प्रत्येक व्यक्तीसाठी आहार हा फार महत्त्वाचा असतो. एखादी व्यक्ती नेमके काय काम करते, तिची किती ऊर्जा खर्च होते, यावर त्या व्यक्तीचा आहार ठरत असतो. खेळाडूंना तंदुरुस्त राहण्यासाठी आहाराचीही गरज असते. प्रत्येक खेळाचा कार्यकाळ वेगळा असतो. कुस्तीचा सामना पाच मिनिटांमध्येही संपतो, तर कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पाच दिवसांमध्ये प्रत्येकी आठ तासांचा खेळ होतो. त्यामुळे खेळानुसार खेळाडूंचा आहारही बदलत असतो. खेळाडूंनी कधी, काय, कसे, केव्हा खायला हवे हे क्रीडा आहारतज्ज्ञ ठरवत असतात. खेळाडू कोणत्या वेळी काय क्रिया करतात किंवा त्यांना एखाद्या क्रियेसाठी किती ऊर्जा लागते, यानुसार क्रीडा आहारतज्ज्ञ खेळाडूंना आहाराबाबत मार्गदर्शन करत असतात.क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना हा एक पर्याय उपलब्ध आहे, कारण जवळपास साऱ्या संघांना क्रीडा आहारतज्ज्ञांची गरज असते. त्याचबरोबर काही मोठे खेळाडू वैयक्तिक क्रीडा आहारतज्ज्ञांचीही नेमणूक करतात. त्यामुळे या क्षेत्रात भविष्यात चांगली कारकीर्द घडवता येऊ शकते.

*   क्रीडा आहारतज्ज्ञाची गरज कशाला?

खेळाडूसाठी खेळ आणि त्यामधील यश फार महत्त्वाचे असते. त्यासाठी खेळापूर्वी ऊर्जा मिळण्यासाठी कोणता आहार करायला हवा, खेळताना मध्यंतरामध्ये कोणते पदार्थ खायला हवेत किंवा खेळ सुरू असताना जेव्हा ऊर्जेची अधिक गरज असते तेव्हा काय खायला आणि प्यायला हवे, हे आहारतज्ज्ञ सांगतात. आहारतज्ज्ञ सोबत असला तर खेळाडू निश्चिंत राहू शकतो, कारण जर चुकीचा आहार केला तर त्याचा परिणाम खेळावर होऊ शकतो. काही वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून आहारामधून काही उत्तेजक देण्याचीही शक्यता असते. अशावेळी आहारतज्ज्ञ मदतीला धावून येतात. ते आपला आहार कसा असावा आणि नेमका कधी काय आहार करायला हवा, याबाबतचे मार्गदर्शन खेळाडूला करत असतात.

*   आहारतज्ज्ञ होण्यासाठी..

ज्या व्यक्तीला खेळ आणि आहार या दोन्ही गोष्टींमधील सखोल ज्ञान आहे, त्या व्यक्ती यामध्ये कारकीर्द घडवू शकतात; पण जर या व्यक्ती व्यावसायिक म्हणून काम करायचे असेल तर त्यांना पदवी मिळवणे अनिवार्यच असेल. साधारणत: क्रीडा संस्था किंवा व्यायामशाळांपासून या कारकीर्दीला सुरुवात झाली, असे आपण म्हणू शकतो. यामध्ये कारकीर्द घडवण्यासाठी आहारविषयक पदवी मिळवावी लागते, त्यानंतर ‘स्पोर्ट्स न्यूट्रिशन’मधील प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

*   शिक्षणसंस्था

* ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई. (www.sndt.ac.in)

* निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स, मुंबई (http://nirmalaniketan.com)

*  व्ही.एल.सी.सी. इन्स्टिटय़ूट, शाखा : नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, पंजाब, सूरत. (http://www.vlccinstitute.com/courses/certificate-course-in-sports-fitness-nutrition/)

*  तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स विद्यापीठ (http://www.tnpesu.org)

* इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन (http://altmedworld.net/)

* संधी कुठे मिळतील?

आहारतज्ज्ञाची पदवी मिळवली असेल तर कोणत्याही संघासाठी काम करण्याची संधी मिळू शकते. त्याचबरोबर काही मोठय़ा खेळाडूंकडे वैयक्तिक आहारतज्ज्ञ म्हणून काम मिळू शकते. मोठय़ा व्यायामशाळांमध्ये आहारतज्ज्ञांना चांगली मागणी आहे. त्याचबरोबर क्रीडा संस्थांमध्येही वाव मिळू शकतो.