शास्त्रज्ञ होण्यासाठी नेमके काय करायला हवे हे आपण कालच्या लेखात पाहिले. त्यासाठीचे ग्रॅज्युएट स्टुडंट प्रोग्रॅम राबवणाऱ्या संस्थांची विस्तृत माहिती घेऊया.

*   इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू (आयआयए) (http://www.iiap.res.in/ )

या संस्थेत प्रामुख्याने निरीक्षणात्मक काम होते. या संस्थेच्या अनेक वेधशाळा आहेत. कोडईकॅनाल येथे सौर दुर्बीण, कावलून (तामिळनाडू) येथे आशियातील सर्वात मोठी २.३४ मीटर व्यासाच्या आरशाची वैणू बापू दुर्बीण तसेच इतरही अनेक प्रकारच्या खगोलिय दुर्बिणी आहेत. याशिवाय एक दुर्बीण लडाखमध्येही आहे. या दुर्बिणीचे संचालन बंगळुरूमधूनच होते.

*  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू (आयआयएससी)(http://www.iisc.ac.in/)

बंगळुरू येथील ही संस्था विज्ञान संशोधनाशी निगडित एक मोठी संस्था आहे. तसेच ती देशातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे काही खगोलशास्त्रज्ञही काम करतात.

* नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, पुणे (एनसीआरए-टीआएफआर) (http://www.ncra.tifr.res.in/)

इथे प्रामुख्याने रेडिओ तरंगलहरींचे निरीक्षण घेण्यात येते. या ठिकाणी इंजिनीअर्सनाही भरपूर वाव आहे. ही संस्था टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआरएफआर)चाच एक भाग आहे. या संस्थेची जगातील सर्वात मोठी रेडियो दुर्बीण खोडद इथे आहे. ही संस्था पुणे विद्यापीठाच्या आवारात आहे.

*  इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, पुणे (आययूसीएए)(http://www.iucaa.in)

ही संस्था आयुका नावानेही प्रसिद्ध आहे. या संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश विद्यापीठ क्षेत्रातील शास्त्रज्ञांना खगोलशास्त्रात संशोधन करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

*  फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी, अहमदाबाद(पीआरएल) (http://www.prl.res.in/)

ही संस्था अहमदाबाद येथे आहे. या संस्थेत पण विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत संशोधन होते. या संस्थेची एक दुर्बीण आबू पर्वत रांगेतील गुरू शिखर येथे आहे. ही दुर्बीण अधोरक्त तरंगलांबीच्या प्रकाशाच्या निरीक्षणांसाठी बसवलेली आहे. तसेच या संस्थेच्या सौर दुर्बिणींचे एक संकुल उदयपूरला आहे.

*  रामन रिसर्च इन्स्टिटय़ूट, बंगळुरू(आरआरआय) (http://www.rri.res.in/)

बंगळुरूमधील ही संस्था सर सीव्ही रामन यांनी सुरू केली आहे. या संस्थेतही वेगवेगळ्या प्रकारचे खगोलशास्त्राशी निगडित संशोधन करण्यात येते.

*  टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई (टीआयएफआर) (http://www.tifr.res.in/)

ही भारतातील एक मोठी आणि एक मल्टी डिसिप्लिनरी संस्था आहे. या संस्थेचे मुख्य केंद्र मुंबईत आहे. वर नमूद केलेली एमसीआरए ही संस्था तसेच उटी येथील उटी रेडिओ दुर्बीण याच संस्थेशी निगडित आहे.

खाली दिलेल्या दोन्ही संस्थांमधून खगोलशास्त्रज्ञ काम करतात, पण येथे प्रामुख्याने सैद्धांतिक किंवा खगोलभौतिक शास्त्रावर संशोधन करण्यात येते.

*  हरिश-चंद्र रिसर्च इन्स्टिटय़ूट, अलाहाबाद (एचआरआय) (http://www.hri.res.in/)

* द इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्स, चेन्नई (आयएमएससी) ( http://www.imsc.res.in/)

याशिवाय अनेक विद्यापीठांतील भौतिकशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांसोबतही तुम्ही खगोलशास्त्रांत पीएच.डी. करू शकता. ग्रॅज्युएट स्टुडंट प्रोग्रॅममधील प्रवेशासाठी वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे नियम असतात. या संदर्भात हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या प्रक्रियेचा अभ्यासक्रम काय? तर त्याचे उत्तर म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत जे शिकवले आहे ते सर्व. एमएस्सीपर्यंत तुम्ही शिकलेले खगोलशास्त्र आणि गणिताचा पुरेसा अभ्यास असायला हवा. जे विद्यार्थी इंजिनीअरिंग करून आलेले असतात, त्यांच्याकडून त्यांच्या त्या ज्ञानाचीही चाचणी घेण्यात येते. यामध्ये तुम्हाला दिलेला प्रश्न कसा सोडवता, याकडे परीक्षकांचे काटेकोर लक्ष असते. हे प्रश्न कुठल्याच पुस्तकात सापडत नाहीत. पण जर तुम्ही संकल्पना नीट समजून घेतलेल्या असतील तर ते अवघडही वाटत नाहीत. थोडक्यात स्वतंत्र विचार करून तुम्ही प्रश्न सोडवण्याकडे कशी वाटचाल करता, हे पाहण्यात येते. यावरून शास्त्रज्ञ होण्याची वृत्ती दिसते. केवळ पाठांतर किंवा घोकंपट्टी इथे कामाची नाही. एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये अशी चुणूक दिसून आली तर परीक्षक कधी कधी त्याला लहानशी वाटही दाखवू शकतात. कारण त्यांना माहिती असते की, काही वेळा गोंधळून गेल्यामुळे विद्यार्थी योग्य उत्तराकडे जाताना अडखळतात. पण हेच जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसताना जर कोणी उत्तरे ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो लगेच पकडलाही जातो. तरीही साधारण अभ्यासाची दिशा ठरवायची तर तुम्ही जशी जीआरई किंवा जेईईसाठी कराल तशी तयारी करायला हवी. या संस्थांमध्ये जागा आहेत म्हणून भरल्या जात नाहीत. जर १० जागा असतील पण आलेल्या उमेदवारांपैकी एकच पात्र वाटत असेल तर फक्त त्यालाच प्रवेश मिळतो. म्हणूनच या क्षेत्रात येण्यासाठी भरमसाट गुणांपेक्षा अभ्यासाचे आकलन महत्त्वाचे आहे. गणित आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास आणि संशोधकाची वृत्ती असेल तरच शास्त्रज्ञ होता येते.

यापलीकडेही तुम्ही इंजिनीअर असाल आणि खगोलशास्त्राची आवड असेल तर अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल इन्स्ट्रमेंटेशनमध्ये करिअरची संधी आहे. कारण खगोलनिरीक्षकाला उपकरणात नेमके काय अपेक्षित आहे, हे तुम्ही सुचवू शकता. त्याही पलीकडे जाऊन तुम्ही चांगले उपकरणही बनवू शकता. आपल्याकडे अशीही अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी बीई केल्यानंतर इंजिनीअरिंगमधल्या करिअरऐवजी शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचे ठरवले. खगोलशास्त्राची आवड तर आहे पण संशोधनाची इच्छा नसलेल्यांसाठी विज्ञान प्रसाराचा एक मोठा मार्ग आहे. लोकांना समजेल अशा शब्दांत माहिती देऊन तुम्ही अनेकांमध्ये या विषयाची आवड निर्माण करू शकता.

अरविंद परांजपे

(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)

idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?

Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर

lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत