आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासक्रमामध्ये नमूद तंत्रज्ञान या घटकाची एकत्रित परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. हा घटक जरी तंत्रज्ञान या नावाने अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेला असला तरी यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून अभ्यास करावा लागतो. या घटकाअंतर्गत आपणाला विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास आणि याची उपयोगिता आणि याचे सर्वसामान्याच्या जीवनावर होणारे परिणाम, भारतीयाने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मिळविलेले यश, नवीन तंत्रज्ञानाचा विकास तसेच माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार व संबंधित मुद्दे इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी अशा पद्धतीने या घटकाशी संबंधित मुद्दे अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेले आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या तीन मुख्य परीक्षामध्ये या घटकावर २०१३ मध्ये चार, २०१४ मध्ये तीन आणि २०१५ मध्ये चार इतके प्रश्न विचारण्यात आलेले होते. यातील काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.
२०१३ मुख्य परीक्षा
(१) निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs) यावरून काय समजते? याच्या गुण आणि दोषाची चर्चा करा.
(२) डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) काय आहे? यानुसार अधिप्रमाणन म्हणजे काय? डिजिटल स्वाक्षरीमध्ये अंतर्भूत असणारे विविध ठळक वैशिष्टय़े सांगा.
(३)३ आयामी मुद्रण (3D Printing) तंत्रज्ञान कशा प्रकारे कार्य करते? या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे याची यादी करा.
२०१४ मुख्य परीक्षा
(१) भारतातील विद्यापीठामधील वैज्ञानिक संशोधन घटत आहे, कारण विज्ञानामधील करियर हे इतके आकर्षक नाही की जे व्यापार व्यवसाय, अभियांत्रिकी किंवा प्रशासन यामध्ये आहे आणि विद्यापीठे हे उपभोक्ताभिमुख होत चाललेली आहेत. समीक्षात्मक टिप्पणी करा.
(२) जागतिकीकरण झालेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकार यांना विशेष महत्त्व आहे आणि हे खटल्याचे एकस्रोत बनले आहे. कॉपीराइट, पेटंट्स आणि व्यापार गुपिते यामध्ये सामन्यात काय फरक आहे?
२०१५ मुख्य परीक्षा
(१) जी.पी.एस (GPS) युगामध्ये मानक स्थिती निर्धारण प्रणाली (Standard positioning system) आणि अचूक स्थिती निर्धारणप्रणाली (Precision positioning system) यावरून तुम्हाला काय समजते? चर्चा करा, केवळ सात उपग्रहाच्या साह्य़ाने भारत आई.आर.एन.एस.एस (IRNSS) या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमापासून स्वत:साठी होणारे फायदे कसे पाहतोय.
(२) प्रतिबंधित श्रमाची कोणती क्षेत्रे आहेत जी यंत्रमानवाद्वारे (Robots) सातत्याने विस्थापित केली जाऊ शकतात? अशा उपक्रमांची चर्चा करा, जे प्रमुख संशोधन संस्थांमध्ये स्वतंत्र आणि नावीन्यपूर्ण लाभदायक संशोधनासाठी चालना देतील.
