प्रारंभापासून तयार करणे महत्त्वाचे ठरते.