अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासन अनेक योजना आखत असते. या योजनांचा फायदा घेऊन  विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करून घ्यावी, ही एकच अपेक्षा त्यामागे असते. यातीलच काही योजनांची माहिती आपण करून घेऊ.

*      उच्च, तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना 

राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उच्च, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा आणि या समाजातील होतकरू आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी ही योजना राबविण्यात येते.

या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक विद्यार्थी ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असेल, त्या अभ्यासक्रमाकरिता आकारण्यात आलेले वार्षिक शैक्षणिक शुल्क किंवा पंचवीस हजार रुपये (वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रम/तांत्रिक व व्यावसायिक शैक्षिणिक अभ्यासक्रमासाठी),

पाच हजार रुपये (इयत्ता १२वीनंतरचे अभ्यासक्रम उदा. कला, वाणिज्य व विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी) यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व स्रोतांसहित वार्षिक उत्पन्न ६ लाख किंवा त्याहून कमी असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येतात आणि शिष्यवृत्तीची रक्कमही थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

दरवर्षी वैद्यकीय व अर्धवैद्यकीय  अभ्यासक्रमांसाठी २,५००/- नवीन  शिष्यवृत्ती, तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी १५,०००/- नवीन शिष्यवृत्ती व इयत्ता १२वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांसाठी (कला, वाणिज्य व विज्ञान) २,०००/- नवीन शिष्यवृत्ती तसेच नूतनीकरणासाठी प्राप्त सर्व अर्जानुसार सर्व अभ्यासक्रमासाठी सर्व विद्यार्थाना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, हे शासनाचे उद्दिष्ट आहे.

या योजनेची अंमलबजावणी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक करतात.

वर्षां फडके

varsha100780@gmail.com

(लेखिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ साहाय्यक संचालक असून अल्पसंख्याक विकास विभागाच्या संपर्क अधिकारी आहेत.)