उपरोक्त प्रश्नांची आपण थोडक्यात चर्चा करू, बहुतांशी प्रश्न हे संकल्पना व त्यांचे आणि त्यामधील तांत्रिक बाबी यांचा एकत्रितपणे विचार करून विचारण्यात आलेले आहेत. २०१३ मधील जवळपास सर्व प्रश्न हे तंत्रज्ञानामधील संकल्पना, या संकल्पनांचा अर्थ, आणि यांची असणारी वैशिष्टय़े अशा पलूंवर विचारण्यात आलेली आहेत. निश्चित मात्रा औषध संयोग (FDCs), डिजिटल स्वाक्षरी (Digital Signature) आणि ३ आयामी मुद्रण (3D Printing) तंत्रज्ञान यांसारख्या संकल्पना या वस्तुनिष्ठ पद्धतीच्या असतात आणि याची माहिती तुम्हाला असल्याशिवाय उत्तरे लिहिता येत नाहीत. २०१४ मधील प्रश्न हे संकल्पना आणि संशोधनातील स्थिती यासारख्या मुद्दय़ांवर विचारण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ विद्यापीठामध्ये संशोधनात होणारी घट यांसारख्या महत्त्वाच्या पलूवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. थोडक्यात या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी संशोधन हे काय आहे तसेच याकडे उत्तम करियर म्हणून का पहिले जात नाही, तसेच या क्षेत्रात इतर क्षेत्रांच्या तुलनेत आर्थिक लाभाचे प्रमाण, करियरची उपलब्धता आणि सुरक्षितता नेमकी किती आहे. तसेच अशी स्थिती का झालेली आहे. याला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत यांसारख्या बाबींचा विचार करून तसेच याला विद्यापीठामधील संशोधनाच्या आकडेवारीचीही जोड द्यावी लागते, तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर अधिक समर्पकपणे लिहिता येऊ शकते. २०१५ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नाचेही स्वरूप संकल्पनाधारित होते तसेच याच्या जोडीला या तंत्रज्ञानामुळे होणारे परिणाम, तसेच तंत्रज्ञानाची उपयुक्तता इत्यादी बाबींना गृहीत धरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. थोडय़ाफार फरकाने प्रश्न विचारण्याचे स्वरूप सारखेच आहे, कारण हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने अधिक वस्तुनिष्ठ आहे. त्यामुळे संबंधित संकल्पना, या संकल्पनांची वैशिष्टय़े आणि यांची असणारी उपयुक्तता इत्यादी बाबींची माहिती असणे अपरिहार्य ठरते, हे उपरोक्त प्रश्नावरून आपण समजून घेऊ शकतो.
या घटकाचे परीक्षाभिमुख अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी थोडक्यात चर्चा करू या. हा घटक अभ्यासताना आपणाला दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पहिली बाब या घटकामध्ये संकल्पनांवर आधारित प्रश्न अधिक प्रमाणात विचारले जातात आणि दुसरी बाब या घटकांवर विचारण्यात येणारे जवळपास सर्व प्रश्न हे या घटकाशी संबंधित घडणाऱ्या चालू घडामोडींवर विचारले जातात. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी या घटकाची मूलभूत माहिती देणारी अनेक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ TMH, Spectrum या पब्लिकेशन्सची विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटकावर पुस्तके आहेत आणि या पुस्तकाचा वापर आपणाला या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी करता येऊ शकतो, कारण ही पुस्तके नमूद अभ्यासक्रमानुसार लिहिलेली असतात, त्यामुळे आपणाला प्रत्येक नमूद केलेल्या मुद्दय़ाची मूलभूत माहिती मिळते.
भारतातील अवकाश तंत्रज्ञान विकास कार्यक्रम, क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान, संगणक, रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, यांची नेमकी सुरुवात कशी झालेली आहे, यासाठी नेमक्या कोणत्या संस्था कार्यरत आहेत. हे तंत्रज्ञान नेमके सामाजिक, आíथक आणि देशाची सामरिक सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती असणे गरजेचे आहे, तसेच या घटकाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी विषयाची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे, जी आपणाला उपरोक्त नमूद पुस्तकामधून मिळते. या घटकाशी संबंधित चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, साइन्स रिपोर्टर, डाऊन टू अर्थ ही मासिके तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित संस्था, मंत्रालय याच्या वेबसाइट्स आणि मराठीमध्ये या घटकाशी संबंधित चालू घडामोडीसाठी द युनिक अकादमीद्वारे प्रकाशित ‘भारत वार्षकिी’मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित प्रकरण इत्यादींचा उपयोग करता येऊ शकतो. यापुढील लेखामध्ये आपण जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. (लेखांक-९)