केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयातर्फे विदेशातील प्रमुख संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या २०१६-१७ वर्षांसाठीच्या विशेष शिष्यवृत्तींसाठी खालीलप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या व तपशील- योजनेअंतर्गत उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १०० असून त्यापैकी ९० शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या, ६ शिष्यवृत्ती भटक्या- विमुक्त जमातीच्या तर ४ शिष्यवृत्ती भूमिहीन वा परंपरागत कारागिरी करणाऱ्या वर्गगटातील विद्यार्थ्यांसाठी आहेत.

शिष्यवृत्तींचा विषयवार तपशील-

  • विषय उपलब्ध शिष्यवृत्ती
  • अभियांत्रिकी व व्यवस्थापन ३२
  • विज्ञान आणि अप्लाइड सायन्स १८
  • कृषी विज्ञान व वैद्यकशास्त्र १७
  • आंतरराष्ट्रीय वाणिज्य, लेखा व अर्थशास्त्र १७
  • मानवीय शास्त्र, सामाजिक विज्ञान, फाइन आर्ट्स १७
  • एकूण शिष्यवृत्ती १००

आवश्यक पात्रता- अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत.

पीएचडी करण्यासाठी- अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित क्षेत्रातील संशोधनाचा अनुभव असायला हवा.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी- अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय १ एप्रिल २०१६ रोजी ३५ वर्षांहून अधिक नसावे.

विशेष सूचना- अर्जदार विद्यार्थी इतर कुठल्याही शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी नसावेत. त्यांच्या घरचे वार्षिक एकत्रित उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे. अर्जदार विद्यार्थ्यांनी संबंधित विषयाच्या विशिष्ट अभ्यासक्रमासाठी विदेशातील विद्यापीठात प्रवेश घेतलेला असावा.

निवड पद्धती- अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व शैक्षणिक आलेखाच्या आधारे त्यांना संबंधित शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

शिष्यवृत्तीचा कालावधी- योजनेअंतर्गत निवड झालेल्या देय असणाऱ्या शिष्यवृत्तीचा कालावधी खालीलप्रमाणे असेल –

  • संशोधनपर पीएचडीसाठी ४ वर्षे.
  • पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३ वर्षे.
  • शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनपर कालावधीमध्ये खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देय असेल-
  • अमेरिका व इतर देश- १५४०० अमेरिकी डॉलर्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती व आकस्मिक खर्चापोटी १५०० अमेरिकन डॉलर्स.
  • इंग्लंड- ९९०० ग्रेट ब्रिटन पाउंड्सची शैक्षणिक शिष्यवृत्ती व आकस्मिक खर्चापोटी ११०० ब्रिटन पाउंड्स.

वरील शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या रकमेशिवाय शिष्यवृत्ती कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांना व्हिजा शुल्क, शैक्षणिक शुल्क, वैद्यकीय विमा, विमान भाडे, स्थानिक आनुवंशिक प्रवास, इ. फायदेपण देय असतील.

अधिक माहिती व तपशील- योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागाची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या www.socialjustice.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, एससीडी- व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अ‍ॅण्ड एम्पॉवरमेंट, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अ‍ॅण्ड एम्पॉवरमेंट, रूम नं. २११, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्रप्रसाद मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ३१ मार्च २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.