राजांच्या पिढय़ांची नावे, सनावळ्यांचे जंजाळ यामुळे इतिहासाशी अनेकांचे वाकडे असते. पण संपूर्ण मानवजातीच्या प्रवासाचा मागोवा घेणाऱ्या या शाखेत करिअरच्या अनेक संधी आहेत.

उत्खननशास्त्र किंवा आर्किओलॉजी ही इतिहासाची एक महत्त्वाची शाखा. मानवी इतिहास हा त्याने बांधलेल्या वास्तू,  गाडल्या गेलेल्या मानवनिर्मित गोष्टी, शिलालेख किंवा काळानुरूप तयार केलेल्या सुखसुविधा यांवरून अभ्यासला जातो. विविध ठिकाणी हजारो किंवा लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा किंवा भौगोलिक उलथापालथींचा अभ्यास करण्यासाठी त्या कालखंडातील अवशेषांची वा पुराव्यांची निकड वैज्ञानिकांना आणि इतिहासकारांना असते. पुरातत्त्व शास्त्र अशाच शास्त्रांचा अभ्यास आणि जपणूक करण्यावर भर देते. भारतात ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.  इतिहासापोटी असलेल्या कमालीच्या उदासीनतेमुळे स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या खात्याकडे थोडे दुर्लक्ष झाले. गेल्या काही वर्षांत मात्र या खात्याला मिळणाऱ्या निधीत आणि प्रतिसादात पुन्हा एकदा उत्साहवर्धक वाढ आहे.  हे खाते, हडप्पाकालीन अवशेषांपासून ते अलीकडच्या ब्रिटिश साम्राज्यातील विविध इमारतींच्या अवशेषांचा आणि इतर पुराव्यांचा सखोल अभ्यास करते. आजही परदेशांत आणि खासकरून पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये या शास्त्रातील जाणकारांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

मुघल-ए-आझम ते अगदी अलीकडील ‘बाजीराव-मस्तानी’पर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दुसऱ्या महायुद्धातील डंकर्कच्या यशस्वी माघारीवर आधारित डंकर्क चित्रपटाच्या ट्रेलरने मध्यंतरी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. अशा ऐतिहासिक कलाकृतींच्या निर्मितीसाठी इतिहासाचे परखड ज्ञान आणि ऐतिहासिक कालखंडातील समाज जीवनाचे ज्ञान असण्याची आवश्यकता असते. यासाठी निर्मात्यांना गरज भासते ती इतिहासतज्ज्ञांची. त्या कालखंडातील विशिष्ट प्रकारचे पोशाख, आभूषणे, वास्तू, कलाविष्कार इतकेच नाही तर अगदी भाषा यांची अचूक मांडणी एखाद्या चित्रपटाला पूर्णत्वाकडे नेण्याचे काम करते. या सर्व कामांसाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. तसेच मालिकांतील संदर्भ शोधण्यासाठीही इतिहासाच्या जाणकारांची दीर्घकालीन मदत घेतली जाते.

काही वेळेस ऐतिहासिक कालखंडाचा आधार घेऊन काही काल्पनिक कथांची मांडणी केली जाते. एखादी काल्पनिक घटना ऐतिहासिक कालखंडात बसवून त्याची पुढे चित्रपट, मालिका किंवा नाटय़निर्मिती केली जाते. या कथा लिहिण्यासाठी आवश्यक असलेले इतिहासाचे ज्ञान, या क्षेत्रातील अभ्यासक आणि पदवीधरच देऊ शकतात. एकतर ते माहिती देऊ शकतात किंवा कलात्मक लिखाणाची आवड असल्यास स्वत कथाही लिहू शकतात.

इतिहास हा राजकीयही असतो. भारतीय स्वातंत्र्य समर असेल किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील ठळक घडामोडी असोत, हा भारताचा राजकीय इतिहास म्हणता येईल. त्या घडामोडीचे राजकीय आणि ऐतिहासिक विश्लेषण हे बऱ्याच प्रमाणात वेगळे असू शकते. राजकीय इतिहास ही आजच्या आधुनिक काळात एक महत्त्वाची शाखा गणली जाते. या शाखेतील संशोधनाचा आवाका सध्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. राजकीय इतिहासाच्या जाणकारांना शैक्षणिक क्षेत्रात सध्या मोठी मागणी आहे.

नाणी जमवण्यापलीकडे जाऊन  पुरातन मुद्रा जमवणे, त्यांचा अभ्यास करणे, ही महत्त्वाची बाब आहे. कोणत्याही देशाच्या, राज्यांच्या चलन मुद्रा हा त्या प्रदेशाच्या इतिहासाचे प्रतीक असतात. इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी चलन मुद्रांचा अभ्यास करणारी न्युमिसमॅटिक्स् ही शाखा जगभर प्रसिद्ध आहे. उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणची नाणी शोधणं, त्याचे संदर्भ लावणे आणि इतिहासाचा अभ्यास करणे, हा या संशोधकांचा मुख्य उद्देश असतो.

इतिहासाचा वारसा पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवायचा झाल्यास वस्तुसंग्रहालयांची निर्मिती करणे आवश्यक आहे. या समृद्ध वारशाची संग्रहालयात जपणूक करण्याच्या शास्त्रालाच ‘म्युझियम सायन्स’ असं संबोधलं जातं. संग्रहालयात मांडल्या जाणाऱ्या वस्तू, त्यांचा योग्य क्रम यामागे एक विशिष्ट शास्त्रीय दृष्टिकोन आहे. त्याबद्दल या अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण मिळते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद आणि इतर काही महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात.

अनेक कॉपरेरेट कंपन्याही त्यांच्या ऐतिहासिक दस्तावेज विभागात इतिहास पदवीधारकांची भरती करतात. एखाद्या कंपनीचा प्रगल्भ इतिहास ही त्या संस्थेसाठी अभिमानाची बाब असते. हा ठेवा जपण्यासाठी इतिहास जाणकारांची निकड भासू शकते.

इतिहासात पदवी मिळवलेले अनेक विद्यार्थी आजकाल शहरांच्या विविध भागांमध्ये हेरिटेज वॉक्स आयोजित करतात. इतिहासाचं सखोल ज्ञान आणि त्याला जर संभाषण कौशल्याची जोड असेल तर हा करिअरचा उत्तम मार्ग असू शकतो.

याशिवाय, इतिहासातील पदवीधारकांसाठी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्त्य राष्ट्रांत इतिहास संशोधकांना बरीच मागणी आहे तसेच मिळणाऱ्या पैशांचे प्रमाणही तुलनेने जास्त आहे. पदवी अभ्यासक्रमात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात इतिहास विषय घेतलेल्या अनेकांचा स्पर्धा परीक्षांकडे कल दिसतो. पण, त्यापेक्षाही इतिहास या विषयाचा आवाका बराच मोठा आहे. मुंबई विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन संस्था, दिल्ली विद्यापीठ आणि वाराणसीतील बनारस हिंदू विश्वविद्यालयातील इतिहास विभाग भारतीय इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी बजावत आहेत. पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी सोबतच अनेक लहानमोठे डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा या विभागांतर्फे आयोजित केले जातात.